
Delhi Premier League 2025: सध्या देशात सुरु असलेल्या दिल्ली प्रीमियर लीग (DPL) मध्ये क्रिकेटपटू आपल्या धमाकेदार खेळीने लक्ष वेधून घेत आहेत. याच लीगमध्ये आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाकडून खेळणाऱ्या प्रियांश आर्याने आपल्या वादळी खेळीने क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केले. त्याने नुकत्याच झालेल्या सामन्यात अवघ्या 52 चेंडूत धमाकेदार शतक झळकावून एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.
दरम्यान, दिल्ली (Delhi) प्रीमियर लीगमध्ये प्रियांश आर्या 'आउटर दिल्ली वॉरियर्स' या संघाकडून खेळत आहे. तो आपल्या संघाकडून सलामीसाठी मैदानात उतरला. पहिल्याच क्षणापासून त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. मैदानात चौकार आणि षटकारांची जणू त्याने बरसातच केली. त्याने आपले अर्धशतक अधिक वेगाने पूर्ण केले आणि त्यानंतर केवळ 52 चेंडूतच आपले शानदार शतक पूर्ण केले. आपल्या या आक्रमक खेळीत प्रियांशने 56 चेंडूत 111 धावांची जबरदस्त खेळी खेळली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 9 उत्तुंग षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 198.21 इतका होता, यावरुनच त्याने किती धमाकेदार फलंदाजी केली याचा अंदाज येतो.
प्रियांश आर्याच्या या शतकी खेळीमुळेच आउटर दिल्ली वॉरियर्स संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 231 धावांचा डोंगर उभारला. विशेष म्हणजे, प्रियांशने एकीकडे शतक झळकावले असताना संघातील इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. संघासाठी दुसरा सर्वात मोठा स्कोर करन गर्गने केला. त्याने 24 चेंडूत 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यात त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. प्रियांश आणि करन यांच्यामुळेच संघाने एक मोठी धावसंख्या उभारली.
प्रियांश आर्याने याच वर्षी झालेल्या आयपीएलमध्येही आपल्या विस्फोटक खेळीने क्रिकेटप्रेमींना चकित केले. त्याने 17 सामन्यांमध्ये 475 धावा केल्या. यात त्याच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतके होती. त्याचा आयपीएलमधील सरासरी स्ट्राईक रेट 27.94 होता. डीपीएलमधील संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, आउटर दिल्ली वॉरियर्सने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला. सध्या हा संघ दोन गुणांसह लीगमध्ये चौथ्या स्थानी आहे. आगामी सामन्यांमध्ये प्रियांश आर्या आणि त्याच्या संघाची कामगिरी कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.