F 35 Fighter Jet Crash Video: जगातील सर्वात प्रगत लढाऊ फायटर जेटपैकी एक मानले जाणारे अमेरिकन हवाई दलाचे F-35 फायटर जेट नुकतेच अलास्कामध्ये क्रॅश झाले. विमानातील बिघाडामुळे हा अपघात होण्यापूर्वी, पायलटच्या धैर्याची एक अविश्वसनीय घटना समोर आली. पायलटला आपला जीव वाचवण्यासाठी पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडावे लागले, पण त्याआधी त्याने तब्बल 50 मिनिटे विमानात राहून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
अपघातापूर्वी (Accident) पायलट विमानात आलेला बिघाड दूर करण्यासाठी इंजिनिअर्ससोबत हवेतच 50 मिनिटे कॉन्फरन्स कॉलवर बोलत होता. अनेक प्रयत्न करुनही जेव्हा विमान वाचवता आले नाही, तेव्हा अखेर त्याने पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. पायलट बाहेर पडताच हे प्रगत फायटर जेट पतंगासारखे हवेत हेलकावे खात खाली आले आणि पाण्यात जोरदार आदळले. पाण्यात आदळल्यानंतर विमानात आग लागली आणि मोठा स्फोटही झाला. या दुर्घटनेच्या वेळी जवळच एक मालवाहू विमान उभे होते, पण सुदैवाने फायटर जेट इतर विमानांपासून लांब पडले, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा आता व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये पायलट पॅराशूटच्या मदतीने सुरक्षितपणे खाली उतरताना दिसत आहे.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, फायटर जेटच्या नाकाकडील आणि मुख्य लँडिंग गियरच्या हायड्रॉलिक लाईन्समध्ये आइसिंगची समस्या झाली, ज्यामुळे ते निकामी झाले आणि हा अपघात झाला. ही घटना 18 डिग्री सेल्सिअस तापमानात घडली. विशेष म्हणजे, याच हवाई तळावर या F-35 च्या अपघातानंतर दुसऱ्या एका जेटमध्ये अशीच हायड्रॉलिक आइसिंगची समस्या आढळली होती. मात्र, सुदैवाने ते जेट सुरक्षितरित्या उतरले होते.
F-35 लढाऊ फायटर जेटचे उत्पादन अमेरिकेची (America) संरक्षण उत्पादन कंपनी लॉकहीड मार्टिन करते. कमी वेळात आणि जास्त खर्चात हे विमान तयार केल्याबद्दल लॉकहीड मार्टिनला टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. मात्र, अलीकडेच अमेरिकेच्या संरक्षण विभागासोबत झालेल्या करारानुसार या जेटची किंमत 2012 मध्ये जवळपास 135.8 दशलक्ष डॉलर होती, ती 2024 मध्ये कमी होऊन 81 दशलक्ष डॉलर झाली. या अपघातामुळे F-35च्या तंत्रज्ञानावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण जगातील सर्वात आधुनिक विमान असूनही ते अशा मूलभूत तांत्रिक बिघाडांमुळे धोक्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.