Iran Anti-Hijab Protests: इराणमध्ये सप्टेंबरपासून हिजाबविरोधी आंदोलन सुरू आहे. सरकार विरूद्ध नागरीक असा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या आंदोलनात सहभागी लोकांवर खटले चालवून त्यांना शिक्षा दिली जात आहे. अशाच शेकडो आंदोलकांना नुकतेच इराणमधील न्यायालयांनी शिक्षा जाहीर केली आहे.
राजधानी तेहरान आणि आसपासच्या न्यायालयांनी हिजाबविरोधी निदर्शनांसाठी 400 जणांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तेहरान प्रांताचे न्यायिक प्रमुख अली अल्घासी मेहर म्हणाले की, न्यायाधीशांनी दंगलखोरांसाठी योग्य निर्णय दिला आहे. 160 लोकांना पाच ते 10 वर्षांपर्यंत, 80 लोकांना दोन ते पाच वर्षांची आणि 160 लोकांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे." संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार तज्ज्ञांच्या अंदाजानुसार इराणमध्ये 15 सप्टेंबरपासून 14,000 हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.
22 वर्षीय महसा अमिनी युवतीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. तिने हिजाब परिधान न केल्याने पोलिसांनी तिला अटक केली होती. सप्टेंबरमध्ये झालेल्या तिच्या मृत्युंनंतर इराणमध्ये निदर्शने सुरू झाली आणि या निदर्शनांनी आता मोठ्या आंदोलनाचे रूप घेतले आहे. जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत इराणच्या संघाने सामन्याआधी राष्ट्रगीत न गाता हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्त कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शनांमध्ये किमान 40 मुलांसह 300 हून अधिक लोक मारले गेले आहेत. इराणच्या पोलिसांनी रोखण्यासाठी बळाचा, अगदी गोळ्यांचाही वापर केला आहे. त्याचबरोबर इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.