Chair Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: खुर्च्या

खुर्च्या बघितल्या की माणसाच्या गरजा कशा वाढत जातात याचा साक्षात्कार मला होतो.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रा. विनय ल. बापट

आमच्याकडे घरीच मेस्ताने केलेल्या दोन लाकडी खुर्च्या होत्या आणि एक आईबाबांनी लग्नानंतर सदाशिवगडावरून विकत घेतलेली आरामखुर्ची. याशिवाय एक मोठे चौकोनी टेबल, त्यावर चढून वरच काही काम करता येईल असे लांब खुरांचे टेबल आणि एक लाकडी बाक!

त्यावेळी आमच्या घरात फर्निचर म्हणून एवढेच होते बाकी सगळी कामे जमिनीवर बसूनच होत असत. या दोन लाकडी खुर्च्या, घराचे काम करताना जे काही फळ्यांचे तुकडे उरले होते ते वापरून आपा मेस्ताने केल्या होत्या.

हा आपा मेस्त मूळचा कवठीचा. बाबांनी घराच्या कामासाठी त्याला मुद्दाम बोलावून आणला होता. मोजकेच पण विनोदी बोलणारा. त्या दोन्ही खुर्च्या तशा बऱ्याच जड होत्या. म्हणजे जमिनीला शेण काढायचे असे तेव्हा यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्याचे काम आमच्यावर येई आणि आम्हांला चांगलाच घाम फुटत असे.

यातील एक खुर्ची पुढच्यादारी ठेवलेली असायची कधीतरी छायाताई तिच्यावर बसून व पुस्तके, वह्या टेबलावर ठेवून अभ्यास करीत असे. दुसऱ्या खुर्चीला आम्ही ‘मशीनची खुर्ची’ म्हणत असू. कारण मशीनवर बसून कपडे शिवण्यासाठी आई तिचा वापर करीत असे. ती कायम मशीनच्या शेजारीच ठेवलेली असे.

आमची आई त्या काळात आजूबाजूच्या तीन-चार गावात कपडे शिवण्यासाठी प्रसिद्ध होती. अनेक बायका आपल्या चोळी, पोलके शिवण्यासाठी आईकडे येत असत. धावे, वरचेवाडा, सोनाळ, उस्ते या सर्व गावांतून ‘काकाची आई’, ‘मोन्याची आई’, ‘राणी मामी’, ‘चेपा राणी’, ‘कासलें’ नामक बायका आईकडे कपडे शिवायला येत असत.

याशिवाय दयुची आई, अनिलची आई, लताची आई, सुलभा काकू अशा पण अनेकजणी येत असत. अनेकवेळा लहान मुलींचे स्कर्ट, झगे इत्यादीदेखील आई शिवत असे. त्याशिवाय आमच्या घरी घालण्याच्या चड्या आणि बाबांचे लेंगे हेदेखील आईच शिवत असे. मजा म्हणजे ती कुठे क्लासला जाऊन शिकली नव्हती तर असेच दुसऱ्यांचे बघून शिकली होती.

अनेकवेळा शिवणे आणि ते परत उसवणे आणि परत शिवणे असे चक्र अनेकवेळा चालत असे. ‘थूऽऽ!’ असा शब्द आईने उच्चारला की आम्ही समजायचो आता जे शिवलेय ते उसवायला सुरुवात होणार. त्यावेळी शिलाई तरी किती ब्लाऊज पाच रुपयांपेक्षाही कमी पैशात शिवून देत असे.

एकदा बायकोसोबत मी तिचे ब्लाऊज शिवायला देण्यासाठी पणजीतील प्रतिष्ठित दुकानात गेलो आणि तेथील बाईने एक ब्लाऊज शिवायला साडेचारशे रुपये सांगितले हे ऐकून मी शिक्षक सोडून शिंपी झालो असतो तर बरे झाले असते, असे अगदी मनापासून वाटले.

आरामखुर्ची ही जरा प्रेस्टिजियस होती. म्हणजे बाबा घरी असले की तेच आरामखुर्चीत बसत असत. काशीचा भट वर्षातून एकदा आमच्याकडे येत असे आणि आपला अगडबंब देह सांभाळत जेव्हा तो या खुर्चीत बसत असे तेव्हा अई आणि बाबांच्या पोटात धाकधूक होत असे.

या खुर्चीला जे पाठचे दोन खूर होते त्यांना अग्रभागी दोन बारीक खिळे होते आणि पुढच्या दोन खुरांना दोन भोके होती. त्या भोकात ते खिळे बरोबर बसवून ती खुर्ची बसण्यासाठी नीट लावावी लागे. ती व्यवस्थित लागली नाही आणि त्याच्यात कोणी बसला तर पडलाच म्हणून समजा.

एकदा छायाताई लहान असताना ती खुर्ची व्यवस्थित न लावली असताना छायाताईला घेऊन बाबा त्यात बसले आणि तिला घेऊन खाली पडले. त्यांनी आपण पडल्याचा राग मात्र आईवर काढला. त्यानंतर बाबांशी आठ दिवस न बोलता राहून आईने आपल्या अपमानाचा बदला घेतला होता.

या खुर्चीला कापड घालावे लागायचे आणि त्याला वर खाली रूळ घालावे लागत. हे रूळदेखील कोणी हळूच काढून ठेवले तर बसणारा दणकन खाली पडत असे. एकूण ही खुर्ची म्हणजे ’डेलिकेट डार्लिंग’ होती. पण यात बसण्याचा आनंद काही औरच होता.

साधारण १९८५मध्ये आम्ही दोन खाटा करून घेतल्या आणि त्यासोबत एक जरा लांबट छोटे टेबल करून घेतले व ते या आराम खुर्चीच्या समोर घेऊन अभ्यासाला बसणे अत्यंत सोईचे झाले. मी माझा दहावीपासून एम. ए. पर्यंतचा अभ्यास या खुर्चीत हे टेबल समोर घेऊन केला आहे.

एरवी माझे अक्षर म्हणजे सरस्वतीलादेखील, ‘आपण ही कोणती लिपी निर्माण केली आहे’, असा प्रश्न पडावा असे. पण या खुर्चीत बसून समोर ते टेबल ठेवून लिहिले तर माझे अक्षर मलाच ओळखता येऊ नये एवढे सुंदर यायचे.

१९९०नंतर आमची आर्थिक परिस्थिती थोडीथोडी सुधारली आणि आमची खुर्च्यांची गरजही वाढू लागली. त्याच काळात महेशचे वाळपईत फर्निचरचे दुकान झाले आणि त्याच्या दुकानातून अनेक खुर्च्या आमच्या घरात आल्या. अगोदर दोन लोखंडी खुर्च्या आल्या. त्यानंतर आमच्याकडे होत्या तशाच आरामखुर्चीसारख्या पण थोड्या वेगळ्या दोन खुर्च्या आणल्या.

मग प्लॅस्टिक पर्व सुरू झाले आणि प्लॅस्टिकच्या काही खुर्च्यांनी घरातील जागा अडवली. आताही घरातील सर्व खुर्च्या प्लॅस्टिकच्याच आहेत. डायनिंग टेबल आले आणि त्यासोबत सहा खुर्च्या आल्या.

हळूहळू त्या दोन लाकडी खुर्च्या आणि बऱ्याच नंतर आरामखुर्चीही अडगळीत गेली. मजा म्हणजे त्यानंतर आणलेल्या खुर्च्या कुठे नाहीशा झाल्या काही कळलेच नाही. पण या सुरुवातीच्या तिन्ही खुर्च्या आमच्या अडगळीत अजूनही आहेत.

आजकाल खुर्चीसाठी लोक काय काय करतात हे आपणाला माहीत आहे. परंतु लहान असताना खुर्चीसाठी आमची विशेष कधी भांडणे झालेली आठवत नाहीत. फक्त आरामखुर्चीत बसण्यासाठी कधीतरी भांडलो असू. या खुर्च्या बघितल्या की माणसाच्या गरजा कशा वाढत जातात याचा साक्षात्कार मला होतो.

अगोदर या तीन खुर्च्या, दोन टेबले आणि एक लाकडी बाक यावर आमचे सगळे भागत असे. लाइट नव्हती त्यामुळे दिव्याच्या प्रकाशात सगळे जेवण होत असे आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर नुसत्या मातीच्या जमिनीवर अंग ढकलून दिले की ‘कुंभकर्णी झोप’ लागत असे. शेणाने सारवलेल्या जमिनीचा वासही आवडत असे.

दोन वर्षांअगोदर मी पणजीच्या फ्लॅटमध्ये आठ-नऊ लाख खर्च करून अंतर्गत सजावट करून घेतली. वजनदार गाद्या आणल्या, एसीदेखील बसवला आहे. पण काय माहीत, ती ‘कुंभकर्णी झोप’ मात्र येत नाही. आता झोप कुठे हरवली आहे हे शोधायचे तर धाव्याच्या मातीत हरवलेल्या माझ्या मुळांनाच विचारले पाहिजे. कदाचित त्या मुळांकडे माझ्या प्रश्नांचे उत्तर असेलही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Andha Salim Arrested: खून, खंडणी, दरोडा, घरफोड्या करणाऱ्या 'अंधा सलीम'ला अटक; गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकात गुन्हे

Boriem Bridge: बोरी पुलासाठी हवीये आणखीन जागा! 'या' 3 गावांसाठी MoRTHची नवी अधिसूचना, आक्षेप घेण्यासाठी 21 दिवसांची मुदत

मंत्रिपद नाही पण मायकल लोबोंना महामंडळ मिळाले; माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांना कला अकादमीच्या अध्यक्षपदाची लॉटरी

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

SCROLL FOR NEXT