Gomantak Editorial ‘घर पाहावे बांधून’ ही केवळ म्हण नाही. गृहनिर्माण संकल्पनेमागील कष्ट, कथा आणि व्यथांचा खडतर प्रवास त्यात सामावला आहे. या कलियुगात घराच्या स्वप्नपूर्तीला गवसणी घालताना होणारी दमछाक वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही.
म्हणूनच सभापती रमेश तवडकर यांच्या पुढाकारातून अवघ्या ३ महिन्यांत ‘श्रमधाम’ योजनेद्वारे काणकोण तालुक्यातील 20 कुटुंबांना निराधार अवस्थेतून स्वतःच्या वास्तूत आणण्याच्या महत्कार्याचे दिलखुलासपणे कौतुक व्हायलाच हवे.
याच संकल्पनेद्वारे आणखी 500 घरे उभारण्याचा मानसही त्यांनी यापूर्वी व्यक्त केला आहेच. स्वार्थप्रेरित भावनेतून पदरमोड करून मतांसाठी नागरिकांना मांडलिक करणाऱ्या ‘परोपकारा’च्या संकल्पनेला छेद देणारे नवे गृहीतक तवडकर यांनी प्रत्यक्षात साकारले हे विशेष.
काणकोणात झालेल्या घरबांधणीसाठी स्वेच्छेने कुणी श्रमदान केले, तर कुणी अर्थरूपी साह्य केले. कुणाची वीट, तर कुणाचा चिरा. लोकसहभागातून उभारलेल्या वास्तू समता आणि बंधुतेची जिवंत प्रतीके ठरतील.
एखाद्या लोकप्रतिनिधीच्या पुढाकारातून असा बडा प्रयोग गोमंतकात यापूर्वी झाला नव्हता. म्हणूनच नागरी एकजुटीतून आणि आपलेपणाच्या नात्यातून परोपकाराची मनोकामना वृद्धिंगत करणारी ‘श्रमधाम’ गोमंतकाच्या कालपटलावर नोंदली जाईल, यात संदेह नसावा.
प्रामाणिक विचारांच्या बळावर उभ्या राहणाऱ्या सामाजिक योजनेला यश मिळते, हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे. जमिनीचा तुकडा आहे, पण लोकांच्या डोक्यावर छप्पर नाही, ही जाणीव अणकुचीदार काट्याप्रमाणे टोचणे हीच संवेदनशीलता लोकप्रतिनिधीची खरी ओळख असते.
दुर्दैवाने असे राजकारणी विरळच. तवडकर हे आदिवासी समाजातून प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आले आहेत. गरिबी अनुभवलेल्या या माणसाला भूक, पैशांची चणचण ठाऊक आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या तवडकरांनी उभारलेली बलराम शिक्षण संस्थाही अनेक आर्थिक दुर्बल घटकांसाठी वरदान ठरली आहे.
लोकोत्सवासारख्या आयोजनातून सामाजिक समरसता आणि आर्थिक उन्नयनाचे त्यांचे प्रयत्न आदर्शवत आहेत. ‘गाव करीत ते राव काय करील’ याची प्रचिती काणकोणमध्ये आली आहेच; त्याचा पुनर्प्रत्यय राज्यातील सर्व मतदारसंघांत यावा.
तवडकर यांच्या संकल्पनेतून व अनेक दात्यांच्या योगदानातून साकारलेली श्रमधाम योजना उर्वरित आमदार, मंत्र्यांनीही जरूर राबवावी. ‘भाजयुमो’ने तसा पुढाकार घेतला आहे, हे उल्लेखनीय. सामाजिक कार्यासाठी सरकारी योजनाच कशासाठी हवी, हे श्रमधाम योजनेने दाखवून दिले आहे.
अन्यथा आजपावेतो ‘पंतप्रधान गृहनिर्माण योजने’तून राज्यात शेकडो घरे साकारली गेली असती. एरवी अन्य राज्यांत सर्व धर्मांतील उपेक्षित लोकांना ‘पंतप्रधान गृहनिर्माण’चा लाभ झाला आहे. उपरोक्त योजना गोव्यातच कागदावर राहिली.
गरीब नाहीत असा पोकळ दावा करण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीचे ‘रोल मॉडेल’ काणकोणातील प्रकल्प ठरला आहे. अर्थात अपवाद वगळता दीनांच्या उन्नयनाच्या अपयशाचे सत्ताधाऱ्यांना काही सोयर सुतक नाही, हेदेखील वास्तव आहे.
परंतु, मुख्यमंत्र्यांनी भविष्यात तरी उत्तर जरूर शोधावे. सरकारच्या लालफितीच्या कारभारासमोर लोकसहभागातून विधायक अर्थाने ‘राईचा पर्वत’ घडू शकतो, हे श्रमधाम योजनेच्या यशस्वितेने दाखवून दिले आहे.
लाभार्थींच्या नयनी दिसणारे कृतज्ञतेचे भाव आणि त्यांना लाभणारी सुखाची निद्रा ‘श्रमधाम’चे फलित असेल. आपल्या गावात डोक्यावर छप्पर नाही, असे कुणी राहू नये, अशा दृढ सामाजिक जाणिवांचा समुच्चय झाल्यास सामान्य नागरिकही उपेक्षितांना चार भिंती उभारून देऊ शकतील, असा विश्वास निर्माण करण्यात ‘बलराम चॅरिटेबल ट्रस्ट’ यशस्वी ठरली आहे.
लोकप्रतिनिधी जे काही करतात ते आपल्या मतांच्या बेगमीसाठी करतात, असा समज समाजामध्ये दृढ झाला आहे. अर्थात त्याला पोषक व पूरक कार्यही झाले आहे. पण ‘श्रमधाम’बाबत उल्लेखनीय बाब म्हणजे यातील लोकसहभाग.
जो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही सुखावून गेला. लोकशाहीत लोकांना, त्यांच्या मताला गृहीत धरले जाते. लोकही निवडून दिलेल्या उमेदवारावर जबाबदारी ढकलून मोकळे होतात. त्यामुळे समाजरचनेमध्ये लोकप्रतिनिधीकडून कामाची आणि तळागाळातील लोकांकडून दिशादर्शक चारित्र्याची अपेक्षा ठेवली जाते.
वास्तविक नेमके उलट झाले पाहिजे; लोकसहभागातून काम झाले पाहिजे आणि नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीने समाजाला वस्तुपाठ ठरेल, असे चारित्र्यसंपन्न असले पाहिजे. सत्ता आणि संपत्तीच्या मायाजालात गुरफटलेल्या सामाजिक कार्याला लोकसहभागातून लोकाभिमुख केल्याने समतेची आणि बंधुत्वाची भावना जोपासली जाणे शक्य आहे.
सभापतींना हे सुचावे यात त्या व्यक्तीचे, पदाचे श्रेष्ठत्व आहे. लोकशाही मूल्यांची ही जाणीवच लोकांच्या हृदयात घर करून राहील. लोकशाही जिवंत ठेवेल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.