Nigar Sultana Breaks Silence Allegations: बांगलादेश महिला क्रिकेट संघाची कर्णधार निगार सुलताना ज्योती हिच्यावर सध्या कनिष्ठ खेळाडूंशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. तिची अनुभवी सहकारी खेळाडू जहाँआरा आलम हिने हे आरोप केल्याने बांगलादेश क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, आता कर्णधार निगार सुलताना हिने या आरोपांवर मौन सोडले असून, हे आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले.
बांगलादेशातील 'कालेर कंठो' (Kaler Kantho) या वृत्तपत्राशी बोलताना जहाँआरा आलमने निगार सुलतानावर थेट आरोप केले. जहाँआराच्या दाव्यानुसार, निगार सुलताना कनिष्ठ खेळाडूंशी अत्यंत वाईट वागते. मारहाणीचा आरोप करताना जहाँआरा म्हणाली की, दुबई दौऱ्यावर असताना निगारने एका खेळाडूला थप्पड मारली होती. मात्र या आरोपामुळे बांगलादेश महिला क्रिकेट संघातील अंतर्गत तणाव समोर आला.
त्याचवेळी, आता स्वत:वर झालेल्या या गंभीर आरोपांनंतर निगार सुलतानाने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपली बाजू मांडली. तिने हे सर्व आरोप फेटाळून लावत, तिला बदनाम करण्याचा प्रयत्न (Defamation) सुरु असल्याचे म्हटले.
"मी काही बोलत नाहीये, याचा अर्थ असा नाही की मी बोलू शकत नाही. ही एका व्यक्तीची नसून संपूर्ण संघाची टीम आहे. जेव्हा संघ सर्वोत्तम कामगिरी करत आहे, त्याचवेळी असे नकारात्मक कमेंट्स, वैयक्तिक हेवेदावे, राग आणि वाईट भाषेचा वापर पाहायला मिळतो, तेव्हा दुःख होते. मला आश्चर्य वाटते, कारण जे लोक आता अशी भाषा वापरत आहेत, ते एकेकाळी संघाच्या यशापयशात सोबत होते आणि संघावर प्रेम करत होते. जेव्हा एखादी खेळाडू संघातून बाहेर पडते किंवा फॉर्ममध्ये नसते आणि तिची जागा दुसरी खेळाडू घेते, तेव्हा त्या व्यक्तीला संघातील प्रत्येक गोष्ट वाईट वाटू लागते."
निगारने पुढे स्पष्ट केले की, अफवा पसरवून तात्पुरते लक्ष वेधले जाऊ शकते, पण त्याचा दीर्घकाळ कोणताही परिणाम होत नाही. तिने टीमवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांबद्दल आदर व्यक्त केला.
दुसरीकडे, कर्णधार निगार सुलतानावर झालेल्या या गंभीर आरोपांनंतर बांगलादेश (Bangladesh) क्रिकेट बोर्ड (BCB) देखील बचाव करण्यासाठी पुढे आले. बीसीबीने जहाँआरा आलमने माध्यमांना दिलेले विधान चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. बोर्डाने हे सर्व आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळून लावले. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला संघ प्रगती करत असताना अशा प्रकारची विधाने करुन संघाला बदनाम केले जात आहे, याबद्दल बोर्डाने नाराजी व्यक्त केली.
एकंदरीत, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि कर्णधार निगार सुलताना यांनी या आरोपांना एकत्र येत विरोध केला असून, हे प्रकरण आता वैयक्तिक हेवेदावे आणि संघातील जागेच्या स्पर्धेतून उद्भवले असल्याचे सूचित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.