भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. तिचा प्रियकर, सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल याने स्वतः माध्यमांसमोर या संदर्भात मोठा इशारा दिला असून, त्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
२०२५ चा महिला एकदिवसीय विश्वचषक सध्या भारतीय भूमीवर रंगात आला असून, स्मृती मानधना तिच्या दमदार फलंदाजीमुळे संघासाठी सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी इंदूर येथे माध्यमांशी संवाद साधताना पलाश मुच्छल म्हणाला, “स्मृती लवकरच इंदूरची सून बनेल.” त्याचे हे विधान क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाले.
क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांमध्ये मानधनाच्या लग्नाविषयी चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियावर #SmritiMandhana आणि #PalashMuchhal हे हॅशटॅग्स ट्रेंडिंगमध्ये आले असून, दोघांनाही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पलाशने पुढे बोलताना सांगितले की, “मी कदाचित एखाद्या हेडलाइनसाठी कारणीभूत ठरेल, पण एवढेच म्हणायचं की मी भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतो.” त्याच्या या हलक्याफुलक्या विधानाने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
पलाश मुच्छल हा सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक असून, तो इंदूरचा रहिवासी आहे. त्याचा जन्म १९९५ मध्ये झाला. तो प्रसिद्ध गायिका पलाक्षी मुच्छलचा भाऊ आहे. अल्पावधीतच त्याने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या तो एका नवीन चित्रपटासाठी संगीत देत आहे आणि त्यासाठी तो इंदूरमध्ये आहे.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे संबंध गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहेत. दोघे अनेकदा एकत्र दिसतात तसेच सोशल मीडियावरही एकमेकांचे फोटो शेअर करतात. पलाशने स्मृतीच्या वाढदिवसानिमित्त तिला एक खास पोस्ट करून शुभेच्छा दिल्या होत्या.
स्मृती मानधनाचे क्रिकेटमधील योगदान उल्लेखनीय आहे. तिने गेल्या काही वर्षांत भारतीय संघासाठी अनेक महत्त्वाच्या डावांत विजय मिळवून दिला आहे. तिच्या नावावर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. आता तिच्या आयुष्यातील ‘नवीन इनिंग’बद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.