Israel Government Formation 2026 Gadi Eisenkot: इस्त्रायलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी देशातील दोन प्रमुख 'अरब' पक्षांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. ताज्या वृत्तानुसार, अरब पक्ष गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेसाठी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार झाले आहेत.
मात्र, यासाठी त्यांनी नेसेटचे (इस्त्रायली संसद) अध्यक्ष अमीर ओहाना यांना पदावरुन हटवण्याची मुख्य अट घातली आहे. आयझेनकोट यांनी ही अट मान्य केल्यास नेतन्याहू विरोधी 'चेंज ब्लॉक'च्या सरकार स्थापनेचा मार्ग सुकर होऊ शकतो. इस्त्रायली वृत्तपत्र 'हारेत्झ'च्या रिपोर्टनुसार, RA’AM आणि जॉइंट लिस्ट या दोन्ही अरब पक्षांचा मुख्य हेतू नेतन्याहू यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार करणे हाच आहे.
यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या दोन्ही अरब पक्षांकडे मिळून संसदेत 19 खासदार आहेत. गादी आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील आघाडीसोबत हे पक्ष जोडले गेल्यास त्यांच्या समर्थकांचा आकडा 67 वर पोहोचेल. 120 सदस्यीय संसदेत सरकार स्थापनेसाठी 61 खासदारांच्या बहुमताची गरज आहे, तर सध्या नेतन्याहू यांच्या आघाडीकडे केवळ 53 सदस्यांचे बळ आहे.
दरम्यान, इस्त्रायलचे (Israel) अध्यक्ष आयझॅक हर्झोग बुधवारपासून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी टप्प्याटप्प्याने चर्चा सुरु करणार आहेत. देशात पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांची वेळ येऊ नये, यासाठी स्पष्ट बहुमत असलेल्या नेत्यालाच सत्तास्थापनेचे आमंत्रण देण्याचा अध्यक्षांचा विचार आहे. जर कोणत्याही गटाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर शेवटी संसद बरखास्त करावी लागेल आणि नवीन निवडणूक होईपर्यंत नेतन्याहू हेच केअरटेकर पंतप्रधान म्हणून काम पाहतील. त्यामुळे आता गादी आयझेनकोट अरब पक्षांची अट मान्य करुन सत्ता स्थापन करणार की इस्त्रायलमध्ये पुन्हा निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.