Hindu Religion: वानप्रस्थ ते संन्यास

आपल्याला जे प्रिय असते व श्रेय देणारे असते, अशा दोन्ही गोष्टी आपल्याला सोडवत नाहीत. त्यांच्यापासून दूर जाणे किंवा त्यांना दूर करणे आपण पुढे ढकलत राहतो.
Sannyasa
SannyasaDainik Gomantak
Published on
Updated on

प्रसन्न शिवराम बर्वे

वानप्रस्थ हे मूल्य जोपासताना गृहस्थाश्रमात मागे जायची मुभा आहे, हा विचार आपण गेल्या लेखात पाहिला. साहजिकच प्रश्न पडेल की, असे का? त्याचा थोडासा विचार या लेखात आपण करू.

आपल्याला जे प्रिय असते व श्रेय देणारे असते, अशा दोन्ही गोष्टी आपल्याला सोडवत नाहीत. त्यांच्यापासून दूर जाणे किंवा त्यांना दूर करणे आपण पुढे ढकलत राहतो. आमच्या परिचयाची एक व्यक्ती होती, जिला कायम ‘...मग आपण मरायला मोकळे’, असे पालुपद म्हणायची सवय होती.

या वाक्याच्या आधी अनेक वाक्ये काळाच्या ओघात येऊन गेली. तरुण असताना, ‘मुलगा एकदाचा मोठा झाला, आपल्या पायावर उभा राहिला की, मग आपण मरायला मोकळे’. मुलगा शिकला, नोकरीला लागला त्यानंतर, ‘मुलाचे एकदाचे दोनाचे चार हात केले की मग मग आपण मरायला मोकळे’.

सूनमुख पाहून झाले तेव्हा, ‘मुलाला एक तरी मूल झाले की, मग आपण मरायला मोकळे’. यथावकाश मुलाला मुलगा झाला. त्यानंतर ‘एकदा या नातवाची मुंज पाहिली की, मग आपण मरायला मोकळे’. हे चक्र नातसून घरात येईतो सुरूच होते. सांगण्याचे तात्पर्य माणूस काही गृहस्थाश्रमातू मोकळा होत नाही किंवा होऊच इच्छित नाही.

संसारात अजूनही मन रमलेलेच आहे, तरीही धर्म सांगतो म्हणून आपण जेव्हा वानप्रस्थ स्वीकारतो, तेव्हा आपण धड संसारी उरत नाही, धड वानप्रस्थीही होत नाही. वानप्रस्थ ही शरीराने स्वीकारण्याची अवस्था म्हणजे ‘वनात जाणे’ नव्हे, तर मनानेही निवृत्त होणे म्हणजे वानप्रस्थ.

आपण ब्रह्मचर्याचे पालन करून, चौदा संस्कारांनी सुसंस्कारी होऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करतो तेव्हा अनेक बदल आपल्या आयुष्यात घडतात. ब्रह्मचर्याश्रमात ऊर्जेचे व्यवस्थापन आपण नीट शिकलो नाही किंवा वासनांचे दमन करत राहिलो, तर तुंबलेला बांध एकदम फुटावा तशी अवस्था होते.

भरलेल्या पिंपात मोठा चेंडू जितक्या वेगाने आपण दाबून ठेवतो, तितक्याच वेगाने तो हात काढताच उसळी घेतो. वासनांचे दमन न करता त्यांना नियंत्रित करणे जमले नसेल तर गृहस्थाश्रमात फक्त वखवख ठसठसू लागते. अशी माणसे कायम अतृप्तच राहतात. अशा पुरुषांच्या नजरा बायकांना पूर्ण कपडे नेसूनही त्या वस्त्रहीन असल्याचा आभास घडवतात.

या पुरुषांच्या विखारी नजरा जे शोधत असतात, त्याचा स्त्रियांना प्रचंड त्रास होतो. घरी परतल्यावर सचैल स्नान केले तरी हे नजरांचे विष काही डोक्यातून, मनातून उतरत नाही. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर कृष्णाने अर्जुनाला रथातून पहिल्यांदा उतरायला सांगितले.

अर्जुनाने विचारले, ‘का?’ कृष्ण म्हणाला ‘मी सांगतो म्हणून आणि उतरताच खूप दूर जाऊन उभा राहा’. अर्जुन अनिच्छेनेच का होईना, पण कृष्ण सांगतो म्हणून कृष्ण उतरण्याआधी आपण रथातून खाली उतरला व दूर जाऊन उभा राहिला. थोड्या वेळाने कृष्ण रथातून खाली उतरला व धावत अर्जुनाजवळ आला.

कृष्ण अर्जुनाजवळ पोहोचेपर्यंत रथ जळून खाक झाला होता. अर्जुनाने आश्चर्याने कृष्णाकडे पाहिले. स्मितहास्य करीत कृष्ण म्हणाला, ‘कौरवांनी टाकलेल्या अस्त्रांचा प्रभाव रथावर एवढा होता की, मी आधी उतरलो असतो तर रथ तुझ्यासकट जळून खाक झाला असता’.

कृष्ण बहुतेक असाच प्रत्येक स्त्रीला अर्जुनाला जसे वाचवले, तसे वाचवत असावा, अन्यथा बुभुक्षित पुरुषी नजरांनी ग्रस्त झालेला त्यांचा स्त्रीदेह कधीच जळून खाक झाला असता.

वासना, वखवख केवळ स्त्रीदेहाचीच असते असे नव्हे तर सत्ता, संपत्ती, घरदार या सगळ्याचीच वखवख माणसाच्या अस्तित्वाला पुरून उरते. एखाद्या घरात गेल्यावर अनेकांना ती जाणवते. वासनांना भोगून तृप्त होण्याच्या दिशेने आपण कधी प्रवासच करत नाही.

तुका म्हणे देह भरिला विठ्ठल

काम क्रोधे केले घर रिते

असे तुकाराम महाराज म्हणतात, ते बहुधा याचसाठी असावे. आपल्याला मृत्यू यावा असा वाटतो ते निराशेपोटी असते. मृत्यूसुद्धा आपल्यासाठी शांत, तृप्त आयुष्याचे उद्यापन असत नाही. मग, त्याच्या खूप आधी असलेली वानप्रस्थाची अवस्था तरी आपण तृप्त होऊन कशी स्वीकारणार?

Sannyasa
Goa University:...अजून वेळ गेलेली नाही, अन्यथा गचाळ कारभाराचा फटका महाविद्यालयांना बसणारच

आपण जे जे कमावले त्याचा साकल्याने विचार करण्यासाठी वानप्रस्थ आहे. आपल्या जाणिवा, आपले पूर्वग्रह, आपली मते, आपले शिक्षण, झालेले ज्ञान यांचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करताना आलेल्या अडचणी व त्यावरचे उपाय यांचा खऱ्या अर्थाने तटस्थ होऊन ‘प्रॅक्टिकल’ विचार करण्याची अवस्था म्हणजे वानप्रस्थ.

त्यातून जे अनुभवांचे सार आपण शोधून काढू त्याचे समाजाला दान करण्याची अवस्था म्हणजे संन्यासाश्रम. एकांतवासात (सगळ्या सुखांचा त्याग करून) केलेला केलेला अभ्यास, त्याचे घेतलेले प्रॅक्टिकल अनुभव, त्यांचे केलेले चिंतन पुन्हा समाजात सर्वांसाठी उघड करणे, अशी ही वैयक्तिक ते सामाजिक होण्याच्या प्रवासाची दिशा आहे.

वानप्रस्थ ही संन्यासाची तयारी आहे. भगवे घातले म्हणून संन्यासी होता येत नाही. संन्यासाची दीक्षा घ्यावी लागते. त्यानंतर पुन्हा माघारी फिरणे नाही. वानप्रस्थात पोहोचल्यानंतरही पत्नीची परवानगी घेतल्याविना संन्यास घेता येत नाही. संसारी माणसाची वैयक्तिक विरक्ती हा संन्यासी होण्याचा परवाना ठरत नाही.

Sannyasa
कुन्हांची 1941च्या पूरग्रस्तांना मदत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com