Greek Culture: ॲक्रोपॉलीस म्युझियम

ॲक्रोपॉलीस म्युझियममध्ये ग्रीसचा जगज्जेता राजा अलेक्झांडरचेही शिल्प आहे. पण या म्युझियममधली अतिशय आकर्षक शिल्पे सामान्य ग्रीक नागरिकांची आहेत.
Greek Culture
Greek CultureDainik Gomantak

दत्ता दामोदर नायक

थेेन्समधला ग्रीक समाज गुलाम पद्धतीविषयी जेवढा अनुदार होता तेवढाच विचारवंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला घाबरणारा होता. अन्यथा सॉक्रेटिसला हेमलॉक प्यावे लागले नसते. ॲरिस्टॉटलवर आत्महत्या करण्याची पाळी आली नसती.

वास्तविक अथेन्समध्ये जागोजागी ‘अगोरा’ होते. अगोरा म्हणजे गप्पा मारण्यासाठी, संभाषण करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, सार्वजनिक भाषण करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी ठेवलेल्या मोकळ्या जागा. ग्रीक संस्कृती अंतर्गत विरोधाभासाच्या पायावर उभी होेती.

नगर, राज्यांच्या लोकशाहीची संकल्पना राबवणारी ग्रीक संस्कृती जेवढी प्रगमनशील होती तेवढीच सनातनी होती. ग्रीक संस्कृती नियतीशरण होती. देव वा दैव मानणारी होती. ‘ॲज फ्लाइज टू वॉन्टन बॉइज आरे वी टू द गॉड्स. दे किल अस फॉर देअर स्पोर्टस्’, या किंग लियरमधल्या शेक्सपियरच्या विधानाला मानणारी ती संस्कृती होती.

कौल (ऑरेकल) ज्योतिष या अंधश्रद्धा ग्रीक संस्कृतीत होत्या. ऐहिक जगात सुखी होणे शक्य नाही. मरणांतच चिरंतन सुख आहे, असे काही ग्रीक तत्त्वज्ञांना वाटते. कॉल नो वन हॅपी अनटिल ही इज डेड अँड बरीड (कुणालाही मरेपर्यंत व त्यानंतर पुरेपर्यंत सुखी म्हणू नका) हे उद्गार ग्रीकांचे निराशावादी तत्त्वज्ञान अधोरेखित करतात.

असे असले तरी ऐहिक जीवनातील सुखोपभोगाकडे ग्रीक संस्कृतीने पाठ फिरवली नाही. जीवनाची क्षणभंगुरता माहीत असल्यामुळेच ऐहिक सुखाचा भोग ग्रीक उत्कटतेने घेत.

Greek Culture
Blog: मोक्षविचार

ग्रीकांची वेगळी खाद्यसंस्कृती आहे. ग्रीसमध्ये द्राक्षे भरघोस पिकतात. द्राक्षांची वाइन, बकरीच्या दुधापासून केलेले दही, भरपूर ऑलिव्ह ऑइल घालून केलेले मुसाका, सुवाकिया, गायरोस यासारखे पदार्थ, बीफ, पोर्क, मटण, चिकन, मासे यांच्या मसालेदार नसलेल्या तरीही चवदार पाककृती यामुळे ग्रीक खाद्यसंस्कृतीला जागतिक खाद्यसंस्कृतीच्या महालात वेगळे दालन द्यावे लागेल.

पिस्ता, बदाम, अक्रोड, हॅजलनट, लोणी, मध आणि गुलाबजल घालून मोठ्या कौशल्याने बहुपदरी केलेला ‘बकलावा’ हा इथल्या हलव्याचा प्रकार आहे. ग्रीसमध्ये करण्यात येणाऱ्या बकलावात येशू ख्रिस्ताच्या वयाएवढे म्हणजे ३३ थर असतात.

रसगुल्ला बंगाली की ओडिया हा वाद संपत नाही तसा बकलावा मूळ तुर्की की ग्रीक याबद्दल संभ्रम आहे. अर्थात बकलावा आपलाच आहे असा ग्रीकांचा दावा आहे. ग्रीस आणि ग्रीक संस्कृती हाच मुळी गोड, स्निग्ध, बहुस्तरीय बकलावा आहे !

अथेन्स शहर हाच मुळी ओपन म्युझियम असला तरी अथेन्समध्ये असलेल्या सुमारे पन्नास म्युझियमपैकी किमान ॲक्रोपॉलीस म्युझियमला भेट दिलीच पाहिजे. या म्युझियममध्ये अथीना व नायके ह्या देवतांची शिल्पे आहेत. नायके ही पंख असलेली, त्यामुळे वेगात उडू शकणारी विजयदेवता आहे. विख्यात बूट कंपनीने नायके या नावाचा ब्रॅण्ड केला आहे.

ॲक्रोपॉलीस म्युझियममध्ये ग्रीसचा जगज्जेता राजा अलेक्झांडरचेही शिल्प आहे. पण या म्युझियममधली अतिशय आकर्षक शिल्पे सामान्य ग्रीक नागरिकांची आहेत. खांद्यावर कोकरू घेऊन जाणारा खेडवळ माणूस, छोट्या पाडसाला उचलून नेणारा वृद्ध, निरागस चेहऱ्याची छोटी मुले ही शिल्पे मनाला भुरळ घालतात.

Greek Culture
Blog: विद्याधर हा शुद्ध क्षत्रिय असावा का?

पण, अथेन्समधले मला सर्वांत आवडलेले म्युझियम म्हणजे तिथला बाजार. जुन्या अथेन्समधला प्लाका बाजार हे अथेन्समधले जिवंत म्युझियम आहे.

स्वादिष्ट फळे आणि सुगंधी फुलांच्या माळा, सुकामेवा आणि मिठाई, ऑलीव्ह ऑइल आणि ग्रीक प्रोबायोटिक दही, मध आणि रोज सिरप, जॅलेटो आणि आइस्क्रीम, अत्तर आणि मध, ताजे फडफडीत मासे आणि भाजलेले, ग्रील्ड केलेले खमंग मासे, कपडे आणि दागिने, खेळणी आणि सोव्हिनिअर्स विकणाऱ्या दुकानांनी गजबजलेला प्लाकाचा बाजार हे अथेेन्समधले ॲक्रोपॉलीसनंतरचे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

प्लाकाचा बाजार स्वच्छ आणि सुंदर आहे. फ्लाकामध्ये पावलोपावली फोटो पॉइंट्स सापडतात. फोटो पॉइंट्स म्हणजे तुम्हांला फोटो काढावेसे वाटावे असे स्थळ. पाश्चात्त्य देशात दोन प्रकारचे फोटो पाइंट्स असतात.

मोकळ्या जागी स्ट्रीट फर्निचर उभे केले की तो एक सुंदर फोटो पॉइंट बनतो. स्ट्रीट फर्निचरमध्ये बसण्यासाठी बाक किंवा खुर्ची असते. त्यावर बसलेले सामान्य नागरिकांचे शिल्प असते. तुम्हांला शिल्पाशेजारी बसून फोटो काढता येतो.

अथेन्समध्ये असे कृत्रिम फोटो पॉइंट्स नाहीत. पण अथेन्सच्या प्लाका बाजारात रस्तोरस्ती, जागोजागी आपल्याला नैसर्गिक, जिवंत फोटो पॉइंट्स सापडतात. एकेकाळी निवडक लोकांसाठी असलेल्या फोटोग्राफीच्या छंदाचे मोबाइल फोनवरील कॅमेऱ्यामुळे लोकशाहीकरण झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com