वाल्मिकी फालेरो
गेल्या लेखाचा शेवट करताना मी, ‘मूळ गावकर असलेले लोक (हिंदू असो वा ख्रिस्ती) श्रीमंतीचा खोटा बडेजाव करणारे नव्हते. जी आपली परिस्थिती आहे ती आहे, त्या परिस्थितीत आनंदाने राहत होते.
पण, नव्याने आलेला वर्ग श्रीमंत असण्यापेक्षा श्रीमंत असल्याचे दाखवण्यातच जास्त स्वारस्य असलेला होता. दिखाऊ श्रीमंती माजली, मनाची श्रीमंती गरीब होत गेली. मठग्रामाचे मडगाव होताना, तशा वेगळ्याच अर्थाने बदलले!’ असे जे म्हटले त्याचे अनेक अनुभव अनेकांना आहेत.
राशोल किंवा रायतुर येथील स्थानिक भाषेत बोलणारा व ख्रिस्ती न झालेल्या स्थायिकांचा एक वेगळ्या प्रकारचा वर्ग होता. एक सुप्रसिद्ध व्यापारी कुटुंब आपल्या आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या आस्थापनात तीन भाऊ संयुक्तपणे काम करत होते.
एखादा पाहुणा आला की सकाळी ११ वाजता म्हणा, एक भाऊ चहा देण्यास सुचवायचा. बराच वेळ होऊनही चहा यायचा नाही, तेव्हा दुसरा भाऊ चहाला उशीर झाल्याची आठवण करून द्यायचा. बराच वेळ गेल्यावर कुणाला तरी आठवायचे की, पाहुण्यांसाठी अल्पोपहार आलाच नाही.
तेव्हा तिसरा भाऊ म्हणायचा, आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि पाहुण्यांना घरीच जेवण दिले जाईल. ते तिघे पाहुण्यासोबत घरी आल्यावर, दाराच्या बेलला उत्तर देणाऱ्या तिघांपैकी कोणतीही बायको (फक्त शुद्ध सारस्वत कोकणीतच सांगणे योग्य होईल, अशा पद्धतीने) म्हणायची, ‘तुम्ही पाहुण्याला, त्याचे जेऊन झाल्यावर का आणले?’ दुसरीकडे, निघणारा पाहुणा उंबरठ्यावर येईपर्यंत थांबायचे, मग त्याचा हात पकडून थांबण्याचा आग्रह करायचा. तोही अशा पद्धतीने की, त्याला तो सहज सोडवून घेऊन निघता यावे. हे एक प्रचलित मासलेवाईक उदाहरण आहे.
जर मडगावच्या गाकरांना ‘मठग्रामस्थ’ म्हटले गेले, तर नंतरच्या काळात बाहेरून येऊन वसलेल्या श्रीमंत लोकांच्या वस्तीच्या एका भागाला ‘मार्गानेस’ असे म्हटले गेले. हे मार्गानेस सकाळी अंगणात उभे राहून पेज भुरकावीत असले, तरी आविर्भाव मात्र चिकन काल्द भुरकावल्याचा आणत असत. अचानक आलेला पैसा येताना सोबत आपल्यापेक्षा कितीतरी पट जास्त माज घेऊन येतो. घरंदाज श्रीमंतीचा पैशाशी, संपत्तीशी फारसा संबंध नसतो हेच खरे!
चर्च स्क्वेअरच्या अवतीभवती अनेक आख्यायिकांचा वावर आहे. त्या मनोरंजक आहेत व मौखिक परंपरेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आल्या आहेत. उदाहरणार्थ, एक अग्रगण्य मार्गानेस कुटुंब आफ्रिकन गुलामांच्या मिश्रणातून आले. प्रस्तुत लेखकाला प्रयत्न करूनही त्यांचा नेमका वंश कोणता याची खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही.
चर्च स्क्वेअर आज मडगावचा प्रमुख हेरिटेज (संवर्धन) झोन आहे. त्याविषयी बरेच लिहिले गेले आहे व चित्रबद्धही करण्यात आले आहे. आपण घरे आणि त्यामागील काही न सांगितल्या जाणाऱ्या कहाण्यांवर थोडक्यात नजर टाकू. काही कथा कितीही म्हटले तरी स्पष्ट सांगता येणार नाहीत. त्या सांगोवांगीच्या गोष्टी आहेत की, खऱ्याच घडलेल्या घटना आहेत, याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.
आपण चर्च स्क्वेअरच्या वायव्य कोपऱ्यापासून सुरुवात करू. रिबेलो रोड(पूर्वाश्रमीचा रुआ दे नॉर्ते)वरून सांतोस वाझ घराच्या पूर्वेकडच्या रस्त्याने चालत जा, नंतर सेंट ज्योकिम रोडच्या बाजूने सात भुझान घर येथे चौकाच्या दक्षिणेकडे वळा, मोंतेच्या दिशेने काल्सादाच्या पुढे गेल्यावर आणि लार्गो द पे जुझे वाज येथील दुभाजकानंतर, चर्चच्या दक्षिण भागातून पश्चिमेकडे जा, एक खुला चौक लागेल.
दि. २१ एप्रिल १९३८ रोजी त्याचे नाव बदलेपर्यंत हा चौक एकेकाळी ‘प्रासा दे साओ पेद्रो’ म्हणून ओळखला जात असे. ही तारीख सेंट पीटर या संताची २८७वी जयंती होती. आपण जेव्हा मडगावचा सर्वांत जुना सार्वजनिक चौक असलेल्या लार्गो द रिपब्लिकाच्या स्क्वेअरमधून बाहेर पडतो, तेव्हा जुना बाजार आणि जुनी सासष्टी नगरपालिका इमारत, भग्नावस्थेत असलेली दृष्टीस पडते.
१. अल्वारिस हाउज
१७२०च्या सुमारास शोरांवहून मडगाव येथे स्थलांतरित झाल्यावर अल्वारिस कुटुंबीयांनी प्रथम वास्तव्य केले ते हे घर नव्हते. ते पहिले घर क्रमांक ४१ए ते ४१डी खाली सूचीबद्ध केलेल्या चार घरांचे एकत्रीकरण होते. अल्वारिस हे चावेस-पोर्तुगाल येथील पोर्तुगीज डिओगो लुइस अल्वारिस लेइटचे वंशज.
त्यांच्यापैकी एक असलेले आंतोनिओ १६९७मध्ये गोव्यात शासकीय पदावर नियुक्त झाले होते. ते सांतान-तळावली येथे राहत होते. परंतु प्लेगमुळे शोरांव येथे स्थलांतरित झाले. आंतोनियो यांचे सुपुत्र, डॉ. व्हिन्सेन्ट अल्वारिस यांचा विवाह १७००मध्ये झाला आणि ते शोरांव येथे राहत होते जिथे त्यांचा मुलगा मॅन्युएल यांचा जन्म १७०९मध्ये झाला.
१७१७मध्ये डॉ. व्हिन्सेन्ट यांच्या पत्नीचे शोरांव येथे निधन झाले परंतु त्यांनी ज्या मडगावात रुग्णसेवा केली त्या मडगाव या कर्मभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला. शोरांव येथे प्लेगची लागण मोठ्या प्रमाणात झाली आणि डॉ. व्हिसेंट मडगाव येथे स्थायिक झाले. १७२० आणि नंतर ते याजक बनले.
त्यांचा मुलगा मॅन्युएल (१७०९-६६), पोर्तुगालमध्ये पात्र ठरलेला तत्कालीन गोव्यातील एकमेव डॉक्टर जेे सेन्होर दा विला दे मार्गाव (मडगाव शहराचा अधिपती) होते. मॅन्युएल यांनी दोनदा लग्न केले आणि पुन्हा विधूर झाल्यावर ते याजक बनले.
त्यांना दोन मुले होती; एक फादर विसेंट आणि दुसरे डॉ. पेद्रो (१७४०-१८०३+), ज्यांनी सांतान-तळावली येथील कोस्ता कुटुंबातील एका मुलीशी लग्न केले, पण तोपर्यंत ते मडगाव येथे स्थायिक झाले होते.
(व्यवसायाने औद्योगिक अभियंता आणि आपली पॅशन म्हणून वंशावळींचे इतिहासकार व ग्रंथकार असलेले पेद्रो द कार्मो कोस्टा यांच्या मते, कोस्ताला तीन मुली होत्या. सर्वांत मोठ्या मुलीने सांतान-तळावली (तिसवाडी) येथील आंतोनिओ मॅन्युएलशी लग्न केले. त्यांचा मोठा मुलगा, फ्रान्सिस्को मॅन्युएल याने त्याच कोस्ता कुटुंबातील मुलीशी विवाह केला.
त्यांना एक मुलगा होता आणि त्याला कोस्ता घराण्याचे सर्व गुण वारशाने मिळाल्याने, फ्रान्सिस्कोने मुलाला त्याच्या स्वतःच्या (मॅन्युएल) या आडनावाऐवजी कोस्ता आडनावाने बाप्तिस्मा दिला. हे कोस्ता कालांतराने मडगाव येथे स्थायिक झाले.)
अल्वारिस आणि कोस्ता ही दोन घराणी कालांतराने मडगावमध्ये स्थायिक होणाऱ्या अनेक कुटुंबांपैकी दोन प्रमुख घराणी बनली. ज्यांनी आधुनिक मडगाव शहराच्या जडणघडणीत बरेच मोठे योगदान दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.