Smoking Dainik Gomantak
ब्लॉग

शेनवते

गोमन्तक डिजिटल टीम

प्रा. विनय ल. बापट

राखणेमामा गुरांना घेऊन यायचा तेव्हा अनेकवेळा त्याच्या खांद्यावर लांब लांब पानांचे दोन-तीन ताळे असायचे. उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही गुरे वाडीत बांधायचो.

त्या वाडीच्या शेजारी असलेल्या काहीशा सावली असलेल्या जागेत तो ते सुकत ठेवायचा आणि अगोदर आम्हांला म्हणायचा, ‘माज्या शेनवातांग हात लाव नांका. सांगोन दवरतां!’

तो हे सांगायचा त्यालाही कारण होते. त्याने एकदा असेच आणून ठेवलेले ताळे त्याची सगळी पाने काढून टाकून आम्ही खेळायला घेतले होते. तो ती पाने काही दिवस सुकवायचा आणि मग त्याचे पेळे बांधायचा.

हा एवढा उपद्व्याप चालायचा तो विडी ओढण्याच्या आनंदासाठी! आमच्याकडे कामाला येणारे यच्चयावत सगळे, मग ते गावातील असोत की घाटी, विडी ओढायचे ते कुड्याच्या पानाचीच. ही कुड्याची सुकवून विडी करण्यासाठी योग्य अशी केलेली पाने म्हणजे शेनवते.

राखणे मामांची विडी म्हणजे जुडगाच. आम्ही त्याला ‘देवचाराची विडी’ म्हणायचो. साधारण पानाची बाहेरची कड तो काढून टाकायचा आणि मध्ये तंबाखू भरायचा आणी भली मोठ्ठी विडी करायचा ती साधारण चिलिमीच्या आकाराची असायची.

ती पेटवण्यासाठी माचीस वगैरे गोष्ट कुचकामी असायची. ती पेटवण्यासाठी धुमीतील जळते लाकूडच लागायचे. सिगारेट एकदा पेटवली की जळत राहते पण या शेनवतांपासून केलेल्या विडीचे तसे नसते. ती एकसारखी विझते आणि पुन्हा पुन्हा पेटवावी लागते.

राखणे मामाचे अनेकवेळा जळता निखाराच आपल्या विडीवर ठेवत असे. या विडी पेटवण्यावरून आठवण झाली ती आमच्याकडे कामाला येणाऱ्या घाटी मनायांची. हे साधारण पावसाच्या सुरुवातीला कामासाठी यायचे.

दिवसभर भर पावसात भिजत काम करायचे आणि या कामाच्या रगाड्यात त्यांचा विरंगुळा असायची विडी. पण हे विडी माचीस घेऊन पेटवत नसत. त्यासाठी ते चकमक वापरायचे. एक पांढरा दगड, एक लोखंडाचा तुकडा आणि भिल्लेमाडाचा कापूस.

लोखंडाचा तुकडा आणि दगड यांचे जोराने एकमेकांसोबत घर्षण करायचे की त्यातून आगीची ठिणगी पडत असे ही ठिणगी कुठे पडेल या अंदाजाने तिथे भिल्लेमाडाचा कापूस ठेवलेला असे त्यावर ती ठिणगी पडली की तो कापूस जळू लागे तो जळता कापूस विडीवर ठेवत आणि झुरका मारायला सुरुवात करत.

राखणेमामाची विडी अत्यंत बेढब पण ‘नजाकत’भरी. विडी बघायची असेल तर आमचे कवठीचे काका विडी ओढायचे ती विडी बघावी. ते कायम स्वतः केलेलीच विडी ओढत. त्या करण्यातही एक कलात्मकता होती.

अगोदर मानाच्या (शेनवताच्या) कडा कापून ते व्यवस्थित चौकोन तयार करायचे, मग त्याचे एकसारखे तुकडे करायचे. सगळे तुकडे एकाच आकाराचे. हे करण्यासाठी त्यांची एक खास कत्री होती त्या कत्रीला किंबहुना त्यांच्या विडीच्या डब्याला ते सोडून इतरांना हात लावायलाही मनाई होती.

त्या कापलेल्या पानांच्या टोकदार कडा कापून ती गुळगुळीत करत. मग त्यात अगदी मोजून मापून तंबाखू घालायचा आणि अगदी हळुवारपणे ती वळायची. शेवटचे उरलेले टोक व्यवस्थित दुमडून आत सरकवायचे आणि सुताची गुंडी असायची त्या सुताने ती बांधायची.

दुसऱ्या दिवशी किती विड्या हव्यात त्या आदल्या रात्री करून ठेवायच्या. आणि डबा परत त्याच जागेवर ठेवायचा. तो डबा जरा कोणी हलवला तरी त्यांना कळत असे. एकदा मी त्यांच्याकडे गेलो असतानाची गोष्ट.

ते कामावरून आले आणि त्यांच्या लक्षात आले, आपला विडीचा डबा कोणीतरी हलवलाय. ते लगेच काकूला म्हणाले, ‘अगो माझ्या विडीच्या डब्याला कोणी हात लावलान?’ आमची काकू बोलण्यात अत्यंत वस्ताद. ती काय बोलेल नेम नसायचा. ती शांतपणे म्हणाली, ‘मघाशी मी घेतला होता विडी ओढायला. एक मी घेतली आणि एक विन्याला दिली’.

‘कायतरी मूर्खासारखं सांगू नको. डब्यातली सुताची गुंडी बाहेर आहे’. काकांचा पारा चढला होता पण काकू अगदी शांत. ही काकू मी काकू म्हटले की, ‘का-कू’ कशाला करतोस काय ते माग’ असे म्हणायची. तुमच्याच शब्दात ती तुम्हांलाच कसे अडकवेल तुम्हांला सांगता येत नसे. अत्यंत बुद्धिमान स्त्री! तिला पेशव्यांचा सगळा इतिहास मुखोद्गत होता.

कागदाचा एक कपटा मिळाला तरी वाचायची. मी कधी कवठीला जाताना मासिके वगैरे घेऊन जायचो. मी पुन्हा घरी यायची तयारी करू लागलो की तिचे सांगणे असायचे, ती मासिक परत नेऊ नको हां, मला वाचायची आहेत. खरे तर लग्नाआधी ती शिक्षिका होती.

पण तेव्हाच्या रिवाजानुसार तिला नोकरी सोडावी लागली आणि घरकामाच्या घाण्याला स्वतःला जुंपून घ्यावे लागले. त्या काळच्या परिस्थितीत हुशार स्त्रीचा कसा बळी जात असे याबद्दल आज कुठे काही वाचतो तेव्हा माझ्यासमोर कवठीची काकू उभी राहते.

काकांकडे विडी पेटवण्यासाठी लायटर असायचा. एवढ्या नजाकतीने केलेल्या विडीचा पहिला झुरका घेतला की त्यांना प्रचंड ठसका लागायचा आणि मग कितीतरी वेळ खोकत बसायचे. खोकणे मान्य होते पण विडी सोडणे नाही. आणि आत काकूचे बारीक आवाजात बोलणे चालू असायचे, ‘यांचा जन्म विड्या ओढण्यातच गेला...’

मणेरीकर काकाही विडी ओढायचे पण त्यांचे सगळे लिमिटेड. दिवसाला चार म्हणजे चारच विड्या ओढणार. कवठीच्या काकांच्या विडी एवढी त्यांची विडी नजाकतभरी नसली तरी ठीकठाक असायची. त्यांच्याकडे कधी गोष्टी करण्यासाठी गेलो की ते सोप्यावर बसून विडी वळायचे.

ते गोष्टी खूपच रंगवून सांगायचे. ‘अरे काय आहे, अनेकवेळा पैशाने होत नाहीत ती कामं या विडीने होतात. म्हणूनच म्हण आहे. ‘सोम्याक दिली विडी सोमों सोपों झाडी’. तर काय, विडीकाडी देऊन बारीकसारीक कामं होतात.

म्हणून व्यसन म्हणून नाही गरज म्हणून बारीकसे व्यसन करावं!’, असे म्हणायचे आणि मिश्कील हसायचे. हा माणूस खरेच व्यसने नियंत्रणात ठेवून होता. उगाच एकसारख्या विड्या फुकताना मी त्यांना कधीच बघितले नाही. साधारण वयाच्या साठ- पासष्टाव्या वर्षी त्यांनी विडी सोडली आणि पान खाऊ लागले आणि ऐंशीपर्यंत तेही सोडले आणि चांगले पंचाण्णव वर्षांचे समृद्ध आयुष्य जगले.

आमचा भागेली असलेल्या विठ्ठलाला मुरटें मळता मळताच विडीची तल्लफ यायची. खरे तर हे कामकरी लोक चार झुरके मारले की तीच विडी कानाला लावून ठेवतात. आणि काही वेळाने पुन्हा पेटवतात.

पण कधी केलेली विडी नसेल तर तो मुरटे मळताना मुरट्यात उभा राहूनच आपल्या पिशवीतून शेनवत काढून त्यात तंबाखू घालून तिथेच विडी करून ओढत असे. विडी पेटवण्यासाठी तो उजेडासाठी ठेवलेला मोठा रॉकेलचा दिवा वापरीत असे.

ही शेनवते करण्यासाठी सर्वांत उपयुक्त पान म्हणजे कुड्याचे. अगदी कुड्याचे पान नसेलच तर मग नाइलाजाने केळीचे सुकलेल्या पानाचा तुकडा काढून त्याचा शेनवत म्हणून वापर केला जायचा.

हल्लीच गजानन देसाई यांची ‘ओरबिन’ ही कादंबरी वाचली आणि या शेनवतांच्या पानासंदर्भात असलेला एक प्रसंग मनात घर करून गेला. कादंबरीतील एक माणूस ‘ओरबिन’मध्ये पडून कायमचा जायबंदी होतो आणि त्याची पत्नी घर चालवण्यासाठी ही कुड्याची पाने आणून शेनवते करून विकते.

हृद्य प्रसंग पुढे आहे. गावातील दोन बायका डोंगरात लाकडे आणायला जातात तेव्हा एक बाई दुसऱ्या बाईला सांगते, ‘कुड्याची लाकडा हणों नाका. हचे ती अनिलाची आवय कुड्याची पानचे लागी करता नू?’

(नेमका असाच नसेल पण अशाच आशयाचा संवाद आहे) यातून गावागावांत टिकून असणारी माणुसकी तर दिसतेच पण त्याच बरोबर या शेनवतांसाठी उपयोग होत असल्यामुळे काहीसा बदनाम झालेला कुडा, कोणाचा तरी संसारही सांभाळायला मदत करत होता हे लक्षांत आले.

खरे तर हे कुड्याचे झाड खूपच औषधी. लहान मुलांना याचे पाळ उगाळून देतात. याच्या फुलांची भाजी करतात, तर शेंगांची चटणी किंवा भाजी करतात. आम्ही अनेकवेळा वरच्या डोंगरात जाऊन या शेंगा आणत असू. काहीशी कडवट लागणारी भाजी अजूनही लक्षात आहे. आव परसाकडला होते त्यावर तर हा कुडा एकदम गुणकारी आहे.

मी अगदी सातवीत असताना सिगारेट ओढण्याचे पराक्रम केले आहेत. एकदा सिगारेटऐवजी तीस छाप विडी ओढली होती. पण त्याचा तो कडवट वास मला अजिबात आवडला नव्हता. अगोदर गाडीत बसलो की हा विडीचा धुकटा सगळीकडे अनुभवायला मिळायचा.

बहुतेक विड्या कुड्याच्या शेनवतांपासून केलेल्याच. त्याचा जळतानाचा तो ‘चर्र चर्र’ होणारा आवाजही माझ्या कानात आहे. हे सगळे आज आठवते आणि मनात विचार येतो, कुड्याच्या शेनवताची विडी ओढायची राहूनच गेली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT