छत्तीसगड: छत्तीसगडमध्ये एका स्वघोषित ४५ वर्षीय योग 'गुरु'ला जवळजवळ २ किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. गोव्यात भारतीय आणि परदेशी नागरिकांना योग शिकवल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीचे नाव योगी तरुण क्रांती अग्रवाल उर्फ सोनू असे आहे. त्याच्या या अटकेमुळे त्याच्या गूढ जीवनशैलीबद्दल आणि आर्थिक स्रोतांबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
राजनांदगावचे पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हा गुन्हा नारकोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोंदवला आहे. मात्र, पोलीस त्याच्या आर्थिक व्यवहारांचीहीचौकशी करत आहेत, तसेच त्याने १०० हून अधिक देशांना योग शिकवण्यासाठी भेट दिल्याचा दावा करत असलेल्या गोष्टींची सत्यता पडताळत आहेत.
एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, डोंगरगडचाच मूळ रहिवासी असलेला अग्रवाल, दोन दशकांपूर्वी घर सोडून गेला होता आणि अलीकडेच तो परतला. त्याने डोंगरगड मंदिराच्या जवळच्या भागात पाच एकर जमीन खरेदी केली होती, जिथे आश्रम बांधण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, परिसरातून लोकांना आश्रमाच्या आवारात अंमली पदार्थ पुरवले जात असल्याची तक्रार पोलिसांकडे आली. या तक्रारीनंतर २५ जून रोजी त्या जागेवर छापा टाकण्यात आला.
"आम्ही त्याच्या ताब्यातून १.९९३ किलो गांजा जप्त केला आहे. त्याला एनडीपीएस कायद्याच्या कलम २०बी अंतर्गत अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. आम्हाला संशय आहे की तो आश्रमाच्या आवारात ड्रग्ज विकत होता," असे पोलीस अधीक्षक गर्ग यांनी सांगितले.
अटकेच्या वेळी आरोपी गांजाच्या नशेत होता, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने गेल्या दहा वर्षांपासून गोव्यात वास्तव्य केले होते. तिथे त्याने अनेक लोकांना, ज्यात अनेक परदेशी नागरिकही होते क्रांती योग शिकवला. त्याने विविध देशांमध्ये योग शिकवण्यासाठी प्रवास केल्याचा आणि अनेक स्वयंसेवी संस्था चालवत असल्याचाही दावा चौकशीदरम्यान केला. पोलिसांनी अग्रवालचा पासपोर्ट जप्त केला असून, त्याच्या या सर्व दाव्यांची पडताळणी करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.