Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Chanchal Chandra Bhowmik murder: बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणारे अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. नरसिंगदी जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
Bangladesh Violence
Bangladesh ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणारे अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. नरसिंगदी जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, चंचल चंद्र भौमिक या २३ वर्षीय हिंदू तरुणाची एका गॅरेजमध्ये जिवंत जाळून हत्या करण्यात आली आहे. चंचल हा त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात दहशतीचे वातावरण पसरले असून, पीडित कुटुंबाने हा सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे.

पेट्रोल ओतून बाहेरून लावली आग

मिळालेली माहिती अशी की, चंचल नरसिंगदी येथील पोलीस लाईनजवळील मशिद मार्केट परिसरातील एका गॅरेजमध्ये काम करत होता. शुक्रवारी रात्री तो नेहमीप्रमाणे गॅरेजच्या आत झोपलेला असताना अज्ञात हल्लेखोरांनी बाहेरून शटरवर पेट्रोल ओतले आणि आग लावून दिली. आगीच्या ज्वाला इतक्या वेगाने पसरल्या की चंचलला बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाहेरून आग लावताना स्पष्टपणे दिसत आहे.

Bangladesh Violence
Goa Accident: डोळे पाणावले! रस्ता ओलांडताना भरधाव जीप धडकली, 77 वर्षीय वृद्ध पादचाऱ्याचा अपघाती मृत्यू Watch Video

एक तासाच्या थरारानंतर जळालेला मृतदेह हाती

स्थानिक नागरिकांनी आग लागल्याचे पाहताच अग्निशमन दलाला पाचारण केले. नरसिंगदी अग्निशमन दलाच्या पथकाने सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आग विझल्यानंतर गॅरेजच्या आत चंचलचा पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळला. चष्मदीदांच्या म्हणण्यानुसार, चंचल बराच वेळ आगीत अडकला होता आणि त्याचा अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला.

कुटुंबाचा एकमेव आधार हरपला

चंचल हा मूळचा कुमिला जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावचा रहिवासी होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो रोजगारासाठी नरसिंगदी येथे स्थायिक झाला होता. घरातील तो एकमेव कमावता सदस्य असल्याने त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. "ही केवळ आग नसून आमचा मुलगा हिंदू असल्यामुळे केलेली हत्या आहे," असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

Bangladesh Violence
Goa ST Commissioner: 7 महिन्यांपासून ‘एसटी आयुक्त’चे पद रिक्‍त! 213 दावे प्रलंबित; नियुक्‍तीची शिफारस करणारी फाईल सरकारकडे

बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी दीपू चंद्र दास, अमृत मंडल आणि लिटन चंद्र दास यांच्यासारख्या हिंदू व्यक्तींची जमावाने हत्या केली होती. आता चंचलच्या हत्येमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेशातील मानवाधिकारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com