काठियावाडी चाड्डी

ही नातेसंबंधांची गुंतागुंत आपल्याला पुन्हा, ‘चाड्डी कोण होते?’ या प्रश्‍नासमोर आणून उभे करते.
Kathiyavadi
Kathiyavadi Dainik Gomantak
Published on
Updated on

तेनसिंग रोद्गीगिश

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, मला काय म्हणायचे आहे याचा माझ्याकडे ठोस पुरावा नाही; परंतु, त्याच वेळी, परिस्थितीजन्य व तार्किक बाजूही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा प्रचलित विश्‍वास व सत्य परिस्थिती एकमेकांहून खूप भिन्न असू शकतात.

सरस्वती नदी कोरडी पडल्यानंतर तिथून स्थलांतर करणारे ब्राह्मण कुशस्थळी आणि आसपासच्या गावांमध्ये स्थायिक झाले. काठीयावाड द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्यावरून क्षत्रिय समुद्रमार्गे गोव्याच्या किनाऱ्यावर स्थायिक झाले.

त्यानंतर तिथे आलेल्या ब्राह्मणांना क्षत्रियांनी त्यांची गावे दिली व त्यांनी शेजारच्या किनारी गावांमध्ये स्थलांतर केले. इथे गोष्ट दोन कुशस्थळी नामक गावांबद्दल नसून दोन समाजांबद्दल आहे.

एक महत्त्वाची वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे या ‘काठियावडी’ चाड्डींच्या हालचालींचा आकृतिबंध आणि दख्खनमार्गे कोकणात पोहोचलेल्या इतर चाड्डींच्या स्थलांतरणाचा आकृतिबंध. दख्खनमार्गेच्या आलेल्या चाड्डींच्याबाबत, गोव्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे झालेले स्पष्ट स्थलांतर दिसून येते.

कालांतराने नदीपाठोपाठ नदी ओलांडत त्यांचे नदीकिनारी स्थायिक होणे क्रमप्राप्त होते. तथापि, याचा पुरावा देण्यासाठी कोणतेही लिखित मजकूर किंवा शिलालेख वगैरेचा स्रोत नाहीत. सासष्टी गावातील जुने जाणते लोक आपल्या मूळ स्थानाविषयी बोलतात.

उदाहरणार्थ, चिंचिणीमधील काही कुटुंबे कुस्माने (केपे तालुका)मध्ये ‘सामायिक झाडां’बद्दल बोलतात आणि कार्मोणामधील कुटुंबे असोळणा (साळ नदीपलीकडील) वडिलोपार्जित घरांबद्दल बोलतात. ‘वाट्या आमो(आपला वाटा असलेला आंबा)’ किंवा ‘वाट्या पोणोस(आपला वाटा असलेला फणस)’ असा सामायिक झाडांचा उल्लेख करतात, तेव्हा ते मूलत: कुठून आले, स्थलांतरित झाले, हे लगेच लक्षांत येते.

याच्याविरुद्ध, ‘काठीयावडी’ चाड्डी पश्चिमेकडून पूर्वेकडे, किनाऱ्यावरील गावांपासून आतील भागांत स्थलांतरित झालेले आढळतात. नागोआ (मचाडो), ओर्ली(वाझ), तळावली (मेरगुल्हाओ), कोलमोरोड (गोम्स) चिंचिणी (कोटा, फुर्ताडो), असोळणा (मॉन्तेरो), चांदोर (मिनेझिस) आणि कुंकळ्ळी (फर्नांडिस) येथेही अशी काही कुटुंबे आढळतात, जी अगदी प्राचीन आहेत.

Kathiyavadi
Gol Gumbaz Bijapur - Vijapur: गोलघुमट व ‘बिजली पत्थर’

अन्य समाजांसोबत रोटीबेटी व्यवहार सुरू झाल्यानंतर प्रस्थापित झालेल्या कौटुंबिक संबंधांतून समुदायाचा प्रसार कसा झाला असावा, हे शोधणे शक्य आहे. उदाहरणार्थ, कुएळीचे कुन्हा चांदोरच्या मिनेझिसशी संबंधित आहेत आणि नंतर चिंचणीच्या फुर्तादोंशी संबंधित आहेत. बाणावलीतले गोन्साल्विस हे कार्मोणाच्या अमरांते आणि ओर्लीच्या वाझ यांच्याशी संबंधित आहेत.

पहिले कोण आले, काठीयावाडी चाड्डी की इतर चाड्डी? म्हणजेच काठीयावाडातील क्षत्रियांचा जत्था पहिल्यांदा गोव्यात स्थलांतरित झाला होता का, याचे उत्तर देणे कठीण आहे. पण या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर देणारी दोन तथ्ये आहेत.

हिमयुगाचा शेवट सुमारे ७,५०० ईसापूर्व झाला; प्रसिद्ध ट्रान्स-सह्याद्री स्थलांतर सुमारे १,००० ईसापूर्व झाले असावे. या तारखा अचूक मानता येत नाहीत;

शिवाय आपण ज्या स्थलांतराविषयी बोलत आहोत, ते एकदम व एकाचवेळी घडले नाही. ती अनेक वर्षे निरंतर चाललेली एक प्रक्रिया होती. असे असले तरी, हे पुरेसे स्पष्ट आहे की स्थलांतर घडले आहे. आणखी एक तथ्य आहे जे हेच सुचवते.

Kathiyavadi
Festival: सप्टेंबर : उत्सवांचा उत्सवी महिना

‘काठीयावडी’ चड्डी हे सामान्यपणे जमीनदार होते; त्यांनी जिथे आश्रय घेतला त्या गावांतील ब्राह्मणांप्रमाणेच त्यांच्याकडे गावातील जमिनीचा मोठा भाग होता. याचा अर्थ असा होऊ शकतो की त्यांनी तुलनेने तुरळक लोकसंख्या असताना गावात वस्ती केली असावी.

बहुधा, जेव्हा ते या गावांमध्ये स्थायिक झाले, तेव्हा उर्वरित लोकसंख्या ही मुख्यतः वडूकरांची होती. क्रॉफर्डने आपल्या लेजेंड्स ऑफ द कोंकणमध्ये क्षत्रिय-वडूकर चकमकीचे वर्णन केले आहे: महाराष्ट्रातून उतरलेल्या क्षत्रियांनी, दीर्घ गनिमी युद्धानंतर तो प्रदेश जिंकत आदिवासींना गुलाम बनवले.

(संदर्भ : क्रॉफर्ड, १९०९ : लेजेंड्स ऑफ द कोंकण, ३१) अर्थातच, क्रॉफर्ड सह्याद्रीच्या चाड्डींबद्दल लिहीत आहे. काठीयावाडी चाड्डी आणि वडूकर यांच्यातला संघर्ष वेगळा असू शकतो का? आम्हाला माहीत नाही.

आज सासष्टीच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये इतर चाड्डींचेही प्रमाण मोठे आहे. परंतु, जेव्हा पूर्वीचे लोक तेथे स्थायिक झाले तेव्हा ही गावे मोठ्या प्रमाणात खारवी म्हणजेच मासेमारी समुदायाची होती, जे बहुधा पूर्वीचे वडूकर स्थायिक होते.

हे गृहीतक आपल्याला एका प्रमुख प्रश्नाकडे आणून सोडतो. आत्तापर्यंत, आम्ही आमचे गृहितक फक्त गोव्यातील सासष्टी तालुक्यापुरते मर्यादित ठेवले आहे. कारण सोपे आहे; लिखित स्रोत किंवा शिलालेख किंवा पुरातत्त्वीय पुरावे नसताना, मला गेल्या पन्नास वर्षांतील माझ्या वैयक्तिक निरीक्षणांवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागले आहे आणि सासष्टीपलीकडील माहिती माझ्याकडे नाही. त्यामुळे हे गृहितक या क्षेत्राबाहेरही लागू पडेल का, हा तो प्रश्‍न आहे.

सुरवातीला, बार्देश तालुक्याकडे पाहता, काठीयावडी चाड्डी स्थलांतरित झाले असण्याचे संभाव्य ठिकाण कोणते असावे? तशी माहिती काढायचीच तर तेथील मूळ स्थायिक शोधून काढून त्यांच्याकडून ही माहिती संकलित करावी लागेल.

बार्देशमध्येही अशी कुटुंबे सापडू शकतील ज्यांचे मूळ वास्तव्य अन्यत्र होते. तथापि, गावकरी नोंदी आणि वैयक्तिक ओळखी वगळता, कुटुंबांच्या या नातेसंबंधांचा शोध घेण्यासाठी कोणतेही कागदोपत्री स्रोत नाहीत. श्रीमती लॉर्डेस फातिमा ब्रावो दा कोस्ता यांनी सासष्टीच्या पलीकडे असलेल्या कुटुंबांबद्दल दिलेल्या माहितीबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

Kathiyavadi
Portuguese Architecture: घरे बदलली आणि माणसेही

असे काही नातेसंबंध येथे आहेत; अगदीच नाहीत असे नाही. भाटीचे मिनेझिस हे असोळणाच्या मोंतेरोंशी संबंधित आहेत. सांताक्रूझमध्ये पिंटो आहेत ते पुन्हा मर्क्युरीच्या मिनेझिसशी संबंधित आहे (दोन मिनेझेस एकाच कुटुंबातील असू शकतात, कारण दोन्ही शेजारील गावे आहेत).

कळंगुटचे प्रोएन्का बेताळभाटीच्या एव्हेलर बॅरेटोशी संबंधित आहे, जे कोलवाच्या रॉड्रिग्सशी संबंधित आहेत, ज्यांचा संबंध तळावलीच्या मेरगुल्हाओशी आहे. नावेलीचे गोम्स हे चिंचिणीच्या फुर्तादोे आणि असोळणाच्या मॉन्तेरो यांच्याशी संबंधित आहेत, जे कुंकळ्ळीच्या फर्नांडिस यांच्याशी संबंधित आहेत.

ही नातेसंबंधांची गुंतागुंत आपल्याला पुन्हा, ‘चाड्डी कोण होते?’ या प्रश्‍नासमोर आणून उभे करते. त्या लेखात आम्ही कळंगुटच्या प्रोएन्साचा संदर्भ देत सांतोस परेरा यांच्या एका अवतरणाचा संदर्भ दिला आहे ज्यांचा व साखळीच्या राणेंचा वंश एकच आहे.

तळावलीच्या मेरगुल्हाओ यांचा आदिलशाही सैन्याविरुद्धच्या लढाईत अल्बुकर्कला मदत करणाऱ्या तिमोजाच्या वंशजांशी संबंध आहे. (संदर्भ : सांतोस परेरा, १८९८ : चत्रियस, ४३) ही आणि इतर तत्सम कुटुंबे :काठीयावाडी’ चाड्डी असू शकतात का? उत्तर बहुधा सकारात्मक आहे.

वरवर पाहता वरील उताऱ्यात ज्याला जनुकीय गुणधर्माने जोडले गेले आहे, तोच समाज आहे असे दिसते. १६५१मध्ये आरोशीधील कपेला दा एस लॉरेन्स येथे दिलेल्या पंथोपदेशात, राशोलच्या सेमिनरीचे रेक्टर आणि कोकणी भाषेतील अनेक ग्रंथांचे लेखक मिगुएल आल्मेदा यांनी, स्थानिक सरदार, आरोसाचा मुलगा, कुंवरनायक याविषयी सांगितले होते. सांतोेस परेरा यांच्या मते तिमोजाचे नातेसंबंध कार्मोणा आणि बेताळभाटीममध्येही आढळू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com