Sewage System: मलनिस्सारण प्रकल्प होणे अत्यंत गरजेचे अन् अनिवार्य

Sewage System: शहरांत तसेच मोठ्या लोकवस्तीत मलनिस्सारण प्रकल्प होणे अत्यंत गरजेचे व अनिवार्य आहे.
Sewage System
Sewage System Dainik Gomantak

Sewage System: मागच्या लेखात आपण गोव्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. आज गोव्याची सांडपाणी प्रक्रिया व मलनिस्सारण व्यवस्थेवर दृष्टिक्षेप टाकू. गोवा हे महानगर नसल्याने व लोकसंख्या पण अतोनात नसल्याने, इथे मलनिस्सारण व्यवस्थेची प्रगती तेवढी झाली नाही, जेवढी पाणीपुरवठ्याची झाली. याचे कारण असे की, पाणी जसे एकदम गरजेचे व अपरिहार्य आहे, तसे मलनिस्सारण तेवढे गरजेचे व महत्त्वाचे ठरलेले नाही.

त्याशिवाय मलनिस्सारण करायला दुसरे काही स्थानिक उपाय असतात व अद्ययावत मलनिस्सारण व्यवस्था उभी करणे अत्यंत महागडी असते. या विविध कारणांमुळे या व्यवस्थेला भूतकाळात तेवढी प्राथमिकता मिळाली नाही.

भारतीय संस्कृतीत दोन विषय एकदम दुर्लक्षित केले गेलेले आहेत. पहिली म्हणजे स्मशान व्यवस्था. दुसरी म्हणजे शौच व मलनिस्सारण व्यवस्था. पूर्वी लोक उघड्यावर शौचाला बसायचे. बंद शौचालय अशी संकल्पनाच नव्हती. नंतरच्या काळात थोड्या सधन घरांत शौचालये बांधली गेली. पण ती घरापासून दूर असत.

कारण इथे तयार होणारे मलमूत्र व विष्ठेची रासायनिक प्रक्रिया करायला कसलीच व्यवस्था उपलब्ध नव्हती. एकतर ते बाजूच्या ओढ्यांत किंवा नाल्यांमध्ये वाहून जात असे किंवा जमिनीत जिरून जात असे. काही ठिकाणी डुकरासारखी जनावरे वापरली जात. मोठ्या शहरांत हे शक्य नसायचे म्हणून पाणीविरहित शौचालयातील सगळ्या गोळा झालेल्या शौच व विष्ठा डब्यामध्ये भरून भंग्याच्याद्वारा डोक्यावरून वाहून नाल्यांत किंवा कुठल्या ओसाड जाग्यांवर टाकला जात असत.

Sewage System
Shiroda Goa: शिड्डोटे येथे खाजन शेतीच्या बांधाला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

दरम्यान, ही परिस्थिती एकदम हलाखीची होती व एकूण एक चित्र एकदम अमानुष, क्रूर आणि मानव सन्मानाच्या विरुद्ध होते. ही डोक्यावरून मलमूत्र किंवा विष्ठा वाहून नेण्याची व्यवस्था गोव्यात, पणजीच्या काही भागांत अलीकडेपर्यंत प्रचलित होती.

त्यानंतर स्थानिक पद्धतीने मलमूत्र व सांडपाणी प्रक्रिया करण्याचे तंत्र अंगीकारले गेले. याच्यात एक जमिनीत मलमूत्र प्रक्रिया टाकी (सेप्टिक टँक) बांधली जाते, ज्यात कप्पे असतात. त्यात जसे सांडपाणी व मलमूत्र आत शिरले की जिवाणूमार्फत एक रासायनिक प्रक्रिया होऊन खाली स्लज व वर स्कम तयार होतात व मध्ये एक साधारणपैकी साफ पाणी उरते, जे ठेवलेल्या भोकातून बाहेर येऊन शेजारच्या शोष खड्डा (सोक पीट) मध्ये येते व जमिनीत जिरून जाते.

जर जमीन एकदम खडकाळ असली तर हे पाणी जिरत नाही. चांगल्यापैकी सेप्टिक टाकी बांधल्यास व जिरवण चांगली असल्यास ती चांगली कार्यशील बनते आणि पाच ते दहा वर्षांनी फक्त एकदाच साफ करावी लागते.

जर जिरवण चांगली नसल्यास दर तीन महिन्यांनी किंवा त्याच्याही आधी टाकी साफ करायची पाळी येते. पूर्वी या गोष्टी त्यामानाने फार कठीण होत्या. कारण माणसे घालून हाताने त्या टाक्या साफ कराव्या लागायच्या. तो सगळा बाहेर काढलेला कचरा व घाण बाजूलाच कुठे तरी पुरली जाई.

आजकाल साफ करणारे खास टँकर मिळतात जे यंत्राद्वारे सगळा कचरा व घाण खेचून काढतात व त्याची थेट मलनिस्सारण प्रकल्पात विल्हेवाट लावतात. तसेच मलनिस्सारण नलिका व भूमिगत टाक्या आता यंत्रमानव वापरून साफ केल्या जाऊ शकतात.

पण या दोन्ही व्यवस्थेत सगळे सांडपाणी शेवटी जमिनीतच सोडले जात असल्यामुळे एकतर ते पुनर्वापर करायला मिळत नसते व जमिनीतील भूजल प्रदूषित करून टाकते. मोठ्या शहरांत भरगच्च वस्तीच्या ठिकाणी अशा असंख्य जिरवणी असू शकतात, ज्यामुळे ही घाण किंवा प्रदूषित झालेले पाणी शेजारच्या किंवा जवळपास असलेल्या विहिरींत पोचू शकते व काविळीसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

त्यासाठी खबरदारी म्हणून आरोग्य खात्याने शोष खड्डा जवळच्या विहिरीपासून कमीच कमी पंधरा मीटर असावा असे प्रमाणित केलेले आहे. भूजल प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने वीस हजार चौरस मीटरपेक्षा जास्त असलेल्या महाप्रकल्पांना छोटे स्वयंपूर्ण मलनिस्सारण प्रकल्प अनिवार्य केलेले आहेत, जेणेकरून असल्या वसाहतीच्या आवारातच पूर्ण रासायनिक प्रक्रिया केली जाते.

Sewage System
Nepal: शेजारी शेजारी पक्के "अस्थिर" शेजारी

या सगळ्या समस्यांमुळे मोठ्या शहरांत सार्वजनिक मलनिस्सारण व्यवस्था राबवणे अत्यंत गरजेचे ठरते. मोठ्या सार्वजनिक मलनिस्सारण व्यवस्थेत जोडलेल्या प्रत्येक घरातून गोळा झालेला सगळा शौच, इतर घाण व सगळे सांडपाणी नलिकांद्वारे गोळा करून मलनिस्सारण प्रकल्पात पाठवले जाते. तेथे त्याच्यावर विविध प्रकारची भौतिक व रासायनिक प्रक्रिया होऊन सगळी घाण गाळून, बाजूला काढून स्वच्छ पाणी तयार केले जाते. ते पाणी अक्षरशः पिण्याच्या योग्यतेचे असते. पण कुठलाही माणूस ते पिण्याचे धैर्य व साहस करणार नाही.

त्यामुळे, ते पाणी पिण्याचा व घरगुती वापर सोडून इतर कुठल्याही कामाला वापरले जाऊ शकते, जसे बांधकाम, बागकाम, शेती, गाडी धुणे इत्यादी. पण तरीही लोकांची ते वापरायची मानसिकता असत नाही. त्यासाठी या पाण्याचा सक्तीने वापर करायचा कायदा बांधकामसारख्या क्षेत्रांत करणे एकदम गरजेचे आहे. तसे केल्याने पुष्कळ गोष्टी साधल्या जाऊ शकतात.

एक म्हणजे भरपूर प्रमाणात तयार होणाऱ्या असल्या पाण्याचा वापर होऊन विल्हेवाट लागून जाते. दुसरे भरपूर खर्च करून शुद्ध केलेले पिण्याच्या पाण्याची बचत व संवर्धन होऊन जाते व जे पिण्याकरिता वापरले जाऊ शकते. तिसरे म्हणजे असले पाणी बांधकाम व्यावसायिकाला अतिशय स्वस्तात मिळू शकते व बांधकाम खर्च कमी होऊ शकतो. याशिवाय मलनिस्सारण प्रकल्पात जो रासायनिक प्रक्रिया केलेला मलमूत्राचा भाग उरतो तो खत म्हणून वापरला जाऊ शकतो.

गोव्यात सध्या तीन प्रमुख मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित आहेत. पणजीचा सगळ्यांत जुना, वास्को व मडगाव. त्याचप्रमाणे छोटे प्रकल्प बांबोळी, साकवाळ, साखळी व दुर्भाट येथे आहेत. त्याशिवाय इतर नऊ ठिकाणी नवे प्रकल्प बांधण्याचे काम सुरू आहे.

मलनिःसारण प्रकल्प सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी क्षेत्रात मोडतात, जे एकतर भूजल प्रदूषित होण्यापासून रोखतात, सार्वजनिक स्वच्छता प्रमाणित करतात व त्याचप्रमाणे लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावतात. तसेच या प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी व खत उपलब्ध होते जे वापरात येते व याच्यावर महसूल मिळू शकतो.

या सगळ्या कारणांमुळे आधुनिक युगात प्रत्येक मध्यम व मोठ्या शहरांत तसेच मोठ्या लोकवस्तीत असे मलनिस्सारण प्रकल्प होणे अत्यंत गरजेचे व अनिवार्य आहे. जी काळाची गरज ठरलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com