सखाराम बोरकर
गेल्या वर्षीची गोष्ट. माझा मुलगा ऑफीसमधून येताना छत्री विसरून आला. त्याने ती नवीनच विकत घेतली होती. आपल्या वस्तूंबाबत अत्यंत काळजी घेणारा असल्यामुळे जरा हिरमुसला झालेला होता.
मी म्हटले, ‘अरे छत्री ही विसरण्यासारखीच गोष्ट आहे. ती माझी जुनी छत्री घेऊन जा. पावसाळा भर विसरणार नाही’. आणि मला माझे जुने दिवस आठवले.
छत्री आणि मी यांचा ’छत्तिसाचा आकडा’. आजपर्यंत छत्रीचे आणि माझे कधीच पटले नाही. पावसाळ्यात घेतलेली छत्री पूर्ण पावसाळा कधीच माझ्यापाशी टिकली नाही. कधी चार दिवसांनी, कधी आठ दिवसांनी तर कधी पंधरा दिवसांनी छत्री हमखास हरवायची.
एकदा तर माझ्या हातून विक्रम झाला. गोव्यात पावसाळा सुरू व्हायचा होता. पाऊस केरळात पोहोचला होता. ऐनवेळी गडबड नको म्हणून मी मडगावच्या एका प्रसिद्ध दुकानातून छत्री विकत घेतली. छत्री घेऊन मी वर्तमानपत्र घेण्यासाठी एका नेहमीच्या गाडेवजा दुकानात गेलो.
त्याच्या ‘नाबी’वर छत्री लटकविली आणि सुटे पैसे देण्यासाठी खिशांत हात घातले. पैसे दिले. पेपर घेतला, थेट घरी आलो. मी छत्री विकत घेतल्याचे पार विसरूनच गेलो होतो. बऱ्याच वेळाने मला छत्रीची आठवण झाली आणि कपडे करून परत बाजारांत निघायला तयार झालो.
‘आताच तर बाजारातून आला आहात. आता कसले काम काढले?’ इति बायको. हिला सर्व सांगितले असते तर तिथेच मला व्याख्यान ऐकावे लागले असते. ‘काही नाही! मित्राकडे जातो’, अशी लोणकढी थाप मारून मी निसटलो.
थेट त्या पेपरवाल्यांकडे आलो. ’नाबी’वर छत्री नव्हती. पेपरवाल्यांकडे छत्रीची चौकशी केली. ‘इथे इतकी गिर्हाइके येतात. कोणावर नजर ठेवू? आपली वस्तू आपणच सांभाळायची असते’ त्याने वरून मला हे सुनावले. मी खजील होऊन घरी आलो.
गेल्या पावसाळ्यात नवीन छत्री घ्यायची नाही, घरात असलेली एक जुनी छत्री वापरायची, असे ठरवले. पूर्ण पावसाळा मी ती अर्धी मोडकी छत्री घेऊनच निभावला. आश्चर्याची बाब म्हणजे ती मोडकी छत्री त्या पूर्ण पावसाळ्यात माझ्याकडून हरवली नाही. मला आठवण आहे त्याप्रमाणे मी पहिल्यांदाच छत्री वापरली ती इयत्ता चौथीत. तिसरीपर्यंत मी रेनकोट वापरायचो.
कोकणीत त्याला ’कापोत’ म्हणायचे. पण बरोबरचे सर्व मित्र छत्री घेऊन यायचे. पावसात हातात छत्री घेऊन जाण्यात जी मजा असते ती रेनकोटमध्ये कुठे? मी वडिलांकडे मला छत्री आणण्याचा हट्ट धरला. संध्याकाळी वडिलांनी त्यावेळची महाग अशी लाकडी दांड्याची ’हरण छाप’ छत्री आणून दिली.
‘खूप महाग आहे, ती हरवू नको’, अशी तंबीही दिली. त्या दिवशी माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. केव्हा सकाळ उजाडते आणि मी ती नवीन कोरी छत्री शाळेत घेऊन जातो असे मला झाले. रात्री झोपण्यापूर्वी, ‘देवा उद्या सकाळी पाऊस पडू दे!’, अशी आर्त प्रार्थनासुद्धा केली.
खरोखरीच सकाळी शाळेत जाताना पावसाच्या सरी आल्या. मी मोठ्या दिमाखाने छत्री उघडून त्या पावसात शाळेत गेलो. सर्व मित्र माझ्या छत्रीची स्तुती करायला लागले. माझ्यासारखी छत्री इतर कोणाकडेही नव्हती. वर्गात शिरताना मी ती ओली छत्री घेऊनच माझ्या जाग्यावर बसायला निघालो. गुरुजींनी ते बघितले.
‘ती ओली छत्री त्या डब्यात ठेव!’ गुरुजींनी आदेश दिला. मी नाइलाजाने छत्री घेऊन डब्यापाशी आलो. मास्तरांनी माझी छत्री हातात घेऊन म्हटले, ‘छान आहे छत्री! ठेव त्या डब्यात’. माझा ऊर अभिमानाने भरून आला. मी वर्गात बसलो होतो हे खरे, पण पूर्णवेळ माझे लक्ष छत्रीवर होते.
सर्वांच्या छत्रीपेक्षा माझी छत्री उठून दिसत होती. मधल्या सुट्टीला मी बाहेर गेलो नाही. छत्रीवर लक्ष ठेवूनच बसलो. शाळा सुटल्यावर छत्री हातात घेऊन माझ्या मित्रासोबत घराची वाट चालू लागलो. वाटेवर एका आंबाड्याच्या झाडाला लहान लहान आंबाडे लागले होते. मी माझ्या मित्रासोबत त्या झाडावर दगड मारू लागलो.
मी माझी छत्री तिथेच एका कठड्याला लावली होती. इतक्यात ’शूऽऽ’ असा आवाज आला. आम्हांला वाटले की त्या झाडाचा मालक आला. आम्ही सर्वांनी धूम ठोकली. या गडबडीत मी छत्री घेण्याचे विसरलो. घरी आई माझी वाट पाहत उभी होती. तिने मला बघताच विचारले, ‘छत्री कोठे?’ मी आईला घडलेला प्रकार सांगितला.
आम्ही दोघेही छत्री शोधण्यास बाहेर पडलो. छत्री थोडीच मिळणार होती? रात्री आईने वडिलांना माझा पराक्रम सांगितला. वडिलांना राग अनावर झाला. ‘आता मी नवीन छत्री आणणार नाही, जाऊ दे त्याला शाळेत, तो जुना रेनकोट घालून’. त्यांचे फर्मान. त्या दिवसापासून माझे आणि छत्रीचे संधान जुळलेच नाही.
खरेच पावसात छत्रीची गरज आहे काय? अनंत काणेकर यांचा ’मनाचे पिंजरे’ असा एक निबंध आहे. त्या निबंधात लेखक म्हणतात, ’पावसाळा अदमासे चार महिने म्हणजे एकशेवीस दिवस असतो. पैकी फार तर साठ दिवस पडतो.
म्हणजे उरले साठ दिवस. त्यातून तीस दिवस तर तो रात्रीचा पडतो. राहिले तीस दिवस. तोही काही सारखा समान पडत नाही. आपण घरातल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी असता निदान पंधरा दिवस तरी पावसाचे असतात.
म्हणजे फक्त पंधराच उरले, थोडा रिमझिम पाऊस असला तर जाता-येता कुठे तरी झाडाखाली किंवा कोपऱ्यात पाच मिनिटे थांबून आपण न भिजत सहज घरी येऊ शकतो, असे सात दिवस तरी असतात. आता आठच दिवस राहिले.
आपण जायला- यायला आणि जोराचा पाऊस पडायला - असा योगायोग फ़ार तर चार वेळा असतो. चार महिन्यातून केवळ चार वेळा छत्रीचा आपल्याला उपयोग होतो, आणि इतक्या जोराच्या पावसात आपण छत्री असून भिजतोच! तरीही आपण वाटेल ती किंमत देऊन छत्री विकत कशाला घ्यायची?’
मला लेखकाचे विचार पटतात. तरीसुद्धा मी छत्री दर पावसाळ्यांत विकत घेतोच. ती हरवण्यासाठी!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.