सर्वेश बोरकर
घोरी सल्तनतीतील शेवटचा सुलतान कैकुबाद याच्या विलासी वागणुकीचा फायदा घेत खिलजी सरदारांचा म्होरक्या जलालुद्दीन खिलजी याने एक दिवस दिल्लीचा सुलतान कैकुबाद नशेत असताना त्याचा खून केला व त्याचे तुकडे करून यमुना नदीत फेकून दिले. त्याच्या मुलासही मारून इ. स १२८८मध्ये दिल्लीचे तक्त बळकावले.
खिलजी हे मूळ पठाण, अफगाणिस्तानात ‘खल्ज’ म्हणून एक ठिकाण आहे तिथले हे लुटारू. खल्जवरून त्यांना खिलजी हे नाव प्राप्त झाले. बऱ्यापैकी ही लुटारू मंडळी होती. शहाबुद्दीन मसूद हा दिल्लीचा सुलतान जलालुद्दीनचा भाऊ, ज्याला दोन मुले होती.
पहिला अलाउद्दीन खिलजी आणि दुसरा आल्ब्सबेग खिलजी. अलाउद्दीनने मंगोलांना हरवून जो पराक्रम केला होता, त्यामुळे पूर्ण दरबारात त्याचे वजन वाढले होते. पुढे जाऊन अलाउद्दीन बंड करू शकतो, अशी भीती कदाचित सुलतान जलालुद्दीनच्या मनात असावी. म्हणूनच कदाचित सुलतान जलालुद्दीनने स्वतःच्या मुलीचे लग्न अलाउद्दीनबरोबर लावून दिले होते.
पण, अलाउद्दीनला दिल्लीचा सुलतान व्हायचे होते आणि त्यासाठी त्याला दरबारातील सगळ्या मातब्बर मंडळींना स्वतःकडे वळवायचे होते. दरबारातील अनेकांचा पाठिंबा हा अलाउद्दीनला होताच, पण जे त्याच्या पाठीमागे नव्हते त्यांना लाच देऊन स्वतःकडे घ्यायचे होते. त्याला आता अफाट संपत्ती जमा करायची होती.
भिलसा येथे असताना अलाउद्दीन खिलजीला दक्षिणेत देवगिरी (आताचे दौलताबाद) नावाच्या शहराची माहिती मिळाली. हे शहर खूप श्रीमंत असून येथे असंख्य श्रीमंत लोक राहतात असे त्याला समजले.
जर हे शहर लुटले तर प्रचंड खजाना मिळणार जो त्याला दिल्लीच्या तख्तावर बसण्यास निर्णायक ठरणार हे कळून चुकले आणि त्याने सुलतान जलालुद्दीनकडे दक्षिणेत जाण्यासाठी परवानगी मागितली. काही इतिहासकार म्हणतात की सुलतान जलालुद्दीनने त्याला परवानगी दिली नाही, तरीही खोटे कारण सांगून तो दक्षिणेत आला.
आपला खरा मनसुबा काय आहे हे त्याने कोणालाच कळू दिले नव्हते. वाटेत कोणाचाही कसलाही त्रास होऊ नये म्हणून त्याने एक अफवा सोडली की, मी माझा चुलता सुलतान जलालुद्दीन याच्याशी भांडून त्याला सोडून आलो आहे आणि माझी जी काही फौज आहे तिच्यासोबत तेलंगणाच्या राजाकडे चाकरीस चाललो आहे.
जवळ-जवळ ७०० मैलांचा प्रवास करून अलाउद्दीन खिलजी दक्षिणेत उतरला तो थेट देवगिरीच्या दारात. काही इतिहासकारांचे म्हणणे असे आहे की, अलाउद्दीन खिलजी दक्षिणेत आला आणि युद्धे झाली ती दोनच, पहिले म्हणजे विंध्य ओलांडल्यावर एलिचपूरमध्ये जे आजच्या खान्देशात आहे, आणि दुसरे म्हणजे देवगिरी किल्ल्याच्या दारात म्हणजे सरळ राजधानीमध्ये.
देवगिरीचा राजा होता रामदेवराय यादव, ज्याचे राज्य गोव्यापर्यंत पसरले होते, त्यावेळच्या गोव्याचे दुर्बळ राज्यकर्ते शास्तादेव कदंब - तृतीय (इ.स. १२४६-इ.स १२६५) आणि कामदेव (इ.स. १२६५ -इ.स १३१०) देवगिरीचे सामंत बनले होते .
इ.स. १२३८मध्ये राजकीय सत्तापरिवर्तन यादव शासक सिंघान यादव यांच्या बाजूने झाले आणि त्रिभुवनमल्ल कदंब(इ.स. १२१६ - इ.स. १२३८) यांनी यादवांकडून आपले गोव्याचे राज्य गमावले व ते यादवांचे सामंत बनले.
अलाउद्दीन खिलजी आणि देवगिरीचे यादव यांच्या लढाईचे वर्णन अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने केले आहे. अलाउद्दीन आपल्या देवगिरीच्या राज्यावर चालून आला आहे आणि त्याने लूट सुरू केली आहे हे रामदेवराय यांना माहीतच नव्हते. शहराबाहेर ज्यावेळी ते देवदर्शनास गेले होते त्यावेळी त्यांना अलाउद्दीन आल्याची बातमी लागली.
अलाउद्दीनचा मनसुबा हा फक्त लुटीचा होता आणि त्याला लुटीतून जास्तीतजास्त खजाना मिळवायचा होता. त्याने शहरामध्ये जबरदस्त लूट सुरू केली. अतिशय थोडके सैन्य घेऊन तो आला होता. काही इतिहासकारांच्या मते तो ८,००० सैन्य घेऊन आला होता आणि काही इतिहासकारांच्या मते तो ४,००० घोडदळ आणि २,००० पायदळ घेऊन आला होता.
अलाउद्दीनने देवगिरीला इ.स १२९६मध्ये वेढा दिला आणि काही सैनिक शहरात धुमाकूळ घालून लूटमार करत होते. दुर्दैव म्हणजे देवगिरीला एकच दरवाजा असल्याने अलाउद्दीनने गडाची श्वासनलिकाच दाबून टाकली होती. त्यामुळे गडावर रसद पोहोचवणे अशक्य होऊन बसले होते.
देवगिरीच्या सैन्यापुढे अलाउद्दीनचे सैन्य काहीच नव्हते, पण दुर्दैवाने रामदेवरायचा मुलगा शंकरदेवराय यादव हा बरेच सैन्य घेऊन दक्षिणेत एका मोहिमेवर गेला होता.
ज्यावेळी रामदेवरायाला अलाउद्दीनची खबर मिळाली त्यावेळी त्याने देवगिरीच्या किल्ल्यातून काही माणसे जमा केली आणि जे काही नोकरचाकर होते त्यांची जमवाजमव करून तो अलाउद्दीनशी लढायला गेला.
पण जास्त काळ त्याचा टिकाव लागला नाही आणि पुन्हा तो गडावर परत आला. रामदेवराय यादवाला वाटले की आता जोपर्यंत आपला मुलगा येत नाही तोपर्यंत आपणास काहीच करता येणार नाही. त्यामुळे त्याने आपल्या मुलाची वाट पाहण्याचे ठरवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.