
मोरजी: धारगळ राष्ट्रीय महामार्ग - ६६ वर ऋषभ उमेश शेट्ये (१७) या महाविद्यालयीन युवकावर केमिकल फेकण्याचा प्रकार सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संशयित निलेश गजानन देसाई (रा. कळणे - दोडामार्ग, महाराष्ट्र) याला करासवाडा येथून अटक करण्यात आली आहे.
जखमी युवकावर गोमेकॉत उपचार सुरु असून, प्रेम प्रकरणातून सदरचा प्रकार घडला असावा, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटना घडल्यानंतर उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, पेडणे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे, मोपा पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर, ठसेतज्ज्ञ, श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे ऋषभचे वडील उमेश हे पोलिस दलात कार्यरत आहेत.
नेमके कोणते रसायन फेकले आहे, याचा उलगडा झालेला नाही. मी पोलिसांना सांगितले आहे की कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा तत्काळ शोध घेऊन अटक झाली पाहिजे. प्रेमप्रकरणामुळे असा प्रकार घडला असल्याची शक्यता आहे.
प्रवीण आर्लेकर, आमदार
नेमके काय घडले?
१) उमेश शेट्ये यांनी ऋषभ याला म्हापसा सारस्वत कॉलेजमध्ये जाण्यासाठी बस स्टॉपवर सोडले होते. त्यानंतर काही वेळाने एक युवक स्कूटरने तेथे आला. त्याने अंगात काळ्या रंगाचा रेनकोट, हॅन्ड ग्लोव्हज व गाडीच्या समोर एक सफेद रंगाची बकेट आणि त्यामध्ये केमिकलयुक्त द्रव पदार्थाची बॉटल होती.
२) दुचाकीवरील युवकाने केमिकलयुक्त पाणी ऋषभच्या चेहऱ्यावर मारले. त्यात ऋषभचा चेहरा, शरिराचा काही भाग जळाला. ऋषभ मदतीसाठी हाका मारू लागला. राष्ट्रीय महामार्गावरून अनेक वाहने येत- जात होती. परंतु कोणीही तेथे थांबले नाही. ऋषभ जखमी अवस्थेत पळत ५० मीटर दूरवर गेला.
३) तेथे एका नागरिकाने आपले वाहन थांबवले आणि त्याला म्हापसा रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करत असतानाच बांबोळी हॉस्पिटलमध्ये त्याला हलवण्यात आले. ज्या बसस्टॉपवर ऋषभ शेट्ये थांबला होता, तेथून १०० मीटर अंतरावर त्याचे नवीन घर आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.