Indonesia Bus Accident: इंडोनेशियाच्या जावा बेटावर एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक रस्ते अपघाताची घटना घडली. प्रवाशांनी भरलेली एक इंटर-प्रोविंस बस टोल रोडवर अनियंत्रित होऊन उलटल्याने 16 जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भयानक होता की, बसचा चक्काचूर झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बचाव यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सेंट्रल जावा प्रांतातील सेमारंग शहरात असलेल्या 'क्राप्याक टोल-वे'वर घडला. ही बस इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून ऐतिहासिक शहर असलेल्या योग्याकार्ताकडे जात होती. बसमध्ये एकूण 34 प्रवासी होते. टोल-वेवरील एका धोकादायक वळणावर बस आली असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही सुस्साट बस पहिल्यांदा रस्त्याच्या मधोमध असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला जोरात धडकली आणि त्यानंतर वेगात पलटी झाली.
नॅशनल सर्च अँड रेस्क्यू एजन्सीचे प्रमुख बुडियोनो यांनी या दुर्घटनेची माहिती देताना सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच सुमारे 40 मिनिटांत बचाव पथके आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचाव कर्मचाऱ्यांना अत्यंत भीषण दृश्य पाहायला मिळाले. 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता, ज्यांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
रुग्णालयात (Hospital) नेत असताना आणि उपचार सुरु असताना आणखी 10 प्रवाशांनी जीव सोडला, ज्यामुळे मृतांची एकूण संख्या 16 वर पोहोचली. या अपघातात 18 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या दोन वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. बुडियोनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असून 13 जण 'क्रिटिकल' स्थितीत आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
टेलिव्हिजनवरील वृत्तानुसार आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसचा वेग इतका जास्त होता की, बस उलटताच अनेक प्रवासी खिडक्यांतून बाहेर फेकले गेले, तर काही जण बसच्या पत्र्याखाली अडकून पडले. बचाव कार्यासाठी हायड्रोलिक कटर आणि क्रेनची मदत घ्यावी लागली. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून मृतदेह आणि जखमींना तातडीने हलवण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक आणि राहगीर यांनीही पोलिसांना मदत केली.
इंडोनेशियामध्ये (Indonesia) अलीकडच्या काळात मोठ्या दुर्घटनांचे सत्र सुरु असल्याचे दिसत आहे. याआधी सप्टेंबर 2025 मध्ये सिदोअर्जो प्रांतात एक भीषण दुर्घटना घडली होती. तिथे एका इस्लामिक शाळेची इमारत अचानक कोसळल्याने अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. आता या बस अपघाताने पुन्हा एकदा इंडोनेशियातील रस्ते सुरक्षा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून बसमध्ये तांत्रिक बिघाड होता की चालकाचा हलगर्जीपणा, हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. या घटनेमुळे मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.