siya shirwaikar food blogger Dainik Gomantak
ब्लॉग

Siya Shirwaikar: फुड ब्लॉगर असणे म्हणजे...

या ब्लॉगरपैकी फुड ब्लॉगरना मिळणारी लोकप्रियता तर विशेष असते.

गोमन्तक डिजिटल टीम

Siya Shirwaikar: चैतन्यशील समाजमाध्यमांनी ब्लॉगर या एका नव्या पंथाला जन्म दिला आहे. आपापल्या विषयात तज्ज्ञ असलेल्या ह्या ब्लॉगर्सना नंतर त्यांच्या कामामुळे विलक्षण अशी प्रतिष्ठाही लाभली.

त्यापैकी अनेक ब्लॉगरना ‘सिलेब्रिटी स्टेटस’ही लाभले आहे. या ब्लॉगरपैकी फुड ब्लॉगरना मिळणारी लोकप्रियता तर विशेष असते.

कारण खाद्यपदार्थ हा सर्वांच्याच आकर्षणाचा व आवडीचा विषय असतो. फुड ब्लॉगर आपल्या पोस्टमधून ज्या जागेची अथवा खाद्यपदार्थांचे स्तुती करतात ती जागा अथवा तो खाद्यपदार्थ आपल्या मनातील कप्प्यात अनेकजण आनंदाने ‘सेव्ह’ करून ठेवतात.

कधीतरी त्याठिकाणी जाऊन तो खाद्यपदार्थ चाखेन अशी सुप्त मनीषा त्यात असते. फुड ब्लॉगरनी इन्स्टाग्राम अथवा फेसबुकवर टाकलेली छायाचित्रे धुंडाळण्यात विंडो शॉपिंगमध्ये असणारा आनंदच असतो.

फुड ब्लॉगर हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असतो. त्यांना चवदार खाद्यपदार्थ मिळणाऱ्या जागेचा शोध कसा लागतो, ती जागा खवय्यांसाठी योग्य आहे की नाही हे ते कसे ठरवतात, याबाबत कुतूहल असते. गोव्याची सर्वात लोकप्रिय फूड ब्लॉगर सीया शिरवईकरकडून यासंबंधात बोलताना फार रोचक अशी माहिती मिळाली.

सीयाने आपल्या इन्स्टाग्राम पानावर शहरानुसार माहिती अपलोड केलेली आहे त्यामुळे कुठल्या शहरात कुठल्या ठिकाणी, कुठला खाद्यपदार्थ उत्तम मिळतो याची माहिती व्यवस्थित मिळू शकते. तुम्ही  विशिष्ट शहरात खाण्यासाठी एखादे चांगले ठिकाण शोधत असाल तर तिथल्या स्थानिक लोकांना विचारायची गरज नाही.

(किंवा त्यांना विचारूनही माहिती मिळेल याची खात्री नाही.) सीयाच्या cya_94 yaa इन्स्टाग्राम पेजवर जा. तुम्हाला नक्कीच अनवट ठिकाणे सापडतील. या पेजवर फक्त ठिकाणांची नावेच नव्हे तर तिथला मेनू, पदार्थांची किंमत, पार्किंगची उपलब्धता, तिथले वातावरण वगैरे सगळी माहिती तुम्हाला तपशीलवार मिळेल.

ब्लॉगरचे प्रामाणिक असणे  सीयाला सर्वात महत्त्वाचे वाटते. ब्लॉगरच्या पोस्टवर अवलंबून राहून एखादा ग्राहक रेस्टॉरंटमध्ये गेला तर त्याचा विरस होऊ नये याची काळजी ब्लॉगरने  घ्यायलाच हवी. सीया जेव्हा  एखाद्या ठिकाणाला भेट देते तेव्हा ती तिथल्या  आरोग्यदायी  वातावरणाला (हायजीन) प्रथम प्राधान्य देते. त्यानंतर पदार्थांचा स्वाद, सादरीकरण या बाबींचा क्रमांक येतो.

ब्लॉगरना वेगवेगळ्या जागा कशा ठाऊक होतात? सीयाने आपल्या ब्लॉगची सुरुवातच गोव्यातील छोट्या पण प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांना भेट देऊन केली होती. उदा. फर्मागुढी येथील प्रसिद्ध वडापाव किंवा अमुक ठिकाणची रोस-आम्लेट इत्यादी.

पण आता त्यानंतर साधारण तीन वर्षांच्या काळात तिचे इतके हिंडणे झाले आहे की अशा अनेक जागा आता तिला ठाऊक झाल्या आहेत. ‘स्थानिक’ व्यक्ती देखील तिच्या माहितीची स्त्रोत असते. सीया म्हणते. ‘दीर्घ अनुभवामुळे काही जागा आपोआप माझ्या लक्षात येतात. माझी नजर आता जणू तयारच झाली आहे.’

नवीन रेस्टॉरंट सुरू झाले की अनेकदा रेस्टॉरंटचे मालक स्वतःहून तिला फोन करून निमंत्रण देतात. अर्थात हा व्यवहार व्यावसायिक स्तरावरचा असतो. उच्च दर्जाची रिसॉर्ट, तारांकित हॉटेले, यामधील खाद्यपदार्थांचा रिव्यू करण्यासाठी ती आपली फी आकारते.

पण जर सीयाला तिथले अन्न किंवा वातावरण आवडले नाही तर त्याबद्दल ती आपल्या पोस्टमधून लिहिणे टाळते व त्यांच्याकडून आपले मानधनही स्वीकारत नाही. स्थानिक रेस्टॉरंटना मात्र सीया स्वतःहून आपल्या पोस्टमध्ये स्थान देते. किंबहुना स्थानिक व्यवसायाला पाठबळ देणे हाच तिचा उद्देश असतो.

ब्लॉग लिहायला सुरुवात केल्यापासून सीयाने गेल्या तीन वर्षांत सुमारे 1000 रेस्टॉरंटस्‌ना भेट दिली आहे. (म्हणजे दिवसाला जवळपास एक!) प्राधान्याने ही सर्व ठिकाणे गोमंतकीय आहेत. गोव्याबाहेरच्या काही ठिकाणांबद्दलही तिने आपल्या ब्लॉगमधून लिहिले आहे.

प्रतिष्ठित अशा हॉस्टेलमध्ये किंवा रिझॉटमध्ये एखादा विशेष इव्हेंट आयोजित होत असल्यास अशा इव्हेंटसाठी नामांकित ब्लॉगरना खास निमंत्रण असते. निमंत्रितांच्या यादीमध्ये सीयाचे नाव कदाचित बरेच वर असू शकते. कारण इन्स्‍टाग्रामवर तिला फॉलो करणाऱ्या तिच्या चाहत्यांची संख्या सव्वा लाखावर आहे. तिथल्या एखाद्या पदार्थासंबंधी तिने चांगले लिहिणे ही त्यांची अप्रत्यक्ष जाहिरात असते.

समाजमाध्यमाने (सोशल मीडिया) समाजात एका वेगळ्या स्वातंत्र्याची उद्‍घोषणा केली आहे. या स्वातंत्र्यामुळे अनेक वेगवेगळे व्यवसायही निर्माण झाले आहेत. सीया या समाजमाध्यमांचे महत्त्व कबूल करते. अर्थात ती जशी सामर्थ्यवान आहे तशीच ती विध्वंसकही आहे.

त्यामुळे आपला व्यवसाय व दर्जा सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येकाला कसून घ्यावी लागते. विक्रेता आणि ब्लॉगर या दोघांवरही ही जबाबदारी असते.  सीया म्हणते, ‘चाहत्यांची विश्वासार्हता जपायची असेल तर समाजमाध्यमांनी आपल्याला जी मर्यादा आखून दिली आहे, ती ओलांडता कामा नये.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT