Goa traditional folk instruments Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Goa Culture: गोव्यातील पारंपरिक लोकवादनाचा ठेवा संवर्धित करण्यासाठी कोणी तारणहार सापडेल का?

Goa traditional folk instruments: लोकसंगीत हा पारंपरिक संगीतप्रकार आहे जो एखाद्या कुटुंबाकडून अथवा विशिष्ट समूह गटांकडून सादर केला जातो.

Sameer Panditrao

विकास कांदोळकर

आदिम संगीत हे ध्वनी आणि वादन स्वरूपात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एखाद्या वस्तूच्या आघातातून किंवा तोंडातून येणाऱ्या आवाजांचा वापर आदिम काळात मानव संवाद आणि सूचना देण्यासाठी करत असे. लहानपणी आम्ही ‘रानात’ गेल्यावर एकमेकांच्या ‘लोकेशन सर्च’साठी मारलेल्या शिट्या-कुकाऱ्या, बैलांचे औत ओढताना केलेले ‘हिय्यो’, ‘हिरिरी’ असे आवाज, मोठे लाकूड ओढताना केलेले ‘....अयसा.. अयसा’ हे आवाज सूचनेचे प्रगत रूप आहे. एखाद्या कार्याच्या सुरुवातीला किंवा सरणावरच्या प्रेताला अग्नी देताना लावलेले फटाके हे मुळात सूचनेचे कार्य करतात.

लोकसंगीत हा पारंपरिक संगीतप्रकार आहे जो एखाद्या कुटुंबाकडून अथवा विशिष्ट समूह गटांकडून सादर केला जातो. लोकसंगीत लिखित स्वरूपाऐवजी ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी शिकले जात असते. मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून लोकसंस्कृती उलगडून दाखवण्याचे सामर्थ्य असलेले लोकसंगीत पारंपरिक वाद्यांवर वाजवले जाते. इसवी सनाच्यापूर्व काळापासून, तसेच वेळोवेळी राज्यकर्त्यांनी गोव्याच्या लोकसंस्कृतीवर उमटवलेले ठसे यांचा अभ्यास लोकवाद्ये आणि लोकसंगीत या माध्यमांतून करता येतो.

गोव्यात विविध समूह, ताल वाद्यांचा वापर फार प्राचीन काळापासून, जीवनातील सुखदुःख व्यक्त करण्यासाठी किंवा विधीकार्यासाठी करत आहेत. ढोल, ताशा, चौघडा, समेळ, कांसाळे, घुमट, घंटा, जाते, मुसळ, इत्यादींचा विविध ठिकाणी वापर केलेला आढळतो. गोव्यात एकाच प्रकारच्या विधीसाठी विविध वादनपद्धती आढळून येतात. पेडण्यात दसरोत्सवात ढोल-ताशाबरोबर अन्य वाद्यांसहित विविध प्रकारचे वादन होते त्याला ‘चाली’ म्हणतात (सुवारीची, मिरांची....फेऱ्याची इत्यादी.), गोव्यातील काणकोण, फोंडा, सांगे, सत्तरी, पेडणे सारख्या विविध ठिकाणी विधिवत अवसर आणण्यास, धीरगंभीर वातावरण निर्मितीसाठी तालवाद्यांचाच वापर होतो. गावोगाव ढोलाच्या साहाय्याने दवंडी देणारे आता नामशेष होत चालले आहेत. आदिम संस्कृतीच्या खुणा गोमंतकीय संस्कृतीत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. देवळात चालू असलेल्या वादनातून कोणता विधी चालू आहे याची माहिती ते ऐकणाऱ्याला अचूक असते.

गोमंतकात नृत्य, सुवारी, चंद्रावळ, खाणपड, फाग शिगमो, आरत्या, मांडो-धुलपद सादरीकरणात ‘घुमट’ हे आदिम परंपरेतील तालवाद्य वाजविण्यात येते, अशी माहिती पन्नास वर्षांपूर्वी चंदनमळी धारगळ येथील कै. लक्ष्मण (धाकटूलो) पुनाजी सांगत असत. (घुमट वाजवताना त्यांच्या डोक्यावरची शेंडी करत असलेले नृत्य अजून आठवते.) मृदंग-पखवाज या गोव्यातील मंदिरांतील कीर्तन, काला, दशावतार भजन संगतीच्या वाद्यांची जागा तबल्याने घेतल्याचे दिसते. देवळातील पारंपरिक सनई-चौघडा वादन कलाकारांच्या अभावी यंत्राने होते.

म्हादळें या वाद्याचा ख्रिश्चन समुदायात जागर, तोणयां खेळ, धालो प्रदर्शनात होतो. ‘पेर्गांव’ या दवंडी प्रकाराने विलक्षण संदेश ग्रहण होते. तसेच गोव्यात चर्चच्या घंटानादाने प्रार्थना, जमाव, मृत्यू यांना सूचित केले जाते.

गोव्यातील ग्रामीण लोककलांचा वापर नागरी कलेच्या उत्कर्षासाठी होताना दिसत आहे. गोव्याचे पर्यटन खाते या लोककला आर्थिक अर्थाने पिळून खात असताना कला व सांस्कृतिक खाते त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहावे, याचे सखोल ज्ञान नसल्यामुळे दुर्लक्ष करीत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याच्या हेतूने लोककलांचे परिष्करण होत आहे. रात्रीच्या वेळी गोव्याची राजधानी तसेच इतरत्र फिरणाऱ्या ‘गोंयकारांना’ कलेच्या परिवर्तनाची साक्ष दिसून येत आहे. गोव्याबाहेरून आलेल्या उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांना मूळ गोमंतकीय संस्कृतीशी देणे-घेणे नसल्यामुळे घातक निर्णय घेतले जात आहेत.

गोमंतकीय परंपरेची जपणूक करणाऱ्या बऱ्याच देवळांमधून वादांची संख्या फोफावत आहे. शांततेचे प्रतीक असणारी देवभूमी रणभूमीत परिवर्तन होत आहे. देवळाच्या परंपरेत विधी, वादन, नृत्य, गायन, पूजन ज्या वर्गाकडे होती त्या वर्गातील लोक, याच परंपरेमुळे आपल्याला अप्रतिष्ठा आल्याचे समजून आल्यामुळे, ती परंपराच नष्ट करण्याच्या हेतूने तथाकथित प्रतिष्ठावंतांना आव्हान देत आहेत. गोव्यातील काही धार्मिक कार्यात पारंपरिक वादक मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांनाही उदरनिर्वाहाचा प्रश्न सतावतो आहे. गोव्यात सगळीकडे फुटीचे राजकारण होत असताना, मूळ गोमंतकीय अल्पमताच्या दिशेने जात असताना, पारंपरिक लोकवादनाचा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीसाठी संवर्धित करण्यासाठी कोणी तारणहार सापडेल का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT