Goa Culture| karapur Bandirwada And Sanquelim Fort
Goa Culture| karapur Bandirwada And Sanquelim Fort  Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Culture: ऐतिहासिक वैभवाचे साक्षिदार ! कारापूरचा बंदीरवाडा अन् साखळीचा किल्ला

राजेंद्र केरकर

Goa Culture: श्रीविठ्ठलासह राईरुक्मिणीचे देवस्थान डिचोली तालुक्यातल्या कारापूर गावातील विठ्ठलापूर येथे वाळवंटी नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे.

चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात मारुतीगडावर उभारण्यात आलेल्या या श्रीविठ्ठलाच्या मंदिराच्या सान्निध्यात इथल्या कला, संस्कृतीला बहर आला.

विविधांगी लोकनृत्ये, लोककला यांना या मंदिराने आश्रय दिला. हे मंदिर नदीपल्याड असणाऱ्या कारापूर गावात असले तरी त्याचे सांस्कृतिक दृष्टीने पूर्वापार संबंध साखळी नगरीशी आहेत.

एकेकाळी साखळीत सत्तरी आणि डिचोली या दोन्ही तालुक्यांचे मुख्यालय असल्याने पोर्तुगीज अमदानीत त्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते.

साखळीत भरती-ओहोटी लागणाऱ्या वाळवंटी नदीचे बारमाही पाण्याने भरलेले पात्र असल्याने आणि शेवटी ही नदी मुख्य मांडवीशी सारमानस येथे एकात्म होत असल्याने तिचा उपयोग जलमार्गासाठी केला जायचा.

भरतीच्या वेळी शिडाची गलबते पिळगाव, कारापूरमार्गे साखळीत यायची. तिसवाडी आणि अन्य प्रांतातून गलबताद्वारे सुकी मासळी, मीठ या गलबतांतून यायचे आणि पुन्हा जाताना ही गलबते महाराष्ट्र, कर्नाटकातल्या बऱ्याच प्रांतातून येणारी कडधान्ये आणि अन्य माल घेऊन जायची.

इथे चालणाऱ्या व्यापारावरती आणि एकंदर जलमार्गावरती नियंत्रण ठेवणे सोपे व्हावे म्हणून सावंतवाडकर भोसल्यांच्या अमदानीत साखळीत किल्ल्याची उभारणी करण्यात आली.

वाळवंटी नदीच्या डाव्या किनाऱ्यावरती जुन्या किल्ल्याचे काही अवशेष इतिहासाच्या उदरात गडप होण्याच्या वाटेवर आहेत.

आर्किव्हु इस्तोरिकु उलत्रामारीनुच्या दफ्तरात 1779 साली काढलेले साखळीआणि डिचोली येथील किल्ल्यांचे नकाशे होते.

त्यावरून आज ज्या ठिकाणी साखळीतील आत्मोद्धार संघाची जुनी इमारत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची कचेरी आहे त्या परिसरात साखळीचा किल्ला होता याची कल्पना जीर्णावशेषावरून मिळते.

छत्रपती संभाजी आणि पोर्तुगीज यांच्यात होणाऱ्या युद्धात, कोकणातल्या अन्य देसायांप्रमाणे साखळीतील देसायांनी पोर्तुगिजाशी संगनमत केले होते.

सावंतवाडी संस्थानचे खेम सावंत भोसल्यांनी आपली राजनिष्ठा महाराणी ताराबाईशी प्रकट करून कुडाळ, बांदे, डिचोली, मणेरी, पेडणे व साखळी हे महाल वतनादाखल 1708 मध्ये प्राप्त केले.

वाळवंटी नदीच्या डाव्या तीरावरती जसा किल्ला साखळी शहराच्या संरक्षणासाठी बांधला होता. तसाच आणखी एक कोट नदीच्या उजव्या तीरावरती विठ्ठल मंदिराशेजारी बांधण्यात आला होता.

सावंतवाडकर भोसले करवीर संस्थानाविरुद्ध 24 ऑगस्ट 1781 रोजी गुंतलेले असल्याने ब्रिगादैरु येंर्रिकि कार्लुस याने डिचोलीचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्याच दिवशी विठ्ठल मंदिराच्याभोवती असलेल्या कोटास वेढा घातला.

कोटातील लोकांनी चौदा तास पोर्तुगिजांना दाद दिली नाही. कुष्टोबा राणे व जैतोबा राणे यांनी भतग्राम आणि सत्तर महाल काबीज करण्यास पोर्तुगिजांना बरेच साहाय्य केले.

साखळी किल्ला पोर्तुगिजांनी ताब्यात घेतल्यानंतर सावंतवाडकर भोसल्यांनी गुळ्ळे, मणेरी, मेणकुरे, साळ व धुमासे ही ठाणी ताब्यात घेऊन, 16 नोव्हेंबर 1782 रोजी साखळीच्या किल्ल्यास वेढा घातला.

यावेळी साखळीच्या कोटाचा किल्लेदार तेनेंत आंतोनियु बार्बोज हा पोर्तुगीज होता. आपला प्रांत पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी सावंतवाडकरांनी बरेच प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना कायमस्वरूपी यश प्राप्त झाले नाही.

पोर्तुगीज इतिहासलेखक लोपिक मेंडिस यांनी आपल्या ग्रंथात साखळी येथील किल्ल्याचे जे चित्र दिले आहे. त्यावरून या किल्ल्याची कल्पना येते. या किल्ल्याच्या विरुद्ध दिशेस वाळवंटीच्या उजव्या तीरावरती जी लोकवस्ती आहे ती बंदीरवाडा नावाने परिचित आहे.

श्रीपांडुरंग पंढरी हुनी तो आला साखळी नगरी॥

ये राण्यांचे भक्तीकरिता श्रीहरी।

वसे शृंखलापुरी समपाद उभा विठोबा विटेवरी

उभय अंगी निजनारी शोभती राईरखुमाई बरोबरी॥

अशा लावणीच्या गीतातून विठ्ठलापुरातले शाहीर गोंदजी नाईक यांनी श्रीविठ्ठलाच्या सान्निध्यात साखळीचा नगर म्हणून त्याकाळी उल्लेख होत होता, त्याची प्रचिती आणून दिलेली आहे. आज वाळवंटी नदीकिनारी असलेला ऐतिहासिक वारसा लोप पावण्याच्या वाटेवर आहे.

इथल्या बंदराद्वारे आपला उदर निर्वाह करणाऱ्या भूमिपुत्रांनी पारंपरिक उद्योग व्यवसायाचा त्याग करून जीवन जगण्यासाठी नव्या पर्यायांची कास धरलेली आहे.

शाहीर गोंदजी नाईक यांनी ज्या भक्तिरसपूर्ण लावण्या रचल्या, त्या इथल्या लोककलाकारांनी आत्मसात केल्या आणि त्यामुळे त्यांच्या रचनांनी लोकगीतांचा सन्मान प्राप्त केलेला आहे.

गोव्याच्या वेगवेगळ्या प्रांतातून होड्या, गलबतांनी साखळी परिसरात जो माल यायचा तो इथल्या छोटेखानी बंदरावरती उतरवला जायचा. आज नाना जातींच्या लोकांची बंदरामुळे जुन्या काळापासून इथे लोकवस्ती आहे. या बंदरात शेजारच्या संस्थानांतला माल केळघाट आणि चोर्लाघाटातून येत असावा.

म्हैसूर संस्थानच्या टिपू सुलतानने आपल्या स्वारीच्या वेळी तीन दिवस चोर्ला घाट ताब्यात ठेवला होता. त्यावरून या घाटमार्गाचे महत्त्व स्पष्ट होते.. आज साखळी, पर्ये, कारापूर, मावळंगतड इथल्या शिगमोत्सवाप्रसंगी जी लोकगीते गायिली जातात, त्यांचा अभ्यास केल्यावरती या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते.

साखळी शहरासाठी जेव्हा विविध कार्यालये इथे बांधण्यात आली त्यावेळी इतिहास आणि संस्कृतीकडे कानाडोळा केल्याने साखळी आणि विठ्ठलापुरातले कोट इतिहासाच्या उदरात कायमस्वरूपी गडप होण्याच्या वाटेवरती आहे.

सप्तशती भूमिका ही पर्ये गावची तर शांतादुर्गा ही कारापूरची अधिष्ठात्री देवता आहे. साखळी बाजारपेठेत इथल्या भूमिपुत्रांनी सप्तशती भूमिकेचा मांड निर्माण करून, शिगमोत्सवात गोंदजी नाईकच्या रचनांना गाण्याची परंपरा अव्याहतपणे चालू ठेवलेली आहे.

मराठी भाषा आणि संस्कृतीचे गतवैभव गोमंतकात शंभर वर्षापूर्वी कसे होते याची प्रचिती गोंदजीची गाणी देतात.

वाळवंटीला आलेल्या पुरात साखळी, कारापूर परिसराचे बऱ्याचदा नुकसान झालेले आहे. परंतु असे असताना इथल्या भूमिपुत्रांनी आपला इतिहास टिकवण्याची सातत्याने धडपड केलेली आहे. 1488 सालच्या एका दानपत्रात जैताजी, दीपाजी आणि सत्रौजी राणे यांनी विठ्ठल मंदिराला केलेल्या दानांचा उल्लेख आढळतो.

त्यावरून या मंदिराचा पाच शतकांहून जादा असलेल्या इतिहासाची कल्पना येते. वाळवंटी नदीच्या किनारी 1882 साली श्रीदत्त संस्थान अस्तित्वात आले. कवळे मठाशी निगडीत स्वामी पूर्णानंद यांची समाधी आणि मठ इथे आहे.

राधाकृष्णाचे गोकुळवाडी येथे असलेले मंदिर आणि पर्ये - साखळी सीमेवर असलेला हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेला बाबर पीराचा दर्गा... या साऱ्या संचितांनी साखळी - कारापूरच्या परिसराला एक आगळी वेगळी उंची प्राप्त करून दिली होती. आज हा वारसा लुप्त होण्यापासून संरक्षित करण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT