CBSE Class 10 Board Exam
पणजी: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने दहावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याबाबत मसुदा आणि नियमावली तयार केली आहे. वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा घेण्याची अंमलबजावणी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल. या मसुद्यानुसार वर्षातील पहिली बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये आणि दुसरी मे महिन्यात होईल, अशी माहिती सीबीएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
दहावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याबाबतचा मसुदा सार्वजनिक केला जाईल, यानंतर 9 मार्चपर्यंत त्यांना अभिप्राय देण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. यानंतर धोरण अंतिम केले जाणार आहे. मसुद्याच्या नियमांनुसार, CBSE इयत्ता 10वी बोर्ड परीक्षांचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत होईल, तर दुसरा टप्पा 5 ते 20 मे या कालावधीत पार पडेल.
'दोन्ही बोर्ड परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमाच्या आधारे घेतले जातील. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांसाठी समान परीक्षा केंद्रे दिली जातील. दोन्ही परीक्षांचे परीक्षा शुल्क अर्ज दाखल करतेवेळी निश्चित केले जाईल आणि विद्यार्थ्यांना ते नोंदणीच्या वेळी जमा करावे लागेल.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) ने शिफारस केल्यानुसार, बोर्ड परीक्षेतील जोखीम दूर करण्यासाठी, सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त दोन वेळा परीक्षा देण्याची परवानगी दिली पाहिजे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या धोरणात्मक बदलावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मसुद्यानुसार, CBSE वर्ग 10 च्या परीक्षेचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे आणि दुसरा टप्पा 5 मे ते 20 मे या कालावधीत पार पडेल. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया 34 दिवस चालणार असून त्यात 84 विषयांचा समावेश असेल.
2026 मध्ये सुमारे 26.60 लाख विद्यार्थी CBSE इयत्ता 10वीच्या परीक्षेत बसण्याची अपेक्षा आहे. भविष्यातही, CBSE 10वी बोर्डाच्या परीक्षा दरवर्षी 15 फेब्रुवारी आणि 5 मे नंतर पहिल्या मंगळवारी सुरू होतील. 10वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या प्रस्तावाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यामुळे त्यांच्यावरील परीक्षेचा ताण कमी करणे हा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.