Mahalasa Narayani Temple, Mardol Goa Mahalasa Temple Facebook
गोंयची संस्कृताय

Goa Navratri 2024: भल्या मोठ्या घंटेचे पोर्तुगीजांच्या न्यायालयात का होतं महत्त्व? श्री महालसा देवी मंदिराचा इतिहास जाणून घ्या

गोमन्तक डिजिटल टीम

Mahalasa Narayani Temple, Mardol Marathi Information

प्रा. विघ्नेश शिरगुरकर वांते, सत्तरी गोवा

(vighneshshirgurkar@gmail.com)

हे देवस्थान फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ वा म्हाड्डोळ ह्या गावी वसलेलं आहे . श्री महालसा देवी म्हणजे मोहिनी. हे स्त्री रूप भगवान महाविष्णुंनी समुद्रमंथनावेळी असुरांकडून अमृत मिळवण्यासाठी धारण केलेला मोहिनी अवतार म्हणून ओळखले जाते. ही देवी उभ्या स्वरूपात असलेली चतुर्भूज मूर्ती असून मागच्या उजव्या हातात त्रिशूळ, पुढच्या उजव्या हातात तलवार व असुराचे केस धरलेले दिसून येतात. देवीच्या मागच्या डाव्या हातात पेयपात्र व पुढच्या डाव्या हातात असुराचे छाटलेले मुंडके धरल्याचे दिसून येते.

देवी महालसा नारायणीच्या म्हार्दोळ येथील देवलयासमोर पितळीची सुमारे पंधरा ते वीस फूट उंच समई आहे व ती उत्सवसमयी वरपासून खालपर्यंत प्रज्वलित केली जाते. पितळीच्या महासमईला टेकूनच गरूडस्तंभ आहे व दाक्षिणात्य विशेषतः कर्नाटक राज्यात प्रत्येक देवालयासमोर असे गरूडस्तंभ उभारलेले आढळून येतात. सामान्यतः गोव्यातील सर्वच्या सर्व मंदिरासमोर दगडी किंवा काँक्रीटचे दिपस्तंभ उभारलेले असतात.

या देवालयासमोरचा दिपस्तंभ हा मूळचा जांभ्या दगडापासून घडवला असावा व नंतर त्याला सिमेंटचा मुलामा दिला गेल्याची शक्यता आहे. राखाडी रंगाचा पाषाण वापरून हल्लीच देवालयाचे नुतनीकरण करण्यात आले आहे पण आतल्या सभामंडपातील पुरातन लाकडी बांधकामाचे सुव्यवस्थितपणे जतन केले आहे.

लाकडी खांब, छत, खिडक्या, सज्जे व पुरूषाच्या छातीपर्यंत उंच असलेली बैठकवजा जागा सभामंडपाची शोभा वाढवतात. देवळाभोवती उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र वापरून बांधकाम केलेल्या अग्रशाळा, भक्तनिवास, सभागृह, ऑफीस, उपाहारगृह, भोजनगृह, वगैरे देवालयाच्या प्राकाराची शोभा वाढवतात. देवळाच्या मागच्या बाजूला देवीचा तलाव आहे.

इतिहास (History of Mahalasa Narayani Temple)

श्री महालसा नारायणी संस्थान हे मूळचे सासष्टी तालुक्यातील वरेण्यपूर व आजच्या वेर्णा या नावाने ओळखले जाणाऱ्या गावात होते. पोर्तुगीजांच्या धर्मांतराच्या व मंदिरभंजनाच्या वरवंट्याखाली येण्यापासून हेही देवालय सुटले नाही. इसवी सन १५६७ साली पोर्तुगीजांनी हे देवालय फोडले पण तत्पूर्वी मूर्ती व त्यांचे तत्वे घेऊन महाजन मंडळी त्याकाळच्या सौंदेकर राजांच्या राज्यात आली व या म्हार्दोळ गावात देवीची पुनर्प्रतिष्ठापना केली.

ही देवी पुर्वी नेपाळला होती व तिथून छत्रपती संभाजीनगरला आणली गेली पण मुघल शासकांच्या भयाने ती पुन्हा त्या ठिकाणाहून हलवून गुप्तपणे वेर्णे गावात आणण्यात आली असा संशोधनंवजा मतप्रवाह आहे.

महत्व (Importance of Mahalasa Narayani Temple)

पद्ये ब्राह्मण, कऱ्हाडे ब्राह्मण, गौड सारस्वत ब्राह्मण, दैवज्ञ ब्राह्मण, कलावंत व भंडारी समाजातील कुळांसाठी ही देवी त्यांची कुलस्वामिनी म्हणून महत्वाची आहे. या देवीची कुळे, गोवा, कर्नाटक महाराष्ट्र व महाराष्ट्रातील मुंबई अशा महत्वाच्या ठिकाणी वास्तव्य करून आहेत व नवरात्री, जत्रा तसेच 'जायांची पूजा' या उत्सवानिमित्त देवीच्या चरणी नतमस्तक व्हायला आवर्जून येतात.

शांतादुर्गा, विजयादुर्गा, या देवींप्रमाणे महालसेची श्रावणातील 'जायांची पूजा' संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. फक्त उत्कृष्ट दर्जाच्या जायां(जाई)साठी प्रसिद्ध असलेला म्हार्दोळ गाव हा काणकोण तालुक्यातनंतरचं गोव्यातील दुसरं ठिकाण आहे.

वैशिष्ट्य (Significance Mahalasa Narayani Temple)

ही देवी पुरूष दैवतांचा लेण्यांचा भाग असलेलं यज्ञोपवीत अर्थात जानवं धारण केलेली दिसून येते. स्त्री देवतांमध्ये देवी पार्वती व देवी महालसा याच फक्त जानवे धारण करतात. हे देवालय आणखीन एका गोष्टीवरून प्रसिद्ध आहे ती म्हणजे एक भली मोठी घंटा. पण घंटानाद करण्यासाठी आवश्यक असलेला जाडजूड दांडा तिथे जोडलेला नाही. या घंटेचा उपयोग पुर्वी कोणत्याही गुन्ह्याची वा अन्याय-अपराधाची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी वा 'प्रमाण' होण्यासाठी करत असत‌.

पोर्तुगीज काळात या घंटेबद्दल इतकी दृढ श्रध्दा होती की घंटेखाली सप्रमाण सिद्ध झालेल्या अपराधाबद्दलचे सत्य पोर्तुगीजांच्या न्यायालयात पुरावा म्हणून स्विकारले जात असे. दर रविवारी देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येते व देवळाभोवती प्रदक्षिणा झाल्यावर देवी पुन्हा देवळात परतते. या देवालयात दुपारी व रात्री भक्तांसाठी अन्नसेवा उपलब्ध असते.

नवरात्री वेळापत्रक (Navratri Celebration in Goa)

अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीची घटस्थापना होते व प्रतिपदा ते नवमीपर्यंत नित्य अभिषेक, मानकरी महाजनांतर्फे विशेष महापूजा, दुपारी महानैवेद्य व अन्नसंतर्पण, सायंकाळी किर्तन, आरती, मखरारती, मखरोत्सव, प्रसाद वितरण, नवरात्रीत मखरोत्सव हे याही मंदिरातील विशेष आकर्षण असतं.

मखरोत्सवापुर्वी वार्षिक किर्तनसेवा करणाऱ्या किर्तनकार बुवांतर्फेच किर्तन केले जाते. तद्नंतर आतील गर्भगृहातील देवीची आरती होते व नंतर मखराची आरती व मखरोत्सवाला सुरूवात होते. प्रसाद वितरण होताच त्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते.

कसे पोहोचाल? ( How To Reach)

  • दाबोळी विमानतळापासून हे देवस्थान एक तासाच्या अर्थात ३६ किमीच्या अंतरावर आहे.

  • मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ५३ किमीचा प्रवास करून या ठिकाणी सव्वा तासात पोहोचता येते.

  • मडगाव रेल्वे जंक्शनपासून हे देवस्थान ३० किमी म्हणजे सुमारे एका तासाच्या अंतरावर आहे.

  • १३ किमी अंतरावर करमळी रेल्वे स्टेशन हे या ठिकाणी २४ मिनिटांत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

  • फोंडा आंतरराज्य व राज्यांतर्गत बस स्थानकापासून हे ठिकाण ११ मिनिटे म्हणजेच फक्त ६ किमीच्या अंतरावर आहे.

कुठे थांबाल? (Where to Stay in Mardol?)

देवस्थानच्या भक्तनिवासात रूम व्यवस्था असली तरी ती नवरात्रौत्सवात हे बुकिंग फुल्ल असतं. पर्यटकांना रूम्स देण्यात देवस्थान प्रशासन सहसा अनुकूल असत नाही. फोंडा, ओल्ड गोवा, पणजी अशा ठिकाणी उत्कृष्ट हॉटेल्स उपलब्ध आहेत व तेथे रास्त दरात रूम्स उपलब्ध असतात.

खर्च (Cost)

श्री मंगेश देवस्थान, श्री महालसा नारायणी संस्थान व इतर जवळपासच्या भागातील देवस्थानांचा दौरा हिशेबात धरल्यास जवळपास ₹३००-४००० खर्च येतो.

हे करा (Do's)

  • देवळात जाताना अंगभर कपडे घालून जा.

  • देवळात जाताना आंघोळ करून शुचिर्भूत होऊन जाणे आवश्यक आहे.

  • देवळात शांतता पाळा

  • देवळात व देवळाच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखण्यास प्राधान्य द्या.

हे करू नका (Dont's)

  • देवळात जाताना मद्यपान मांसाहार मत्स्याहार किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करून जाणे टाळा.

  • कोणत्याही प्रकारचे अपेय पान किंवा व्यसन केलेले असल्यास देवळात जाणे टाळा

  • देवळाच्या प्रकारात सभामंडपात देवास नमस्कार करत असताना किंवा प्रदक्षिणा प्रकारात गोंधळ गोंगाट किंवा शीळ घालणे हे प्रकार टाळा

  • देवस्थान प्रशासनाची परवानगी असल्यासच छायाचित्रण किंवा व्हिडिओग्राफी करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

SCROLL FOR NEXT