Bangladesh Resort Fire Video: बांगलादेशातील कॉक्स बाजार जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. येथील समुद्रकिनाऱ्यावरील एका रिसॉर्टला अचानक भीषण आग लागली. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले.
स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कॉक्स बाजारच्या इनानी भागातील 'टुपटुप रेस्टो अँड रिसॉर्ट'मध्ये ही आग भडकली. मरीन ड्राईव्हजवळ असलेल्या पटुआर्टेक बीचच्या परिसरातील या रिसॉर्टला आग (Fire) लागल्यानंतर अग्निशामक दलाने तातडीने धाव घेतली, परंतु आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, काही तासांनंतर 10 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली. आगीत भाजलेल्या सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी कॉक्स बाजार सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करत आहेत.
स्थानिक वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार, जखमी रुग्णांपैकी काही जण गंभीर भाजले आहेत, तर काहींना उपचारादरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, हे रिसॉर्ट पूर्णपणे लाकूड आणि बाँसपासून बनवलेले तीन मजली होते, ज्यामुळे आग वेगाने पसरली. 'ढाका ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा रिसॉर्टमध्ये सुमारे 30 लोक उपस्थित होते. त्यातील काहीजण कसेबसे जीव वाचवून बाहेर पडले, परंतु इतरांबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना मृतदेह सोपवण्यापूर्वी त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्याचे आदेश दिले आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही आग रिसॉर्टच्या किचनमधून पसरली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासन या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.