Mahadayi River: म्‍हादई सभेमागे धर्मांध शक्‍ती गुंतल्‍या होत्‍या?

भाजपचे नेते सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी म्‍हादई सभेमागे धर्मांध शक्‍ती गुंतल्‍या होत्‍या, असा आरोप केला आहे.
Mahadayi River | Save Mahadayi
Mahadayi River | Save MahadayiDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi River: भाजपचे नेते सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी म्‍हादई सभेमागे धर्मांध शक्‍ती गुंतल्‍या होत्‍या, असा आरोप केला आहे. सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्‍या भारतीय जनता पक्षाने विर्डी येथे झालेल्‍या यशस्‍वी सभेपुढे अनंत अडचणी उभ्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. साखळी येथे निश्चित झालेली सभा ऐनवेळी मान्‍यता नाकारल्‍याने दुसरीकडे हलवावी लागली.

मुख्‍यमंत्र्यांच्‍या मतदारसंघातील ही सभा रोखण्‍यासाठी सत्तेचा वापर करण्‍यात आला. लोकांनी सभेसाठी जाऊ नये, यासाठी मोहीम राबविण्‍यात आली. विरोधकांमध्‍ये ऐक्‍य निर्माण होऊ नये, यासाठी डावपेच आखण्‍यात आले. इतके होऊनही सभेला जनसागर लोटला.

वास्‍तविक, राज्‍य सरकारने म्‍हादईच्‍या समर्थनार्थ जनचळवळ सुरू व्‍हावी आणि केंद्राला राज्‍यापुढे गुडघे टेकायला लागावे, अशी राजनैतिक शक्‍कल लढवली असती तर त्‍यातून केंद्राला शह दिला आणि म्‍हादई वाचवली असा अर्थ निघाला असता. दुर्दैवाने केंद्राची व्यूहरचना यशस्‍वी होण्‍यासाठीच राज्‍य सरकारने कंबर कसली नाही ना, असा संशय घेण्‍यास वाव आहे.

Mahadayi River | Save Mahadayi
Road Development: देशाची प्रगतीसाठी रस्ते ठरले 'विकासमार्ग'

राजकीय व्यूहरचना सोडा; परंतु गेली 3 वर्षे प्रमोद सावंत सरकार या प्रश्‍‍नावर चिडिचूप आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयात हा प्रश्‍‍न उपस्‍थित होत नाही तरीही सरकारने डोळेझाक केलीय. केंद्रातील वकील बदलल्‍यानंतर दुसरा आक्रमक कायदेतज्‍ज्ञ शोधून हा प्रश्‍‍न सर्वोच्‍च न्‍यायालयात रेटण्‍याची जबाबदारी राज्‍य सरकारची नव्‍हती काय?

या पार्श्वभूमीवर जेव्‍हा केंद्रीय गृहमंत्री ‘गोव्‍यात आंदोलन होणार नाही’, असे म्‍हणाले, तेच काहीअंशी सिद्ध करण्‍यासाठी सावंत यांचे सरकार आटापिटा करते आहे. कारण, जर ‘म्‍हादई बचाव’ सभा साखळी येथे मध्यभागी झाली असती आणि तो मुद्दा प्रतिष्‍ठेचा न करता लोकांना पेटून उठायची संधी दिली असती तर केंद्राला अधिक प्रकर्षाने गोव्‍यातील असंतोष जाणवला असता.

सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी या सभेमागे धर्मांध शक्‍ती गुंतल्‍या असल्‍याचा आरोप केला, त्‍याचे कारण सुभाष वेलिंगकर आहेत. वेलिंगकर या सभेत बोलायला उभे राहिले तेव्‍हा त्‍यांची हुर्यो उडविण्‍यात आली. एवढेच नव्‍हे तर बरेच लोक सभेतून उठून निघून गेले. या सभेला सासष्‍टीतून मोठ्या प्रमाणात लोक आले. त्‍यात बहुसंख्‍य ख्रिस्‍ती समुदायाचा समावेश होता.

या जनसमुदायासमोर वेलिंगकरांना उभे करणे हीच आयोजकांची चूक होती. कारण, वेलिंगकरांनी ‘गोंयचो सायब’ अर्थात सेंट फ्रान्‍सिस झेविअर या प्रतिकाविरोधात मोहीम चालवली आहे. सेंट फ्रान्‍सिस झेविअर यांनी गोव्‍यात धर्मांतर घडविण्‍यासाठी, एवढेच नव्‍हे तर इन्‍क्‍विजीशन चालवण्‍यासाठी प्रयत्‍न केले.

त्‍यामुळे ते ‘गोंयचो सायब’ ठरत नाहीत, असे वेलिंगकर नेहमी ठासून सांगतात. त्‍यामुळे ख्रिस्‍ती समाजाच्‍या भावना दुखावणे शक्‍य आहे. सेंट फ्रान्‍सिस झेविअर यांनी धर्मच्छल चालविला, इन्‍क्‍विजीशन लादले ते ख्रिस्‍ती समाजाविरोधातच!

तरीही या समाजाचे ते धार्मिक व सांस्‍कृतिक प्रतीक बनले आहेत. केवळ ख्रिस्‍ती नव्‍हे तर हिंदू समाजातील अनेक जण जुने गोवेतील फेस्‍तावर उपजीविका करतात व सेंट फ्रान्‍सिस झेविअरला ‘गोंयचा सायब’ म्‍हणतात.

Mahadayi River | Save Mahadayi
Mahadayi River: गोव्यात म्हादईचे पाणी तापले; सत्ताधाऱ्यांची दडपशाही झुगारून नागरिक रस्त्यावर

जेव्‍हा एखादे प्रतीक अनेक वर्षे भजले जाते व लोक त्‍याचा आदर करतात ती बाब एक धार्मिक अस्‍मिता बनते. या मानसिकतेच्‍या विरोधात जाऊन ख्रिस्‍ती समाजाला डिवचण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या वेलिंगकरांना त्‍या समाजात खात्रीने मान मिळणार नाही.

परंतु, एक गोष्‍ट मानली पाहिजे, वेलिंगकरांनी वेगवेगळ्या व्‍यासपीठावरून ‘गोंयचो सायब’ व इतर ख्रिस्‍ती प्रतीकांविरुद्ध आगपाखड केली असली तरी या समाजाने अद्याप त्‍यांना उत्तर दिलेले नाही. तरीही त्‍या समाजाचे प्राबल्‍य असलेल्‍या सभेत वेलिंगकर उभे राहतात तेव्‍हा काही भडक माथ्‍याची लोकं गोंधळ घालणार हे स्‍वाभाविकच होते.

अशा बेलगाम वागण्‍यासाठी ख्रिस्‍ती समाजालाच दोष देऊन चालणार नाही. हिंदू धार्मिक प्रतिकांविरुद्ध ख्रिस्‍ती समाजातील कोणा एका उपटसुंभाने जर अशीच गैरभाषा वापरून उपमर्द केला असता तर हिंदू रक्षक किंवा तथाकथित भक्‍तांनी त्‍याचे काय केले असते, याचा सध्‍याचा काळात विचारच न केलेला बरा.

घरामध्‍ये मांस ठेवल्‍याच्‍या नुसत्‍या संशयावरूनही देशात खून पाडले जाऊ लागले आहेत. ख्रिस्‍ती धर्मगुरू आणि नन्‍स यांच्‍या छळवादाची अनेक उदाहरणे आहेत. हे हिंदूरक्षक व तथाकथित भक्‍त सिद्धार्थ कुंकळ्येकरांना धर्मांध शक्‍ती वाटत नाहीत.

दिवंगत पर्रीकरांनी याच ख्रिस्‍ती समाजाला निकट जाण्‍यासाठी ‘मिशन सालसेत’ राबवले होते. याच समाजातील धर्मगुरूंच्‍या वारंवार भेटी घेतल्‍या जायच्‍या. परवाच गोव्‍याच्‍या पर्यटनमंत्र्यांनी अनेक धर्मगुरूंची भेट घेऊन त्‍यांना मोदींवरचे पुस्‍तक भेट दिले आहे.

गेल्‍याच महिन्‍यात पंतप्रधान मोदी यांनी आपल्‍या गोवा भेटीत भाजपच्‍या नेत्‍यांना अल्‍पसंख्‍याक समाजाला निकट जाण्‍याचा सल्‍ला दिला होता. केवळ निवडणुकीत तुम्‍ही त्‍यांना निकट जाता. हे सौदार्ह पाचही वर्षे टिकले पाहिजे, असे सांगण्‍यासही मोदी विसरले नव्‍हते.

त्‍यानंतर अवघ्‍या एका महिन्‍यात सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना म्‍हादई प्रश्‍‍नाचा पोटशूळ उठल्‍यानंतर ख्रिस्‍ती समाजाला- जे जनमत कौलाचे स्‍मरण करून म्‍हादई वाचविण्‍याच्‍या सादाला प्रतिसाद देऊन या सभेला मोठ्या संख्‍येने जमले होते - त्‍यांना लक्ष्‍य केले आहे.

कुंकळ्येकर यांना एक गोष्‍ट समजायला हवी, ती म्‍हणजे उत्तर गोव्‍यातील बहुसंख्‍य हिंदू समाजालाच म्‍हादईच्‍या प्रश्‍‍नाची अधिक झळ पोहोचणार आहे. त्‍या समाजाच्‍या पाठीशी उभे राहण्यासाठी ख्रिस्‍ती समाज सगळे मतभेद विसरून या लढ्यात उतरू पाहत आहे.

उलट हिंदू समाजाला अद्याप या प्रश्‍‍नाचे गांभीर्य समजलेले नाही. सत्तरीतील लोक ‘बाबां’च्‍या धाकाखाली आहेत. घराघरांत नोकऱ्या दिल्‍याने उपकाराच्‍या ओझ्‍याखाली वाकलेले आहेत. साखळीमध्‍ये मुख्‍यमंत्र्यांचा रोष सहन करावा लागेल, अशी अनेकांना भीती आहे.

इतर तालुक्‍यांमध्‍येही हिंदू समाजामध्‍ये अद्याप जनजागृती झालेली नाही. दुर्दैव म्‍हणजे या समाजाचे आध्‍यात्‍मिक नेतृत्‍व करणारे संत महंतही एकतर मौन बाळगून आहेत किंवा त्‍यांनी राजकीय झालर असलेल्‍या भगव्‍या शाली पांघरलेल्‍या आहेत.

Mahadayi River | Save Mahadayi
Mahadayi River : ...अन्यथा गोव्याचे होईल वाळवंट!

दुसऱ्या बाजूला कर्नाटकमध्‍ये केवळ राजकीय नेतेच नव्‍हे तर तेथील बहुजन समाजाला आध्‍यात्‍मिक प्रगतीकडे नेतानाच अशा ज्‍वलंत प्रश्‍‍नांवर सजग बनविण्‍याचे काम मठाधिपतींनी केले आहे. ख्रिस्‍ती समाजाला धर्मांध म्‍हणणे सोपे; परंतु जनमत कौलात या समाजाने आणि त्‍यांच्‍या धर्मपीठाने सर्वशक्‍तीनिशी भरीव योगदान दिले नसते तर गोवा शिल्‍लक राहिला नसता.

त्‍यांनी राजभाषा प्रश्‍‍नावर रान पेटवले नसते तर गोव्‍याला घटकराज्‍य दर्जाही मिळाला नसता. शिवाय गोव्‍यात 40 आमदारही उत्‍पन्‍न झाले नसते. याचा अर्थ असा - ख्रिस्‍ती समाजामुळेच गोव्‍याला राजकीयदृष्‍ट्‍याही अधिक अधिकार प्राप्‍त झाले.

दुर्दैवाने, ख्रिस्‍ती समाज दुबळा आणि अधिकच अल्‍पसंख्‍याक होत गेला. या समाजाला एकटे पाडणे, त्‍यांच्‍यावर हेत्‍वारोप करणे आता थांबले पाहिजे. त्‍यांना धर्मांध म्‍हणणाऱ्या सिद्धार्थ कुंकळ्येकरांसारख्‍यांनी या समाजाकडे एक बोट दाखवताना आपल्‍याकडे चार बोटे वळलेली आहेत, हे विसरता कामा नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com