Myanmar Airstrike Dainik Gomantak
ग्लोबल

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Myanmar airstrike 49 killed 58 injured: म्यानमारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रखाइन राज्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Sameer Amunekar

Myanmar Market Airstrike : म्यानमारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रखाइन राज्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्याउक्ताव टाउनशिपमधील एका बाजाराजवळ करण्यात आलेल्या कथित हवाई हल्ल्यात 49 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 58 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे स्थानिक बचाव अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बाजार परिसरात अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली.

अराकान आर्मीच्या नियंत्रणातील भागात हल्ला

ही घटना सोमवारी क्याउक्ताव टाउनशिपमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. मांडले शहरापासून सुमारे 340 किलोमीटर पश्चिमेला असलेला हा भाग सध्या रखाइनमधील प्रभावशाली सशस्त्र संघटना ‘अराकान आर्मी’च्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे या हल्ल्यामुळे म्यानमारमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षाची तीव्रता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

बाजारात नागरिकांची मोठी गर्दी

अराकान आर्मीच्या म्हणण्यानुसार, दुपारच्या सुमारास एका लढाऊ विमानातून बाजाराजवळ दोन बॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्याच्या वेळी बाजारात व्यापारी, ग्राहक तसेच रस्त्यावरून जाणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे हल्ल्याचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसल्याचा दावा करण्यात आला आहे.

हल्ल्यानंतर परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले असून गंभीर जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, या हवाई हल्ल्याची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नसल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

22 जखमींची प्रकृती गंभीर

स्थानिक माहितीनुसार, जखमी झालेल्या 58 जणांपैकी 22 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचाव पथकांकडून ढिगारा हटवण्याचे आणि जखमींचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

रखाइनमधील बचाव कार्याशी संबंधित वरिष्ठ अधिकारी वाई हुन आंग यांनी घटनास्थळी असलेल्या बचाव कर्मचाऱ्यांच्या माहितीच्या आधारे मृत आणि जखमींच्या संख्येची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बाजार हा परिसरातील महत्त्वाचा घाऊक बाजार होता.

संपूर्ण रखाइनमधून येत होते व्यापारी

या बाजाराचे महत्त्व केवळ स्थानिक पातळीपुरते मर्यादित नव्हते. रखाइन राज्यातील विविध भागांतून व्यापारी आणि ग्राहक येथे खरेदी-विक्रीसाठी येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बाजाराच्या आसपास झालेल्या हल्ल्यात मोठ्या संख्येने नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे.

बचाव अधिकाऱ्यांनी या घटनेचे वर्णन रखाइनमधील अत्यंत गंभीर हवाई हल्ल्यांपैकी एक म्हणून केले आहे. मात्र, हल्ल्यामागील जबाबदारी आणि नेमके लक्ष्य याबाबत स्वतंत्र पुष्टी उपलब्ध नसल्याचेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

अराकान आर्मीकडून प्रत्युत्तराची धमकी

हल्ल्यानंतर अराकान आर्मीने कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा बळी घेणाऱ्या हवाई हल्ल्यासाठी थेट जबाबदार असलेल्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात लवकरच कारवाई करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे या घटनेनंतर रखाइनमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

2021 पासून म्यानमारमध्ये संघर्ष

म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी 2021 रोजी लष्कराने आंग सान सू की यांच्या नेतृत्वाखालील निवडून आलेले सरकार उलथवून सत्ता ताब्यात घेतल्यानंतर देशातील परिस्थिती मोठ्या प्रमाणात अस्थिर झाली. लष्करी राजवटीविरोधात देशभरात निदर्शने झाली. सुरक्षा दलांकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर अनेक विरोधकांनी सशस्त्र संघर्षाचा मार्ग स्वीकारला.

यानंतर लोकशाही समर्थक गट आणि विविध जातीय सशस्त्र संघटनांचा लष्कराशी संघर्ष सुरू राहिला आहे. देशाच्या अनेक भागांत हवाई हल्ले आणि लष्करी कारवायांच्या घटना समोर येत आहेत. रखाइनमधील या ताज्या हल्ल्यामुळे म्यानमारमधील मानवी संकट आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT