

फोंडा: पशुखाद्याच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ केल्याच्या निषेधार्थ ‘एफपीओ’ या गोवा डेअरीशी निगडित आस्थापनाच्या संचालकांनी ही दरवाढ दोन दिवसांत मागे घ्यावी, अन्यथा एफपीओशी संबंधित दूध उत्पादक आपल्या संचालकपदाचा राजीनामा देतील, असा इशारा दिला.
शुक्रवारी या संचालकांनी गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच इतर संबंधितांची भेट घेऊन पशुखाद्य दरवाढीचा निषेध केला आणि वाढीव दर त्वरित रद्द करण्याची मागणी केली. या संचालकांपैकी एक असलेले वैभव परब म्हणाले की, संबंधित कंपनीने कुणालाही विश्वासात न घेता ही दरवाढ केली आहे. इतर पशुखाद्य कंपन्यांनीही दरवाढ केली आहे; मात्र ती कमी प्रमाणात आहे.
आताची दरवाढ अन्यायकारक असून, आधीच कंबरडे मोडलेल्या दूध उत्पादकांवर हा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी नमूद केले. चार महिन्यांपूर्वी पशुखाद्याच्या एका पिशवीचा दर १,५२५ रुपये होता. तो आता १,७२५ रुपये करण्यात आला आहे.
किलोमागे चार रुपयांची दरवाढ करण्यात आली असून, ही दरवाढ करताना संबंधित आस्थापनावरील दूध उत्पादक संचालकांना विश्वासात घेतलेले नाही. त्याच्या निषेधार्थ या संचालकांनी गोवा डेअरीला जाब विचारला. दरम्यान, येत्या दोन दिवसांत याप्रकरणी तोडगा न निघाल्यास सोमवारी सर्व शेतकरी संचालक सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा गोवा डेअरीला यावेळी देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.