Russia Drone Attack: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नसून रशियन सैन्याने पुन्हा एकदा युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा भीषण वर्षाव केला. या ताज्या हल्ल्यांमध्ये 12 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रशियाने यावेळेस चक्क एका प्रवासी ट्रेनला लक्ष्य केल्याने जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी या ट्रेनवरील हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत रशियाच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा ट्रेनमध्ये 200 हून अधिक प्रवासी होते. ज्या डब्यावर ड्रोनने हल्ला केला, त्यात 18 नागरिक प्रवास करत होते. जेलेंस्की यांनी याला 'दहशतवाद' संबोधले असून, एका सामान्य प्रवासी ट्रेनवर हल्ला करण्यामागे कोणतेही लष्करी कारण असू शकत नाही, असे ठामपणे सांगितले.
दुसरीकडे, रशियाने (Russia) ओडेसा या दक्षिण शहरावर 50 हून अधिक ड्रोनद्वारे हल्ला केला. या हल्ल्यात एका 39 आठवड्यांच्या गर्भवती महिलेसह दोन चिमुरड्या मुली जखमी झाल्या आहेत, ही बाब अत्यंत हृदयद्रावक आहे. रशियन हल्ल्यांमुळे ओडेसा येथील अनेक निवासी इमारती, एक चर्च आणि शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शहराच्या ऊर्जा यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याने हजारो लोक वीज आणि गरम पाण्यापासून वंचित झाले आहेत.
कडाक्याच्या थंडीत सामान्य नागरिकांचे हाल होत असतानाच रशियाने युक्रेनच्या विविध भागात एकूण 165 ड्रोन डागले होते. जरी युक्रेनच्या हवाई दलाने अनेक ड्रोन पाडले असले, तरी काही ड्रोननी महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना तडा दिला आहे. लविव क्षेत्रात गॅस कंपन्यांच्या फॅसिलिटीला आग लागली असून डोनेट्स्क आणि खेरसान भागातही वृद्धांचा आणि दांपत्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
विशेष म्हणजे, अमेरिका (America) या दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करत असतानाच रशियाने हे हल्ले अधिक तीव्र केले आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने असा दावा केला आहे की, त्यांनी झापोरीझिया आणि खारकीव भागातील आणखी दोन गावांवर ताबा मिळवला आहे. मात्र, जेलेंस्की यांनी स्पष्ट केले आहे की, रशियाचे असे हल्ले शांततेच्या चर्चेला आणि राजनैतिक प्रयत्नांना कमकुवत करत आहेत. त्यांनी मित्र राष्ट्रांना आवाहन केले आहे की, रशियाला रोखण्यासाठी आणि चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी मॉस्कोवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवणे आता काळाची गरज आहे. युद्धाच्या या भीषण परिस्थितीत सामान्य नागरिक भरडले जात असून, शांततेची चिन्हे अद्यापही धूसर दिसत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.