रमेश रामचंद्र भिडे
वनराज सिंह! जंगलचा राजा म्हणतात त्याला! बरच अंतर चालून गेल्यानंतर, तो क्षणभर थांबतो. मागे वळून पाहतो. आपण कुठून निघालो? कुठपर्यंत येऊन पोहोचलो? कुठे जायचं आहे? ह्याचे अवलोकन करतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रवासाच्या सगळ्या आठवणी आपल्या स्मरणवहीत कायमस्वरूपी चितारून ठेवणारा एक माणूस होऊन गेला. त्या आठवणींचे स्मरण करीत करीतच हा माणूस आपले जीवन अतिशय आनंदाने आणि समाधानाने जगला.
हे समाधानी जीवन जगणाऱ्या माणसाचे नाव होते- नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर! ‘गोव्यातील पेडणे गाव ही माझी मातृभूमी, तर मुंबई कर्मभूमी!’ हे तत्व लक्षात ठेवूनच त्यांनी आपला जीवन प्रवास केला.
गोव्यातील निसर्ग हा विविध रंगाने बहरलेला आहे. प्रभाकर पणशीकर त्या निसर्गाप्रमाणे अनेक वैचारिक रंगाने बहरलेले होते. भरपूर काबाडकष्ट करून, अनंत लोकांच्या संपर्कात राहून काही वेळा अपमानसुद्धा सोसून! ‘तो मी नव्हेच!’ या नाटकातील लखोबा लोखंडे या भूमिकेमुळे ते हिमालयाएवढे मोठे झाले.
ते निर्माते झाले... दिग्दर्शक झाले... परंतु, आपण कुठून निघालो! आपला प्रवास कसा झाला! आपल्या प्रवासाचे साक्षीदार कोण कोण होते! हे ते कधीही विसरले नाहीत.
अनेक संकटांचा सामना करीत नटांच्या लहरी सांभाळीत त्यांनी आपल्या ‘नाट्यसंपदा’ या संस्थेला जीवापाड जपले, पुढे नेले ! खऱ्या अर्थानं नायक कसा असावा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रभाकर पणशीकर. रंगमंचावरचा त्यांचा अभिनय जितका समृद्ध होता, तितकेच पडद्यामागील सर्व हालचाली किंवा कारस्थान जाणून घेण्याएवढे ते उत्तम प्रशासक होते.
अभिनयाने आणि मनानेही ते अतिशय श्रीमंत होते. कुठच्या नटाला काय लागतं, त्याच्या कुठल्या प्रकारच्या कटकटी असतात या सगळ्या विषयावर त्यांनी उत्तम अभ्यास केलेला होता.
‘नाट्यसंपदा’ या नावाचा ब्रॅंड त्यांनी नाट्यसृष्टीत निर्माण केला. कुठल्याही नाट्यगृहाची तारीख मिळाली की वार कुठला आहे, वेळ कुठली आहे या गोष्टीची त्यांनी कधीही चौकशी केली नाही. प्रयोग करणे हे त्यांनी कर्तव्य मानले. फायदा झाला किंवा तोटा याचा त्यांनी कधीही विचार केला नाही- उलट तोटा झाला तर ते सांगत, ‘आज आपला दिवस नाही’. किती दूरदृष्टी होती या नटश्रेष्ठाकडे? व्यवहारासाठी यांनी कधीही प्रयोग नाकारला नाही.
‘दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील पण माणसं सांभाळली पाहिजेत’ हाच त्यामागे विचार होता. डॉक्टर काशिनाथ घाणेकर हा त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दुवा होता. काही प्रसंगी घाणेकरना दम देऊन, त्यांचा खरपूस समाचार सुद्धा घेतलेला आहे.
घाणेकरांची अंत्ययात्रा जेव्हा शिवाजी मंदिराजवळ आली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवून हेच पणशीकर, जणू आपला भाऊ किंवा मुलगा गेला आहे, असं समजून हमसून हमसून रडले होते. त्यावेळी क्षणभर मनात विचार आला होता की काही क्षणी कठोर निर्णय घेणारे पणशीकर हेच आहेत का?
त्यांची नाटकं आणि प्रेक्षक यांच्याबद्दल केवढी निष्ठा होती याची एक आठवण सांगतो. सांगलीला प्रयोगाआधी त्यांचा आवाज बसला होता. त्यांनी प्रयोग सुरू व्हायच्या आधी प्रेक्षकांना सांगितले, ‘माझा आवाज बसलाय. जर मी काय बोलतोय हे तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही हात वर करा, मी प्रयोग थांबवीन आणि तुम्हांला तिकिटाचे पैसे परत देईन.’
ते ऐकून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रयोग करण्याची त्यांची जिद्द एवढी मोठी होती की, प्रयोग संपेपर्यंत त्यांचा आवाज पूर्वीसारखा लोकांना ऐकू येत होता.
१४ मार्च रोजी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांची जयंती साजरी झाली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, २१ आणि २२ मार्च असे दोन दिवस ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर’ नाट्य महोत्सवाचे आयोजन पेडणे येथील श्री भगवती देवस्थानच्या प्रांगणात करण्यात आले आहे. अपराजित योद्धा आणि संगीत मानापमान ही नाटके या महोत्सवात सादर होणार आहेत.
पंतांना आपल्या मातृभूमीचा प्रचंड ओढा होता. गोव्याचा दौरा म्हटल्यानंतर ते एकदम आनंदी असत. मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा ती खरेच सासरची होते का? मात्र, ज्या दिवशी मुलगी, ‘आमच्या घरी असं असतं, आमच्या घरी तसं लागतं’ असे म्हणायला लागते तेव्हा नक्की समजायचं आता ती सासरची कायमस्वरूपी झाली. पंतांची कर्मभूमी मुंबई होती; पण गोव्याचा उल्लेख करताना ते नेहमी, ‘आमच्या गोव्याची मंदिरे, आमच्या गोव्याचा निसर्ग, आमच्या गोव्याची माणसे’ असा करीत असत. त्यावरून गोव्याची त्यांना किती ओढ होती हे लक्षात येईल.
(लेखक मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक अभिनेते आहेत.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.