

Iisraeli Airstrike Southern Lebanon: 15 ऑगस्टच्या पहाटे दक्षिण लेबनानमधील एका निवासी इमारतीवर इस्रायलने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले. नबातीह जिल्ह्यातील अंसार परिसराच्या वेशीवर, जरायेह शहराच्या दिशेने असलेल्या एका तीन मजली निवासी इमारतीला इस्रायली लढाऊ विमानांनी थेट लक्ष्य केले. या हल्ल्यात ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली गाडले गेले. लेबनानच्या नॅशनल न्यूज एजन्सीने या घटनेची अधिकृत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके आणि आणीबाणी सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगारा उपसून जिवंत राहिलेल्यांचा शोध घेणे आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. सर्व जखमींना उपचारासाठी नबातीह येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी लागू झालेल्या युद्धबंदीनंतर लेबनानी सीमेच्या आत इस्रायलने (Israel) केलेला हा आजवरचा सर्वात मोठा आणि भीषण हवाई हल्ला मानला जात आहे. याव्यतिरिक्त, इस्रायली विमानांनी नबातीह अल-फौका जवळील अली अल-ताहेर टेकडीच्या आसपासच्या परिसरातही अनेक बॉम्बहल्ले केले.
अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय मध्यस्थांच्या पुढाकाराने 26 जून रोजी बेरुत आणि तेल अवीव यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला होता. लेबनानी सीमेवरुन इस्रायली सैन्याची टप्प्याटप्प्याने माघार सुनिश्चित करणे आणि हिजबुल्लासह इतर सशस्त्र गटांचे निशस्त्रीकरण करणे हा या कराराचा मुख्य उद्देश होता. मात्र, हा करार अस्तित्वात असूनही इस्रायलचे लेबनानमधील लष्करी अभियान थांबलेले नाही.
ताज्या आकडेवारीनुसार, 2 मार्चपासून सुरु झालेल्या या तीव्र संघर्षात आतापर्यंत 4,335 हून अधिक लोकांचा बळी गेला असून 12,277 जण जखमी झाले आहेत. इस्रायली सैन्याने लेबनानी सीमेच्या आत 10 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर घुसखोरी केली असून, या ताज्या हल्ल्यामुळे सीमाभागातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.