US Navy Operations Of Strait Hormuz: जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा जलमार्गांपैकी एक असलेल्या 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' परिसरात सध्या प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (10 मार्च) अमेरिकन सैन्याने इराणच्या अशा अनेक जहाजांवर भीषण हल्ला केला, ज्यांचा वापर समुद्रात सुरुंग पेरण्यासाठी केला जाण्याची शक्यता होती.
अमेरिकेने इराणचे (Iran) हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ही मोठी लष्करी कारवाई केली असून यामध्ये इराणच्या अनेक जहाजांचा नायनाट करण्यात आला. विशेष म्हणजे, या कारवाईचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये अमेरिकन हल्ल्यात इराणी जहाजे जळताना दिसत आहेत. या कारवाईमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती आता अधिकच स्फोटक बनली असून जागतिक तेल पुरवठ्यावर याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या लष्करी कारवाईबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन सैन्य यांच्या दाव्यांमध्ये काहीसा विरोधाभास दिसून येत असला, तरी इराणला दिलेला इशारा अत्यंत कडक आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, त्यांच्या फौजांनी 10 मार्च रोजी हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणची 16 'माइनलेयर' (सुरुंग पेरणारी) जहाजे लक्ष्य करुन ती नष्ट केली. मात्र, दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर माहिती देताना 10 जहाजे नष्ट केल्याचा उल्लेख केला.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत स्पष्ट शब्दांत इराणला ताकीद दिली की, जर इराणने या महत्त्वाच्या व्यापारी जलमार्गात एक जरी माइनलेयर पेरला असेल, तर तो तातडीने हटवला पाहिजे. अन्यथा, इराणला अशा लष्करी परिणामांना सामोरे जावे लागेल जे यापूर्वी जगाने कधीही पाहिले नसतील. ट्रम्प यांनी पुढे असेही नमूद केले की, जर इराणने स्वतःहून हे सुरुंग हटवले, तर ते तणाव कमी करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल ठरेल.
हॉर्मुझची सामुद्रधुनी हा भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या जगातील सर्वात संवेदनशील भाग मानला जातो. इराण आणि ओमान यांच्या दरम्यान असलेली ही चिंचोळी सामुद्रधुनी जागतिक तेल व्यापाराची जीवनवाहिनी आहे. दररोज जगातील एकूण तेल व्यापारापैकी सुमारे 20 टक्के तेल याच मार्गाने वाहून नेले जाते. त्यामुळे जर इराणने या मार्गावर सुरुंग पेरुन जहाजांची ये-जा थांबवली, तर जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडू शकतात.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने (America) ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे समजते. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, इराण या भागात काही सुरुंग पेरण्याची तयारी करत होता आणि काही मोजक्या ठिकाणी हे काम आधीच सुरु झाले असल्याची शक्यता 'सीएनएन' आणि 'सीबीएस न्यूज'ने वर्तवली होती.
या जलमार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी इराणचे नौदल आणि 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' सातत्याने प्रयत्नशील असतात. इराणने यापूर्वीही इशारा दिला होता की, या चॅनेलचा वापर करणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले जाऊ शकते. सध्या सुरु असलेल्या युद्धाचा आणि तणावाचा विचार करता, व्यावसायिक जहाजांसाठी हा भाग अत्यंत 'हाय-रिस्क' झोन बनला आहे. अमेरिकेच्या या नव्या हल्ल्यानंतर इराणकडून कोणती प्रतिक्रिया येते, यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.
जर इराणने प्रतिहल्ला केला किंवा तेल पुरवठा पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न केला, तर हे संकट तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने सरकू शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सध्यातरी अमेरिकेने या भागात आपली लष्करी उपस्थिती वाढवून इराणला बॅकफूटवर नेण्याचा प्रयत्न केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.