कसार दादा, तुझी बांगडी काचेची...

 

Dainik Gomantak 

ब्लॉग

हिरवा चुडा स्त्रियांच्या सौभाग्याचं लेणं

हिरवा चुडा सौभाग्याचं लेणं तर डाळिंबी बांगड्या सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं.

दैनिक गोमन्तक

स्त्री विश्वात चुड्याला कायमच अलिखित असे स्थान आहे. हिरवा चुडा सौभाग्याचं लेणं तर डाळिंबी बांगड्या सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. चुड्याला पती-पत्नीच्या मांगल्यपूर्ण संबंधाचे प्रतिकही मानले जाते. चुड्याला काकणं, बिलवर, बांगड्या असे पर्यायी शब्द आहेत. तर कंगन, कंगनी, कंकणी हे हिंदी शब्द आम्हाला सिनेमामुळे (Movie) ठाऊक आहेतच. चुडे हे सामान्यतः काचेचेच असतात. ‘सौभाग्यवतीचे लेणे’, ‘अहेवपणाचे भूषण’ वगैरे शब्दांमधून चुड्याचे उदात्तीकरणही झालेले आहे. सौभाग्यवती स्त्रीच्या शृंगारात इतर दागिन्यांचा अंतर्भाव असला तरी चुड्याची सर त्या दागिन्यांना येत नाही.

अंगावरचे सर्व अलंकार उतरवायला सौभाग्यवती तयार होईल, परंतु हातातला चुडा उतरवायला ती सहसा तयार होत नाही इतके चुड्याशी तिचे सांस्कृतिक (Culture) भावबंध जुळलेले असतात. एखादीच्या हातातली बांगडी फुटली तर ‘बांगडी वाढवली’ असे म्हटले जाते, ‘बांगडी फुटली’ असे म्हणणे अशुभ मानलं जातं. ‘हात मोकळा ठेवायचा नाही’ असे अगदी घोकून घोकून तिच्या मनावर बिंबवले गेलेले असते.

‘चुडा धारण करणे’ हा तर स्त्रीच्या जीवनातला एक देखणा समारंभ असतो. चुडा भरण्याचे मुहूर्त व शकुन ठरलेले असतात. विवाहप्रसंगी चुडे समारंभपूर्वक भरले जातात. लग्नघरी कासाराला सन्मानपूर्वक बोलावलं जातं, शकुन दिवा लावला जातो आणि नवरीच्या आणि इतरांच्या हाती कासाराकरवी हातभर हिरव्या काचेचा चुडा भरला जातो. चुडा भरला की नवरीने कासाराला वाकून नमस्कार करायचा असतो. कासाराला मानाची ‘तळी’ आणि बिदागी ही आदरपुर्वक दिली जाते.

जेष्ठ स्त्रीया लग्नात वेगवेगळ्या प्रसंगी ओव्यातून आपले भावविश्व प्रकट करतात. चुडा भरताना नवरीची माय आणि इतर बाया नवरीला ओव्यातून आवर्जून सांगतात,‘सासरी जाताना भर गं नवा चुडा,मायबाई देते तुला कुंकवाचा पुडा....’सोनाराकडूनच कान आणि नाक टोचून घेणे जसं सोयीचं तसंच लग्नप्रसंगीचा चुडा कासाराच्या हातून भरून घेणे सोयीचं आणि बिनत्रासाचं. तरीसुद्धा या प्रसंगी एक माय कासाराला काय सांगते ते बघा,

‘कासारदादा तुझी बांगडी काचेची,

नाजूक हाताची लेक माझी....’

कासारने हातात बांगड्या जपून चढवाव्या म्हणून नवरी कासाराला उखाण्यातच काय विनवते ते वाचा,

‘चमचम टिकली वाटोळे दार,

हळूच घाल मामा दुखते फार....’

इतके आर्जव करूनही कासाराने बांगड्या भरताना घाई केली तर तीच नवरी गणपतीसमोर लागलीच तक्रार वा गाऱ्हाणे मांडते,

‘गणपती देवा बघ माझा हात.

कासारमामान केलो माझो घात....’

स्त्रियांच्या जीवनातलं कासाराचे सांस्कृतिक स्थान असे अधोरेखित होत जाते. कोणीकाळी तो आपला काचेच्या काकणांचा छोटेखानी पेटारा काखेला लावून गावी आला की त्याच्याभोवती हातभर चुडा भरून घेण्यासाठी बायका-मुलींचा गराडा पडायचा. पण कालौघात सगळंच बदलतचाललंय. आपल्या वाडवडिलांच्या काकणांचा व्यवसाय निगुतीने करणारा दाबोळी, वास्कोचा सय्यद कासार या व्यवसायातील अडचणी व आव्हानं सांगताना म्हणातो, “या धंद्याला आता म्हणावी तशी बरकत नाही. कासारांची नवी पिढी या व्यवसायात यायला तयार नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईची झळ सोसून आणि लेकीबाळीची आवडनिवड व हौस पारखून हा व्यवसाय करावा लागतो. ‘नफा-तोटा’, ‘स्वस्त आणि मस्त’ याचाही मेळ घालावा लागतो.” फैजापूर, आग्रा येथून काचेच्या तर हैदराबाद येथून वेगवेगळ्या डिझाईनच्या- फॅशनच्या बांगड्या गोव्यात आणणारे काही मोजकेच व्यवसायिक गोव्यात (Goa) आहेत. त्यांच्याकडून किरकोळ पद्धतीने बांगड्या आणाव्या लागतात. एकंदरीतच हा नाजूक असा पारंपारिक व्यवसाय आहे. तो जपूनच करावा लागतो.

विवाह आणि शादीप्रसंगी हातभर चुडा भरण्याची परंपरा रीति-रिवाजानुसार अखंडितपणे सुरूच राहणार आहे. लेकीबाळीना काकणांविषयी उपजतच आकर्षण आणि प्रेमही आहे. शहरे कितीही विस्फारली तरी त्याच्या एखाद्या कानाकोपऱ्यात, एखाद्या गल्लीच्या वळचणीला, एखाद्या कासारदादाचे छोटेखानी दुकान काचेच्या रंगीत कांकणानी चकाकत असेलच यात शंका नाही.

- नारायण महाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT