Iran Threatens Donald Trump: मध्यपूर्वेतील भू-राजकीय परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली असून अमेरिका आणि इराण यांच्यातील वाकयुद्ध आता टोकाच्या वळणावर पोहोचले आहे. इराणमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत निदर्शनांवरुन अमेरिकेने इराण सरकारला वारंवार इशारा दिला आहे. या वादात आता इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करत हत्येची धमकीवजा इशारा दिल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. इराणने ट्रम्प यांच्यावर झालेल्या मागील हल्ल्याचा संदर्भ देत "यावेळी गोळीचा निशाणा चुकणार नाही" असा प्रक्षोभक संदेश प्रसारित केला.
एएफपी आणि न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या (Iran) सरकारी टीव्हीने जुलै 2024 मध्ये पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे झालेल्या निवडणूक रॅलीचा फोटो प्रसारित केला. या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता, ज्यात गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती आणि ते थोडक्यात बचावले होते. इराणने याच घटनेचा फोटो दाखवत अत्यंत धोकादायक संदेश दिला. "यावेळी निशाणा चुकणार नाही," असे म्हणत तेहरानने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आजवरची सर्वात मोठी आणि थेट धमकी दिली.
इराणकडून ही धमकी अशा वेळी आली आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे इराणमधील अणुकेंद्र किंवा लष्करी तळांवर हल्ल्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अमेरिकेने मध्यपूर्वेतील आपल्या सर्वात मोठ्या लष्करी तळावर सैनिकांची पुनर्रचना आणि हालचाली सुरु केल्याचे दावे केले जात आहेत. वॉशिंग्टन इराणमध्ये अंतर्गत अशांतता पसरवण्याचा आणि बाहेरुन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इराणच्या अधिकाऱ्यांनी केला. जर अमेरिकेने कोणताही लष्करी हल्ला केला, तर आम्ही शांत बसणार नाही आणि चोख प्रत्युत्तर देऊ, असा पवित्रा इराणने घेतला.
इराणमध्ये सध्या खामेनेई सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने होत आहेत. या आंदोलकांना अमेरिकेने पाठिंबा दर्शवल्यामुळे इराण संतापला आहे. सरकारी टेलिव्हिजनवर प्रसारित झालेला हा संदेश ट्रम्प यांच्या विरोधातील वैयक्तिक द्वेष आणि राजकीय दबावाचे प्रतीक मानले जात आहे. या प्रकरणावर अद्याप अमेरिकन व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु सुरक्षा यंत्रणांनी या धमकीची गंभीर दखल घेतल्याचे समजते.
इराणच्या या प्रक्षोभक पावलामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध पूर्णपणे संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. जर अमेरिकेने (America) आपल्या राष्ट्राध्यक्षांना मिळालेल्या या धमकीचा बदला घेण्याचे ठरवले, तर मध्यपूर्वेमध्ये तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.