Madhya Pradesh Firecracker Factory Fire Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh: फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 11 जण ठार; सीएम यादव यांनी दिले चौकशीचे आदेश

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील मगरधा रोडवर असलेल्या एका बेकायदेशीर फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला.

Manish Jadhav

Madhya Pradesh Firecracker Factory Fire: मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील मगरधा रोडवर असलेल्या एका बेकायदेशीर फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झाल्याने कारखान्यात भीषण आग लागली.

स्फोट इतके जोरदार होते की, त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. या घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घरात ठेवलेली बारुद फटाक्यांच्या संपर्कात आल्याने आगीने उग्र रुप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे. सीएम मोहन यादव या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. याबाबत त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय पीडित कुटुंबांना भरपाई जाहीर करण्यात आली आहे. जखमींच्या उपचारासाठी भोपाळ (Bhopal), होशंगाबाद (नर्मदापुरम) आणि इतर ठिकाणी डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफला पाचारण केले

अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कारखान्यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ते दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्फोटामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.

आजूबाजूचे लोक घाबरले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 100 हून अधिक घरे रिकामी केली आहेत. त्याचवेळी, स्फोटामुळे 60 घरांचे नुकसान झाले. हरदाचे जिल्हाधिकारी ऋषी गर्ग म्हणाले की, 'हरदा येथील फटाक्याच्या कारखान्यात आग लागली. या स्फोटात अनेक जण जखमी झाले असून, बचावकार्य सुरु आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या (NDRF) टीमनाही पाचारण करण्यात आले आहे.'

मंत्र्यांनी जखमींची भेट घेतली

मध्य प्रदेशचे मंत्री उदय प्रताप सिंह यांनी मंगळवारी हरदा येथील बेकायदेशीर फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. जखमींना भेटण्यापूर्वी मंत्री म्हणाले की, 'आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत.

जखमींना होशंगाबाद आणि भोपाळला हालवण्यात आले आहे. आतापर्यंत 11 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एसडीआरएफ एडीजींच्या मार्गदर्शनाखाली एसडीआरएफची एक टीम काम करत आहे. या घटनेत सुमारे 60 जण जखमी झाले आहेत.'

एसपी-जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो

हरदा फटाका कारखान्याच्या स्फोटावर बेतुलचे भाजप खासदार दुर्गा दास उईके म्हणाले की, 'मी या घटनेबाबत जिल्हाधिकारी, एसपी आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आमचे सर्व अधिकारी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहेत.'

सीएम यादव यांनी खंत व्यक्त केली

या घटनेवर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, 'हरदा येथील फटाका कारखान्याला आग लागल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली. मंत्री श्री उदय प्रताप जी आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

भोपाळ आणि इंदूरमधील वैद्यकीय महाविद्यालये आणि एम्स भोपाळमधील बर्न युनिट्सना आवश्यक तयारी करण्यास सांगितले आहे. याशिवाय, इंदूर आणि भोपाळ येथूनही अग्निशमन दल पाठवण्यात येत आहे.' भोपाळ, होशंगाबाद (नर्मदापुरम) आणि इतर ठिकाणीही डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी भरपाई जाहीर केली

"जखमींवर मोफत उपचार केले जातील. पीडितेच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेशही मी दिले असून गृहसचिव याबाबत अहवाल सादर करतील, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

11 जणांचा मृत्यू झाला

बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला तर 60 हून अधिक जण जखमी झाले. हरदा जिल्ह्यातील बैरागढ भागातील जवळपास 60 हून अधिक घरांमध्ये पसरलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 100 हून अधिक घरे रिकामी केली आहेत. कारखान्यात सतत स्फोट होत आहेत. प्रशासनाला मदत करण्याचा प्रयत्न करणारे स्थानिक रहिवासी धीरेंद्र सैनी म्हणाले की, 'सध्या घटनास्थळावरुन सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.'

हरदाचे एसपी संजीव कांचन म्हणाले, 'फॅक्टरीमध्ये मंगळवारी सकाळी मोठा स्फोट झाला. संपूर्ण शहर काळ्या धुराने झाकोळले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. हरदा, बैतुल, खंडवा आणि नर्मदापुरम येथून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. सीएम यादव यांनी या संपूर्ण घटनेची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली आहे.'

आगीचे कारण कळू शकले नाही

मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात फटाक्यांसाठी ठेवलेल्या गनपावडरच्या संपर्कात आल्यानंतर आगीने उग्र रुप धारण केले. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. लोक सैरावैरा धावताना दिसत होते. कारखान्यातून उठणाऱ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरुन दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सध्या कारखान्यात आगीचे कारण समजू शकलेले नाही. जवळपासच्या घरांनाही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT