Goa Crime: सुडाने पेटलेल्‍या पित्‍याचा ॲसिड हल्ला, मुलीच्‍या मृत्‍यूला जबाबदार धरून युवकाला केले जखमी, संशयिताला महाराष्ट्रातून अटक

Goa Acid Attack Case: कॉलेजमध्‍ये जाण्‍यासाठी धारगळ येथे बसस्‍टॉपवर उभा असलेला ऋषभ उमेश शेट्ये (१७) या युवकावर ॲसिड फेकण्‍याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी/पेडणे: कॉलेजमध्‍ये जाण्‍यासाठी धारगळ येथे बसस्‍टॉपवर उभा असलेला ऋषभ उमेश शेट्ये (१७) या युवकावर ॲसिड फेकण्‍याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली. त्‍यात तो ४० टक्के भाजला असून, गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नीलेश गजानन देसाई (४२ मूळ कळणे-दोडामार्ग) यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. ऋषभमुळेच आपल्‍या मुलीने मृत्‍यूला कवटाळले असा समज तिच्‍या वडिलांचा म्‍हणजे नीलेशचा झाला होता. त्‍यातूनच सूडभावनेने पेटून त्‍याने हे कृत्‍य केले असावे, असा पोलिसांचा कयास आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, हा प्रकार सोमवारी सकाळी पावणेआठच्‍या सुमारास घडला. उमेश शेट्ये यांनी आपला मुलगा ऋषभ याला म्हापसा सारस्वत कॉलेजमध्ये जाण्यासाठी धारगळ येथे बसस्टॉपवर सोडले व ते निघून गेले. त्‍यानंतर तेथे एकजण स्‍कूटरने आला. त्‍याने अंगात काळ्या रंगाचा रेनकोट, हॅण्‍ड ग्लोव्‍हज घातले होते.

तसेच गाडीच्या समोर एक सफेद रंगाची बकेट आणि त्यात ज्‍वालाग्राही पदार्थ म्‍हणजेच ॲसिड होते. त्‍याने ते एकटाच उभा असलेल्‍या ऋषभच्‍या चेहऱ्यावर फेकले. त्‍यात त्‍याच्‍या डोळ्‍यासह चेहरा आणि शरीराचा काही भाग जळाला. तसेच शर्ट आणि स्‍कूल बॅगसुद्धा जळाली. हे ॲसिड एवढे तीव्र होते की, रस्‍त्‍याच्‍या बाजूचे गवतही जळून गेले आहे.

वेदना होऊ लागल्‍यामुळे ऋषभ मदतीसाठी आरडाओरडा करू लागला. त्‍यावेळी राष्ट्रीय महामार्गावरून अनेक वाहने ये-जा करत होती. परंतु कोणीही तेथे थांबले नाही. त्‍याच अवस्‍थेत ऋषभ ५० मीटर दूरवर ओरडत पळत गेला. त्‍याचे वडील उमेश हे पोलिस खात्‍यात कामाला असतात. तेथील एकाने ऋषभला ओळखले आणि लागलीच त्‍याच्‍या वडिलांना कल्‍पना दिली.

तत्‍काळ ते घटनास्‍थळी दाखल झाले आणि आपल्‍या मुलाला म्हापसा रुग्णालयात नेले. तेथे उपचार केल्‍यानंतर पुढील उपचारांसाठी त्‍याला गोमेकॉत हलविण्‍यात आले आहे. त्‍याची प्रकृती सुधारत आहे. विशेष म्‍हणजे ऋषभ जेथे थांबला होता, तेथून अवघ्‍या १०० मीटर अंतरावर त्याचे नवीन घर आहे.

Goa Crime
Rainforest Challenge Goa: घनदाट जंगल, चिखलाने भरलेल्या वाटा आणि ऑफरोडींगचा थरार, 'रेन फॉरेस्ट चॅलेंज'साठी गोवा सज्ज

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, पेडणेचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे, मोपाचे पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर, ठसेतज्‍ज्ञ, श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्‍यांनी लागलीच तपासकार्य सुरू केले.

चार दिवसांपासून ठेवली होती पाळत

धारगळ येथील बसथांब्याच्या ठिकाणी ऋषभ याच्‍यावर आज ॲसिड हल्ला करणारा नीलेश देसाई याने गेल्या चार दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. ऋषभवर पाळत ठेवली होती. मात्र कोण ना कोण तेथे उपस्थित होत असल्‍याने त्याचा डाव साध्य होत नव्हता. ऋषभ येण्यापूर्वी नेहमी तो त्याची वाट पाहत असायचा.

आपल्‍या मुलीच्या मृत्यूला ऋषभच जबाबदार असल्याचा त्‍याचा ठाम समज झाला होता. आज ऋषभ एकटाच बससाठी उभा होता तर त्याच्यापासून दूरवर काही माणसे होती. हेल्मेट घालून आलेल्या नीलेश याने वृषभच्या अंगावर ॲसिड फेकले. त्याने आरडाओरड केल्यावर नीलेशने तेथून पळ काढला.

कळणेवासीयांना बसला धक्का

नीलेश देसाई याला या प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच कळणे परिसरात खळबळ उडाली. तो कळणे येथे घरगुती खानावळ चालवून खाण कामगारांसाठी जेवण पोहोचवत होता. पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा त्‍याचा परिवार. तिन्ही मुले शिक्षणासाठी गोव्‍यात मामाच्या गावी तळर्ण येथे राहतात. नीलेशच्या मोठ्या मुलीच्या अलिकडेच आकस्मिक निधन झाले. अत्यंत शांत आणि संयमी म्हणून नीलेशची या भागात ओळख आहे.

Goa Crime
Goa News: केरये खांडेपार येथे महिलेचा नदीत जीव देण्याचा प्रयत्न पोलिसांनी शिताफीने अडवला; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

अशा प्रकारात त्याचे नाव येईल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. तोच नाही तर त्याचे पूर्ण कुटुंब अत्यंत शांत आणि कोणत्याही वादात न पडणारे म्हणून ओळखले जाते. दरम्‍यान, मुलीच्या आकस्मिक निधनानंतर नीलेशने कळणे येथील आपला खानावळीचा व्यवसाय बंद करून गोव्यात नोकरी पत्करली होती.

ऋषभची वाटच पाहत उभा होता

ऋषभवर ॲसिड हल्‍ल्‍याची योजना नीलेश याने अगोदरच बनवली होती. आपला प्‍लॅन तडीस नेण्‍यासाठी सोमवारी तो २० मिनिटे अगोदरच दुचाकीने बसस्टॉपजवळ येऊन थांबला होता. हातात हॅण्‍ड ग्‍लोव्‍हज, अंगात काळ्‍या रंगाचा रेनकोट व डोक्‍यावर हेल्‍मेट परिधान केले होते. ऋषभ बसस्टॉपवर आल्‍यावर त्‍याने संधी साधून त्‍याच्‍यावर ॲसिडचा हल्ला केला. दरम्‍यान, घटनेची माहिती मिळताच पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी इस्‍पितळात धाव घेऊन जखमी ऋषभ व त्‍याच्‍या नातेवाईकांची भेट घेतली.

चार दिवस ठेवली होती पाळत : नीलेश देसाई याची मुलगी आपल्‍या मामाच्या घरी पेडणे तालुक्यात राहत होती. ती आणि ऋषभ म्हापसा सारस्वत कॉलेजमध्ये एकत्र शिकायची. गेल्‍या दोन वर्षांपासून त्‍यांच्‍यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पोलिसांनीही त्‍यास दुजोरा दिला आहे. गेल्‍या मे महिन्यात त्‍या मुलीला कावीळ झाली आणि त्‍यातच तिचा मृत्‍यू झाल्‍याचे समजते.

परंतु ऋषभमुळेच आपल्‍या मुलीने मृत्‍यूला कवटाळले असा समज तिच्‍या वडिलांचा म्‍हणजे नीलेशचा झाला होता. त्‍यातूनच सूडभावनेने पेटून त्‍याने हे कृत्‍य केले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. चार दिवस त्‍याने ऋषभवर पाळत ठेवली होती. दरम्‍यान, करासवाडा औद्योगिक वसाहतीत एका चष्‍म्‍याच्‍या कंपनीत कामाला असलेल्‍या नीलेशला संध्‍याकाळी पोलिसांनी ताब्‍यात घेतले.

असे प्रकार पेडण्‍यात कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. हल्लेखोराला तातडीने शोधून काढल्‍याबद्दल पोलिसांचे अभिनंदन. आता त्‍याला जास्‍तीत जास्‍त शिक्षा व्‍हावी यासाठी प्रयत्‍न करणार.- प्रवीण आर्लेकर, आमदार (पेडणे)

या हल्‍ल्‍याचा सर्व थरांतून तीव्र निषेध केला पाहिजे. हा हल्ला केवळ अमानवी कृत्य नसून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्‍याचे चिन्‍ह आहे. एका अल्पवयीन मुलावर ॲसिड फेकणे ही कल्पनाच करवत नाही. - डॉ. प्रतीक्षा खलप, प्रदेशाध्यक्ष महिला काँग्रेस

सीसीटीव्ही बसवा

‘मिशन फॉर लोकल’चे राजन कोरगावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन हे प्रकरण जाणून घेतले व पेडणे पोलिस स्टेशनला भेट दिली. राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही बसवून सरकारने अशा प्रकारांवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्‍यांनी केली.

चहाचा स्‍टॉल उघडला उशिरा

झाला प्रकार सर्वत्र समजताच परिसरात घबराट पसरली. घटना घडली तेथे एक चहाचा स्‍टॉल आहे. एरवी तो सकाळी ७ वाजता उघडतो. परंतु नेमका सोमवारी उशिर झाला. हीच संधी हल्लेखोराने साधली. या परिसरात एका घरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. त्‍यातील फुटेज आणि अन्‍य धाग्यादोऱ्यांच्‍या आधारावर पोलिसांनी संध्‍याकाळी नीलेश देसाई याला ताब्‍यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com