Goa Politics
Goa Politics Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Politics: देवळात जाऊन काँग्रेसमधून न फुटण्याची घेतली होती शपथ...?

दैनिक गोमन्तक

Goa Politics: गोव्याचे राजकारण आता एका नव्या वळणावर येऊन पोहचले आहे. काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे वळण जास्तच अधोरेखित झाल्यासारखे वाटायला लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावेळी काँग्रेसने देवावर हवाला ठेवून निवडणूकीत उडी घेणे. काँग्रेसच्या सर्व 36 उमेदवारांनी पणजीच्या श्री महालक्ष्मी देवळात तसेच चर्च व दर्ग्यामध्ये जाऊन काँग्रेसमधून न फुटण्याची शपथ घेतली होती.

देवाला प्रमाण केले म्हणजे माणूस घाबरतो अशी एक प्रथा आहे. त्यामुळे हे राजकारणी या प्रमाणाला धरून राहतील, अशी एक सर्वसाधारण अपेक्षा होती. अर्थात काहींनी त्यावेळी सुद्धा या शपथेची थट्टा उडविली होती. हे आमदार देवाला सुद्धा बधणार नाही, असे त्यावेळी बोलले जात होते. शपथ घेणाऱ्यांत अर्थातच दिगंबर कामत सर्वात पुढे होते. सर्वात ज्येष्ठ आमदार असल्यामुळे त्यांचा तो हक्कच होता. त्यांनीच इतर उमेदवारांना शपथा दिल्या होत्या. त्याशिवाय या ३६ उमेदवारांनी न फुटण्याचे प्रतिज्ञापत्रही दिले होते. पण आता खऱ्यांनीच तो एक मोठा फार्स ठरल्याचे प्रत्ययाला येत आहे.

मुळात देवळात चर्चेत व मशिदीत जाऊन शपथबद्ध होण्याचे कारणच काय होते, हेच कळत नाही. म्हणजे त्यावेळीच काही आमदारांच्या मनात फुटण्याचे कुटील कारस्थान जन्म घेत असावे, असेच वाटते. दिगंबरांना मुख्यमंत्री व्हायचे असल्यामुळे इतर उमेदवारांवर देवाच्या नावाने मानसिक दबाव आणण्याचा तो प्रकार असावा, असेही वाटते. झालेही तसेच, सत्ता मिळत नाही हे बघताच काँग्रेसचे आमदार सैरभैर झाले.

खास करून दिगंबर कामतांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंग झाल्यामुळे काँग्रेसमध्ये राहण्यात अर्थ नाही, याचा त्यांना साक्षात्कार झाला. मग पक्षातून फुटण्याचे नियोजन सुरू झाले. पण, आठ आमदार हाताला मिळत नाही म्हणून सहा महिने फुकट गेले. शेवटी हे कारस्थान तडीस गेलेच. तसे पक्षातून फुटणे हे आता गोव्याला तरी नवीन राहिलेले नाही. लोकांनी अनेक पक्षांतरे पाहिली आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटल्याप्रमाणे गोव्यात सगळे काही चांगले आहे, फक्त आमदारांच्या या इकडून तिकडून होणाऱ्या उड्या एवढेच ती काय वाईट गोष्ट आहे. पण मजा म्हणजे गडकरींचा भाजपच पक्षच याबाबतीत नायक बनला आहे. त्यामुळे गडकरींचे हे शब्द निवडून देणाऱ्या जनतेला जसे लागू होतात तसेच ते त्यांच्या भाजपला लागू होतात यात शंकाच नाही. पण यावेळी कमालच झाली.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपण देवाचा प्रसाद घेतला व देवाने आपल्याला तुला हवा तो निर्णय घे मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगितले असल्याचे प्रतिपादन केले. आणि यावर सोशल माध्यम तसेच विविध मीडियावरून टीकेचा डोंब उसळत असून तो अद्यापही शमलेला नाही. यापूर्वी जी पक्षांतरे झाली ती माणसानींच केली होती. त्याला देवांचा आर्शीवाद असल्याचे कोणीही सांगितले नव्हते. पण आता दिगंबर कामतांनी एकदम देवालाच गोव्याच्या राजकारणात आणून सोडले आहे.

दरम्यान, यामुळे पुढे गोव्याच्या राजकारणात देवाची महत्त्वाची भूमिका राहील, यात शंकाच नाही. पण हे करताना दिगंबर चर्च व दर्ग्याला सोयिस्करपणे विसरले, असे दिसते. हिंदूच्या देवाने जर दिगंबरांना कौल दिला असेल तर मग चर्च व दर्ग्याचे काय? का त्यांनीही दिगंबरच्या फुटीरवृत्तीला पाठिंबा दिलाय, असे म्हणावे? राजकारणी कसे आपल्या सोयीचे राजकारण खेळतात किंवा खेळू शकतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दिगंबर कामतांचे हे वक्तव्य.

यापूर्वी 2005 साली दिगंबर कामतांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये उडी घेतली होती. आणि तो धक्का माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे शेवटपर्यंत पचवू शकले नव्हते. आता दिगंबर कामतांनी गोमंतकीय जनतेलाच धक्का दिला आहे. ते फुटले म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या फुटीरपणाला देवाचा पाठिंबा असल्याचे सांगितले म्हणून.

सामान्य जनता ही नेहमीच देवभक्त असते. माणसाकडे खोटे बोलणारे सुद्धा देवापुढे खोटे बोलताना कचरत असतात. पण आजचे राजकारणी एवढे निगरगट्ट झाले आहे की त्यांना माणसे सोडाच, देवसुद्धा अडवू शकत नाही असेच वाटायला लागले आहे. आणि यामुळेच भविष्यात आता राजकारणाचे आणखी किती धिंडवडे निघणार हा प्रश्‍न पडायला लागला आहे.

मुख्य म्हणजे जनतेने विश्‍वास तरी कोणावर ठेवायच? काँग्रेस उमेदवारांनी देवाला स्मरून पक्षाशी प्रामाणिक राहणार असल्याची शपथ घेतल्यामुळे लोकांनी काँग्रेसला मतदान केले असावे असे म्हणायला जागा आहे. पण आता लोकांच्या विश्‍वासालाच सुरुंग लागताना दिसायला लागला आहे. पाच वर्षांकरिता लोकांनी निवडून द्यायचे व नंतर त्यांचा तमाशा बघायचा, असे आता गोव्यात तरी सर्रासपणे व्हायला लागले आहे.

निवडणुकीत काही अर्थ राहिला आहे असे वाटत नाही. खरेतर राजकारणात देवापेक्षा माणसाने स्वतःच्या मनाला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे. पक्षाला रेडिमेड आमदार मिळत असतील तर मग निवडणुकीकरिता खर्च तरी का करायचा, हा प्रश्‍नही उपस्थित व्हायला लागलाय. देवाचे नाव घेऊन मतदारांच्या भावनेशी खेळायचे व नंतर त्याच भावनेला तुडवायचे असे प्रकार आता यापुढे होतच राहातील.

दिगंबर कामत यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीच्या उत्तरार्धात एक वेगळा नीतीपाठ लोकांना गिरवायला दिला आहे. आणि आता यापुढे होणाऱ्या अधोगतीला किंवा लोकशाहीच्या दुर्गतीला कामतांसारखेच दिग्गज नेते जबाबदार धरले जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT