Climber Murder Case: ऑस्ट्रियातून एक धक्कादायक घटना समोर आली. येथील सर्वात उंच पर्वतावर एका गिर्यारोहक बॉयफ्रेंडवर गर्लफ्रेंडला जाणूनबुजून थंडीत एकटे सोडून दिल्याचा आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, 33 वर्षीय ऑस्ट्रियन तरुणी थंडीमुळे गोठून मरण पावली. तिचा बॉयफ्रेंड तिला पर्वतावर एकटे सोडून खाली उतरला होता. मृत तरुणीची ओळख केर्स्टिन गर्टनर अशी पटली आहे. ती साल्ज़बर्ग येथील रहिवासी होती. सोशल मीडियावर (Social Media) ती स्वतःला 'विंटर चाइल्ड' आणि 'माउंटन पर्सन' म्हणवून घेत होती.
यावर्षी जानेवारी 2025 मध्ये गर्टनर तिचा 39 वर्षीय बॉयफ्रेंड थॉमस प्लाम्बर्गर सोबत ऑस्ट्रियातील सर्वात उंच ग्रॉसग्लॉक्नर पर्वतावर चढाई करत होती, जो एक अनुभवी गिर्यारोहक गाइड होता. याच चढाईदरम्यान गर्टनरचा मृत्यू झाला. आता हे गंभीर प्रकरण कोर्टात पोहोचले आहे.
केर्स्टिन गर्टनरसाठी हा तिचा पहिलाच हाय-अल्टीट्यूड विंटर ट्रेक होता, तर प्लाम्बर्गर एक अत्यंत अनुभवी गिर्यारोहक होता. त्याने या संपूर्ण ट्रेकची योजना आधीच आखली होती. दोघे 18 जानेवारी 2025 रोजी स्टडलग्राट मार्गावरुन चढाई सुरु करण्यासाठी निघाले होते.
अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, ट्रेक मुद्दाम दोन तास उशिरा सुरु करण्यात आला. हवामान खराब असूनही त्यांनी दुर्गम आणि थंडगार परिस्थितीत ट्रेक सुरु ठेवला. रात्री 8:50 च्या सुमारास केर्स्टिनला अति थकवा, थंडी आणि अनेक समस्या जाणवू लागल्या. रात्री 2:00 वाजण्याच्या सुमारास आरोपी बॉयफ्रेंडने तिला शिखरापासून सुमारे 50 मीटर खाली एकटे सोडले आणि स्वतः खाली उतरु लागला.
बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडसाठी उपलब्ध असलेले आपत्कालीन ब्लँकेट याचा जाणीवपूर्वक वापर केला नाही. त्याने इमर्जन्सी कॉल करण्यासाठीही बराच विलंब केला. त्यानंतर त्याने आपला फोन सायलेंट मोडवर ठेवला. या सर्व कारणांमुळे केर्स्टिनला मायनस 20 अंश सेल्सिअस तापमानात सुमारे 6.5 तास सुरक्षा साधनांशिवाय एकटे राहावे लागले.
या घटनेचा तपास पोलिसांनी वेबकॅम फुटेज, फोन रेकॉर्ड्स, स्पोर्ट्स वॉच डेटा आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणाच्या आधारावर पूर्ण केला. तरुणीला वाचवण्यासाठी सकाळी 7:10 वाजता हेलिकॉप्टरने उड्डाण केले, परंतु तीव्र वाऱ्यांमुळे हे बचावकार्य रद्द करावे लागले. पुन्हा सुरु करण्यात आलेल्या बचावकार्यात सकाळी 10:00 वाजता केर्स्टिनचा मृतदेह सापडला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूचे कारण हायपोथर्मिया हे निश्चित झाले.
प्लाम्बर्गरवर घोर निष्काळजीपणाने हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. जर तो दोषी आढळला, तर त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे की, ही एक दुःखद, दुर्भाग्यपूर्ण दुर्घटना होती. या प्रकरणाची सुनावणी 19 फेब्रुवारी 2026 रोजी इंसब्रुक येथील स्थानिक न्यायालयात (Court) होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.