Goa Cricket
Goa Cricket Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Cricket: क्रिकेटचा राजकीय तमाशा!

दैनिक गोमन्तक

Goa Cricket: गोवा क्रिकेट असोसिएशन अर्थात जीसीएची निवडणूक नेहमीच औत्‍सुक्‍यपूर्ण ठरते. त्‍याचा पुनर्प्रत्‍यय आलाय. ‘मैदानात क्रिकेटची पीछेहाट झाली तरी चालेल; पण प्रशासनावर मजबूत पकड हवीच’ या धारणेतून संबंधित सारे अक्षरश: जीवाचे रान करतात. हे थोडे की काय म्‍हणून त्‍यात यावेळी राजकीय नेते, पक्षांची भर पडली. एकूणच घडलेल्‍या समीकरणांचा उहापोह करता 'जीसीए'च्‍या निवडणुकीचे राजकीय आखाड्यात रूपांतर झाले, असे म्‍हटल्‍यास वावगे ठरू नये.

सहा सदस्यीय व्यवस्थापकीय समितीवर चेतन देसाई यांचा वरचष्‍मा राहणार, हे आता स्‍पष्‍ट झाले आहे. तथापि, अंतरंगातील आयामही रोचक आहेत. विनोद (बाळू) फडके व चेतन देसाई हे एकेकाळचे जिगरी दोस्त; परंतु कालऔघात ते कट्टर वैरी बनले. दीड वर्षापासून एकमेकांना ते टाळत होते. कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी तत्‍कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोघांनाही एकत्र पोलिस कोठडीत डांबले होते.

या आठवणी ताज्‍या असतानाच पर्रीकर यांच्याच भारतीय जनता पक्षाने जीसीए निवडणुकीत बाळू व चेतन यांची पाठराखण केली. जीसीए निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना मुख्यमंत्री सावंत यांनी बाळू, चेतन या द्वयींच्‍या गटांसोबत फोटो काढून हौस भागविली, दोन्‍ही गटांना त्‍यांनी सहकार्याविषयी आश्वस्‍त केले. त्या बदल्‍यात मुख्यमंत्र्यांनी आपल्‍या मर्जीतील रोहन गावस देसाई यांना जीसीए सचिवपदी बिनविरोध निवडून आणले.

‘सचिव आपला, बाकीच्या पदांसाठी आता तुम्ही भांडा,’ हीच भूमिका मुख्यमंत्र्यांच्या कृतीतून दिसून आली. सचिवपदी आपला माणूस आणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या राज्यातील क्रिकेटवर पकड मिळवण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातही फूट पाहायला मिळाली.

मुख्यमंत्र्यांनी दोन्ही गटांशी समान अंतर ठेवले; पण हल्लीच भाजपात दाखल झालेले मडगावचे आमदार दिगंबर कामत, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मंत्री सुभाष फळदेसाई, आणखी एक मंत्री सुभाष शिरोडकर यांचा पाठिंबा चेतन देसाई गटाला मिळाला. त्या अनुषंगाने समूह छायाचित्रे सोशल मीडियावरही व्हायरल झाली.

मगो पक्षाचा फोंड्यातील बुलंद आवाज डॉ. केतन भाटीकर सुरवातीपासून चेतन देसाई यांची पाठराखण करत होते, तर मगो पक्षाचे पदाधिकारी व सुदिन ढवळीकर यांच्या खास मर्जीतील मडकई येथील अनंत नाईक हे बाळू फडके गटाचे उमेदवार होते. ढवळीकर यांचा आशीर्वाद असूनही अनंत यांना एका मताने पराभूत व्हावे लागले.

मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील रोहन गावस देसाई आपण बाळू फडके गटाचा असल्याचे जाहीरपणे सांगत असताना, डिचोलीतील भाजपचे दिग्गज नेते माजी आमदार राजेश पाटणेकर यांनी चेतन देसाई गटाकडून निवडणूक लढविली व ते सर्वाधिक मते मिळवून जिंकून आले.

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप पाहता, संघटनेचा कारभार भविष्यात मुख्यमंत्र्यांच्या अथवा भाजपच्या कार्यालयातून चालल्यास नवल वाटू नये. निवडणुकीत चेतन देसाई गटाचे चौघे निवडून आले. त्यामुळे व्यवस्थापकीय समितीत त्यांचाच दबदबा राहील. अध्यक्षपदी बंधू महेश देसाई निवडून आले नाहीत, तरी महत्त्वाचे खजिनदारपद चेतन यांच्याकडे आहे.

कदाचित भविष्यात सचिव रोहनही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या गटात सामील होऊ शकतात. त्यामुळे बाळू यांचे पुत्र विपुल जीसीए अध्यक्ष बनले, तरी ते फक्त शोभेचे बाहुलेच असतील. प्रत्‍यक्षात अधिकार कोणताच नसेल. म्‍हणूनच बहुदा जीसीए अध्‍यक्षपद मिळूनही विपुल यांचा चेहरा गुरुवारी निवडणूक निकालानंतर पडला होता. आपल्यासमोर काय वाढून ठेवलेय, हे त्यांना पक्के ठावूक असावे.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींमुळे देशातील क्रिकेटमध्ये मोठे परिवर्तन घडले आहे. संघटनेत तीन ‘टर्म’ पद भूषविणारा पदाधिकारी आपोआप बाद ठरतो. याच कारणास्तव तीन वर्षांपूर्वी चेतन व बाळू तसेच माजी उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांना निवडणूक लढविता आली नव्हती. मात्र, यावेळी त्यांनी भलतीच शक्कल लढविली.

चेतन यांचा बंधू, बाळू व मुल्ला यांच्या पुत्रांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आणि गोमंतकीय क्रिकेटमधील घराणेशाही समोर आली. 107 संलग्न क्लबांना मतदानाचा अधिकार होता; त्यापैकी बहुतांश क्लबनी विपुल यांचा अपवाद वगळता राज्यातील क्रिकेटमधील घराणेशाही नाकारली हेच चांगलेच झाले. मुल्ला यांच्या मुलास केवळ 44 मते मिळाली. यावरून ते क्रिकेट प्रशासनासाठी अपरिपक्व असल्याचे क्लबांनी दाखवून दिले.

सचिव या नात्याने मागील तीन वर्षांत विपुल यांनी चांगले कार्य केले होते, त्याचा फायदा त्यांना यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झाला. सदस्यपदाचे उमेदवार गोविंद गावकर यांनाही क्लबांनी नाकारले. त्यांचा बंधू पोलिस अधिकारी असूनही त्‍यांच्‍या वलयाचा काही फायदा झाला नाही. सध्याची व्यवस्थापकीय समिती यापुढे कार्यरत असताना क्लबांना मोठी भूमिका बजावावी लागेल. निवडणुकीत घेतलेली परिपक्वता यापुढेही दाखवावी लागेल.

गोव्यातील क्रिकेटपटू कुठे हा प्रश्न विचारण्याची पाळी आज आली आहे. गोव्याच्या वयोगट तसेच रणजी संघात दिल्ली आणि देशातील इतर भागातील क्रिकेटपटू स्थानिक बनून खेळतात. त्यामुळे गोमंतकीय क्रिकेटपटूंची संधी हिरावली जाते. ही कुप्रवृत्तीच आहे. निवडणुकीच्या काळात चेतन देसाई यांच्या गटाने या विरोधात आवाज उठविला.

आता व्यवस्थापकीय समितीत बहुमत मिळाल्यामुळे त्यांच्या गटाला परप्रांतीयांना रोखणे शक्य आहे. त्या विषयीचे आश्‍वासन ‘जुमला’ ठरू नये. कारण, होतकरू गोमंतकीय क्रिकेटपटू संधी मिळत नसल्यामुळे प्रचंड निराश आहेत. चेतन देसाई गटाचे बहुमत, विपुल फडके अध्यक्ष बनणे ही बाब ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ अशी स्थिती कदापि ठरू नये. या शिलेदारांच्‍या हातून क्रिकेटचे उन्‍नयन घडावे, अशीच समस्‍त गोमंतकीयांची अपेक्षा आहे. ती फलद्रुप व्‍हावी, हीच सदिच्‍छा!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT