New Zuari Bridge Dainik Gomantak
ब्लॉग

New Zuari Bridge: पूल नेमका सेल्फीसाठी बांधलाय की लोकांसाठी? मुख्यमंत्र्यांनाच पडलांय विसर

New Zuari Bridge: पूल हा दोन टोकांना जोडण्यासाठी बांधला जातो, पण ‘इव्हेंट’ करण्यात गुंतलेल्या सरकारला याच गोष्टीचा विसर पडला आहे.

दैनिक गोमन्तक

New Zuari Bridge: पूल किंवा सेतू हे दोन टोकांना जोडण्यासाठी बांधले जातात. पण, प्रत्येक गोष्टीचा ‘इव्हेंट’ करण्यात गुंतलेल्या सरकारला याच गोष्टीचा विसर पडला आहे. पूल लोकांच्या वाहतुकीसाठी आहे, तुम्ही त्याच्या उद्घाटनाचा इव्हेंट करून त्याची प्रसिद्धी ‘कॅश’ करण्यासाठी नाही.

दररोज 38 किमी एवढे रस्त्याचे बांधकाम पूर्ण करणे, 100 तासांमध्ये 50 किमी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करणे, फक्त 24 तासांमध्ये अडीच किलोमीटर रस्त्याचे बांधकाम पूर्ण करणे आणि फक्त 21 तासांमध्ये 26 किमी लांब रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करणे असे अनेक विक्रम ज्यांच्या नावे आहेत असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या नावाने किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे नव्हे तर आपल्या कामाने ओळखले जाणारे नेते आहेत.

रस्ते आणि पूल या माध्यमातून त्यांनी भारत खऱ्या अर्थाने जोडला आहे. इतकेच नव्हे तर भारताला विकासाच्या मार्गावर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गोव्यातील अटल सेतू असो किंवा मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असो, त्यांचे योगदान विसरण्याचा कोतेपणा कुठलाही गोमंतकीय कधीही करणार नाही.

पूल व रस्ते या माध्यमातून भारत प्रवाही व्हावा हे ध्येय बाळगणाऱ्या या धडाडीच्या नेत्याला, आपल्याला उद्घाटनासाठी वेळ नाही म्हणून पूल वाहतुकीस बंद ठेवणे कदापि आवडणार नाही, रुचणार नाही आणि पटणारही नाही. नवीन झुआरी पूल वाहतुकीसाठी त्वरित खुला होणे किती आवश्यक आहे, त्यासाठी उद्घाटन होईपर्यंत थांबणे चुकीचे आहे, ही बाब मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली नाही, हे त्यामागचे सत्य आहे.

कोणत्याही वर्षी डिसेंबर व त्यापाठोपाठ येणाऱ्या जानेवारी महिन्यात पर्यटकांची गर्दी ही जवळपास गोव्याच्या एकूण लोकसंख्येएवढी, किंबहुना त्यापेक्षाही जास्त असते. आधीच कोणतेच नियोजन न करता जिथे तिथे रस्ते खणून ठेवल्यामुळे वाहतूक कोंडी होणे ही नित्याचीच बाब झाली आहे.

पणजीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आलेले पैसे नियोजित वेळेत खर्च केले नाही, या कारणासाठी परत जायची पाळी आली, तेव्हा कुठे सरकार जागे झाले. वाट फुटेल तिथे रस्ते खणणे सुरू झाले. पणजीत कुठे आग लागलीच तर ती विझवण्यासाठी बंब सर्व काही भस्मसात झाल्यावरही पोहोचणार नाही याची खातरजमा सरकारने केली आहे. पणजीत होणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळून कित्येक पर्यटक आल्या पावली परतले आहेत.

झुआरी पूल बांधायला सुरुवात केल्यापासून वाहतूक कोंडी होतच होती. मडगावातून किंवा वास्कोतून पणजीत पोहोचायला जेवढा वेळ लागेल त्याच्या कितीतरी पट जास्त वेळ फक्त कुठ्ठाळीत कोंडीत अडकल्यामुळे वाया जात असे. इतका काळ, प्रचंड त्रास सहन करून एकदाचा पूल तयार झाला. आता उद्घाटनासाठी गडकरी उपलब्ध नाहीत म्हणून पूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे सरकारच्या नाकर्तेपणाचे ढळढळीत उदाहरण आहे. हजारो पर्यटक केवळ पूल पाहण्यासाठी म्हणून आले होते. कित्येक तास तेही रांगेत अडकून पडले होते.

पूल वाहतुकीसाठी खुला न करता लोकांना पाहण्यासाठी, सेल्फीसाठी खुला करणे म्हणजे कीर्तन सुरू होत नाही तोपर्यंत तमाशा बघा, असेच झाले. लोकांना फिरण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी पूल आहे की, वाहतूक जलद मार्गी लागावी यासाठी आहे? वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांच्या हालअपेष्टांविषयी ना सरकारला काही पडले होते, ना पुलावर मौजमजा करणाऱ्यांना, ना वाहतूक पोलिसांना.

1983 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तेव्हा नव्याने बांधून तयार झालेल्या झुआरी पुलाचे उद्घाटन करायला येणार होत्या. काही कारणांमुळे त्यांचे येणे पुढे ढकलले. तेव्हा तत्कालीन वाहतूक एस. पी. असलेल्या किरण बेदी यांनी कुणाचीही तमा न बाळगता पूल वाहतुकीसाठी खुला केला. हे धाडस आताच्या अधिकाऱ्यांमध्ये नावालासुद्धा नाही. सगळे वर्णी लागलेले लाचार, सरकारचे मिंधे झाले आहेत.

वास्तविक परिस्थितीची, लोकांना भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांची जाणीव मुख्यमंत्र्यांना करून देण्याची हिंमत एकाच्याही ठिकाणी नाही. हाताबाहेर जात चाललेली वाहतूक व्यवस्थेची कोंडी फोडण्यासाठी नवा झुआरी पूल खुला करा हे सांगण्यासाठी एकटाही तोंड उचकटत नाही. याच वाहतूक कोंडीत अडकलेल्या राज्यपालांसाठी वाट मोकळी करून द्यायला जी तत्परता वाहतूक पोलिसांनी दाखवली, तेवढी तत्परता सामान्य माणसासाठी कधीच दाखवली जात नाही.

आभासी पद्धतीने नवीन झुआरी पुलाचे उद्घाटन करणे शक्य होते. पण, प्रत्येक कामाचे श्रेय लाटण्याची, साजरे करण्याची आणि छोट्याशा कामाचाही मोठ्ठा इव्हेंट करण्याची जी सवय सरकारला लागली आहे, त्यापुढे लोकांचे हाल कुणालाही नकोसे झाले आहेत. नवीन पूल झाला म्हणून कौतुकाचा वर्षाव व्हायला हवा होता, तिथे पर्यटक आणि सामान्य गोमंतकीय शिव्यांची लाखोली वाहत आहेत.

प्रकाशझोतात राहण्याचा हा सोस, सरकारला आणखी अंधारात ढकलत आहे, सामान्य जनतेपासून दूर घेऊन जात आहे. केंद्रात गडकरी किंवा मोदी ज्या ध्येयाने प्रेरित आहेत, ते ध्येय गाठण्याच्या प्रयत्नांपासून, आस्थेपासून गोव्यातील भाजपचे नेते खूपच दूर आहेत. भरकटले आहेत. त्यांनी केलेल्या कामाचे मातेरे कसे करावे, याची अहमहमिका गोव्याच्या नेत्यांत लागली आहे. काम करण्यापेक्षा फोटो काढून चमकण्यात जास्त स्वारस्य आहे.

गोमंतकीय मतदार मते देतात ती, केलेले काम पाहून. किती फिती कापल्या ते पाहून नाही. उद्घाटने, सोहळे, इव्हेंट यातून मते मिळवण्याच्या भ्रमात मुख्यमंत्र्यांनी राहू नये. हे सगळे खेळ करण्याऐवजी नवीन झुआरी पूल खुला केला असता, तर तो प्रत्यक्ष उद्घाटनापेक्षाही कितीतरी पटीने मोठा इव्हेंट झाला असता. वाहतूक कोंडीत अडकलेल्यांचे श्वास आणखी कोंडू नयेत म्हणून आतातरी पूल खुला करा! पूल लोकांसाठी बांधला आहे, उद्घाटनासाठी नाही हे ध्यानात असू द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सात दिवसांचा थरारक ट्रेक! पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सर केले किलिमांजारो शिखर, ठरले भारतातील 'पहिले महापौर'!

Vijayanagara Empire Goa: राजा देवराय याने 'गोवा' आपल्या आधिपत्याखाली आणला, विजयनगर साम्राज्याचा इतिहास

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाने षटकारांच्या बाबतीत रचला इतिहास, 50 वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

Beti Ferry Boat: 'बेती' फेरीबोट प्रकरणाबाबत धूसरता; सरकारकडे चौकशी अहवाल सादर, पण 'ते' कारण अद्याप गुलदस्त्यात

Goa Politics: विरोधकांमधील फूट पुन्हा उघड! 'त्या' बैठकीवरुन सरदेसाईंचे युरींवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT