Pakistan Defense Minister Khawaja Asif Video: संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये असलेल्या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक अत्यंत संतापजनक आणि वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका अफगान महिला पत्रकाराने त्यांच्यासमोर तालिबान शासित अफगाणिस्तानातील महिलांच्या हक्कांच्या परिस्थितीवरुन पाकिस्तानच्या दुतोंडी धोरणाबाबत सडेतोड सवाल केले.
पत्रकाराने विचारले की, पाकिस्तान (Pakistan) तालिबानला आपला जुना मित्र मानतो, मग त्याने अफगाण महिलांच्या मूलभूत अधिकारांच्या दडपशाहीचा निषेध का केला नाही? तसेच, तालिबानच्या या धोरणांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी पाकिस्तान सरकार त्यांच्यावर दबाव टाकणार का, असे खडे सवाल ती विचारताना दिसली.
मात्र, या अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी ख्वाजा आसिफ यांनी जी कृती केली, ती अत्यंत निंदनीय आणि मानहानीकारक होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, प्रश्नादरम्यान ख्वाजा आसिफ यांनी त्या महिला पत्रकाराला मध्येच थांबवले. त्यानंतर त्यांनी त्या महिला पत्रकाराच्या कपड्यांकडे बोट दाखवत अत्यंत उद्धटपणे म्हटले की, "अशा प्रकारे परत जाऊ नकोस." एवढेच नव्हे तर, त्यांनी एक भयंकर इशारा केला. या इशाऱ्याचा सरळ अर्थ असा होतो की, जर ती महिला अशा प्रकारे प्रश्न विचारत अफगाणिस्तानमध्ये परत गेली, तर तिला जीवे मारले जाऊ शकते. विशेष म्हणजे, हे सर्व सुरु असताना त्यांच्या शेजारी उभे असलेले लोक यावर खळखळून हसताना आणि चेष्टा करताना दिसले.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरील युजर्संनी तीव्र संताप व्यक्त केला. एका वरिष्ठ सरकारी मंत्र्याकडून एका महिला पत्रकाराला अशा प्रकारे थेट जीवे मारण्याचा इशारा करणे अत्यंत लाजीरवाणे असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. कोणत्याही महिलेचा असा अपमान करणे हा ना राजनैतिक शिष्टाचार आहे, ना ताकदीचे लक्षण. अफगाणिस्तानातील महिलांची दयनीय अवस्था आणि त्यांच्या वेदनांवर जाहीरपणे प्रश्न विचारणाऱ्या महिलेला उपहास आणि धमकी मिळणे अत्यंत दुर्देवी आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या पुन्हा एकदा मुसक्या आवळल्या गेल्या असून, तालिबान आणि पाकिस्तानच्या साटेलोट्यामुळे अफगाणी महिलांना दररोज कशा प्रकारे दहशत आणि अपमानाचा सामना करावा लागतो, हे पुन्हा एकदा जगासमोर उघड झाले.
दुसरीकडे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील राजकीय व सामरिक संबंधांमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर सतत लष्करी कारवाया आणि चकमकींच्या बातम्या समोर येत आहेत. नुकतेच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून 10 प्रमुख ठिकाणांवर एअरस्ट्राइक आणि ड्रोन हल्ले केले. अफगाणिस्तानातून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र, तालिबान सरकारने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून, हा थेट सार्वभौमत्वावर आघात असल्याचे म्हटले. या हल्ल्यांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचा दावाही तालिबानने केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.