Cancer in Goa : गोव्यासमोर कर्करोगाचं मोठं आव्हान

कर्करोग हा जगातील सर्वात जीवघेणा आजार बनला आहे. ऑक्टोबर हा कर्करोग जागृती महिना म्हणून पाळला जातो. या आजारावर अजूनतरी इलाज नाही. काही डॉक्टर म्हणतात, सध्या तरी ‘चमत्कार’ होऊनच हा आजार बरा होऊ शकतो, परंतु ‘चमत्कार’ म्हणजे नक्की काय? तर कर्करोगाचा डंख तुम्हाला होऊच द्यायचा नाही. तुम्ही डोळसपणे अशी जीवनशैली स्वीकाराल ज्या शरीराला कर्करोग विळखा घालूच शकणार नाही...
Cancer
Cancer Dainik Gomantak

Cancer in Goa : गोव्यात कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. गेली दहा वर्षे या विषयावर प्रामुख्याने चर्चा होते, परंतु ठोस असे उपाय आपल्याला योजता आलेले नाहीत. तज्ज्ञ डॉक्टर सांगतात, कर्करोगाचे निदान आधी झाल्यास पहिल्या टप्प्यामध्ये त्यावर इलाज करता येतो. दुर्दैवाने आपल्याकडे बहुसंख्य रुग्ण शेवटच्या टप्प्यात इस्पितळामध्ये येतात. त्यासाठी रुग्णांना जबाबदार धरले जाते, परंतु त्यांचा तो दोष आहे का?

शेवटच्या टप्प्यामध्ये रुग्ण इस्पितळात येण्यास दोष द्यायचाच तर डॉक्टरांना द्यावा लागेल. स्थानिक पातळीवर रुग्णांना इलाज करण्यास डॉक्टरांना अपयश आले आहे. गंभीर आजारांविषयी गावपातळीवर काम करणाऱ्या डॉक्टरांना एकतर त्यांची माहिती नसते किंवा हवा त्या प्रमाणात त्यांचा अभ्यास नसतो. एक गोष्ट प्रथमच स्पष्ट करतो, कर्करोग हा सर्वात अधिक बळी घेणारा दुसरा महाभयंकर आजार आहे.

संपूर्ण ऑक्टोबर महिना आम्ही देशभर कर्करोग विरोधी साजरा करीत आहोत. त्यामुळे असे अनेक मुद्दे चर्चेला येत आहेत. त्यावर तोड म्हणून गोव्यात आता पूर्ण दर्जाचे कर्करोग केंद्र सुरू केले जाणार आहे. या वर्षाच्या शेवटापर्यंत ते तयार होईल. सध्या गोमेकॉच्या संकुलातच त्याची उभारणी सुरू आहे. 120 खाटांच्या या देशातील महत्त्वाच्या केंद्रासाठी 350 कोटी रुपये खर्च येणार आहेत. सुरुवातीला गोमेकॉतच 40 कोटी रुपये खर्चून एक छोटा कर्करोग ब्लॉक उभारण्याची कल्पना होती. परंतु केंद्राने 40 टक्के खर्चाची हमी देताच हा सर्वंकष प्रकल्प उभा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आता केंद्राने 27 कोटी मंजूर केले आहेत. 18 महिन्यांत ही इमारत पूर्ण होणार आहे. परंतु प्रश्‍न आहेच, सुसज्ज इमारत आणि पायाभूत सुविधा तयार केल्या म्हणून कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात केली जाऊ शकेल काय?

गोव्यामध्ये स्तनकर्करोगाचे प्रमाण सारखे वाढत चालले आहे. 2018-19 मध्ये 362 प्रकरणे नोंदविण्यात आली होती. त्यानंतर 2020-21 मध्ये 290, 2021-22 मध्ये 268, तर 2022 मध्ये जानेवारी ते मे दरम्यान 108 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. हा एक जीवनशैलीचा आजार असल्याचे म्हटले जाते.

डॉक्टर सारखे सांगत असतात, या आजारासंदर्भात जनजागृती झाली पाहिजे, यासाठी आजाराचे निदान लवकर झाले पाहिजे. डॉ. अनुपमा बोरकर यांच्या मते स्तनामध्ये गाठ जाणवल्यावर आणि ती जर दुखत नसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे यायला पाहिजे. ही गाठ जर कर्करोगाची असेल आणि सहा महिने जरी उशीर झाला तर तो शरीरात इतर ठिकाणी पसरतो. त्यांच्या मते 40 वयानंतर प्रत्येक महिलेने डॉक्टरांकडे जाऊन स्तनाची तपासणी केली पाहिजे.

गोमेकॉमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेऊन आता उपायही त्वरित योजण्याची व्यवस्था आहे. डॉक्टरांच्या मते 2020 मध्ये स्तनाचा कर्करोग लवकर आढळून आल्याचे प्रमाण 41 टक्के आहे. यावर्षी गोमेकॉने इलाज केलेल्या महिलांमध्ये 41 टक्के कर्करोग त्या जागेपुरता सीमित राहिला होता. तर 60 टक्के महिलांमध्ये कर्करोग वाढलेल्या टप्प्यात गेला होता. 2018 मध्ये गोमेकॉमध्ये कर्करोग विभाग सुरू करून डॉ. अनुपमा बोरकर यांची या विभागाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. या विभागात महिन्याकाठी 450 ते 500 रुग्ण प्रवेश घेतात. यावरून या आजाराचे गोव्यातील गांभीर्य लक्षात यावे. दुर्दैवाने या विभागात केवळ 13 खाटा आहेत.

गोमेकॉमध्ये सध्या कर्करोगाशी मुकाबला करणारे 30 वर्षांखालील दोन रुग्ण आहेत. याचा अर्थ कर्करोग तरुणांमध्येही आपले जाळे पसरवू लागला आहे. अर्भकांमध्येही कर्करोगाचे प्रमाण दिसून येते, त्यावर इलाज करणारा खास विभाग जगात अनेक ठिकाणी आहे.

गोव्यात कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक एवढ्यासाठी कारण यावरील इलाज एकच मध्यवर्ती ठिकाणीच होतो. अद्यापही ग्रामीण भागात त्याविषयावर योग्य जागृती झालेली नाही. डॉक्टरांमध्ये तर जागृतीचे प्रमाण अधिकच वाढले पाहिजे.

Cancer
Flood in Sattari : सत्तरी पुराच्या छायेत जाण्यामागची नेमकी कारणं काय?

कर्करोग हा जगभर गांभीर्याने वाढला जाणारा आजार असला तरी अद्याप आपल्या देशात त्यासंदर्भात योग्य प्रमाणात जागृती होत नाही. भारतीय वैद्यकीय अनुसंधान केंद्राने देशभर सर्वेक्षण केले, त्यात 5 टक्क्यांहून अधिक लोकांना कर्करोग तपासण्यांची माहिती होती. महिलांमध्येही हे प्रमाण कमीच आहे. शहरी भागात तर कर्करोगासंदर्भात कमीच जाणीव आहे व अत्यल्प लोकांनी त्यासाठी स्वतःची तपासणी करून घेतली आहे. ग्रामीण भागात स्वाभाविकच हे प्रमाण आणखी कमी आहे. कर्करोगाची तीन महत्त्वाची कारणे आहेत. तंबाखू सेवन, मद्य, कौटुंबिक पार्श्‍वभूमी व काही अनाकलनीय कारणे- ज्याला डॉक्टर बॅडलक असे संबोधतात. हा बॅडलक प्रदूषित हवा, लठ्ठपणा किंवा इतर लहान मोठ्या वाईट सवयींमुळे होऊ शकतो. पॅसिव्ह स्मोकिंगमुळेही कर्करोग होऊ शकतो, असे निदान काढण्यात आले आहे. साठवून ठेवलेले अन्न, मिठाचा जादा वापर, आंबविलेले पदार्थ यामुळेही कर्करोग उद्भवत असल्याचे नोंदविण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्यंत अपुरी आरोग्य सेवा व तपासणीमधील हयगय यामुळे आपल्या देशात कर्करोगावर वेगाने इलाज होण्यात विलंब लागतो. भारतामध्ये कर्करोग्यांची संख्या 19 ते 20 लाख असली तरी प्रत्यक्षात ती तीन पटींनी अधिकच आहे. त्यामुळे कर्करोगावरील चाचण्या अधिक आक्रमकरीत्या वाढवाव्यात अशी मागणी होते. चीन व अमेरिकेपाठोपाठ कर्करोगाचे प्रमाण अधिक असलेला भारत हा तिसरा देश आहे. स्तन, फुफ्फुसे व गर्भपिशवीच्या कर्करोगाचे प्रमाण आपल्याकडे अधिक आहे. 2020 मध्ये या रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या होती 8 ते 9 लाख.

जगभर कर्करोग हा विषय आक्रमकरीत्या अभ्यासला जात आहे. प्रगत देशांनी त्यासाठी जादा निधीची तरतूद केली आहे. कर्करोगाचे निदान लवकर न होणे हा सध्या जगभरच चिंतेचा विषय बनला आहे. जगभर कर्करोगाचे निदान उशिरा झाल्याने जिवाला धोका निर्माण होतो, त्याशिवाय अनेक श्रीमंत देशांमध्येही कर्करोगावर आधुनिक औषधे तसेच उपचारपद्धती उपलब्ध नाहीत.

बहुसंख्य देशांमध्ये कर्करोगावरचे उपचार महागडे आहेत. त्यावरची आधुनिक औषधे उपलब्ध नाहीत आणि अनेक देशांनी तर या नव्या उपचारपद्धतीला मान्यताही दिलेली नाही. याचे कारण आपल्या देशासारखेच तेथे संशोधनाला कमी महत्त्व दिले जाते. आपल्याकडेही रुग्णांना आधुनिक कर्करोग केंद्रामध्ये लवकर पाठवण्यात हयगय केली जाते. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात कमीच लोक सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इस्पितळात दाखल होतात आणि जेव्हा ते येतात तेव्हा हा आजार बळावलेला असतो व उपचार पद्धतीवरचा खर्च वाढतो. कर्करोगाचे निदान व्हावे यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात जादा लोकांच्या तपासणी हाती घेणे आवश्‍यक बनले आहे.

अजूनही आपल्या सरकारला संशोधनामध्ये फारसे स्वारस्य नाही. प्रगत देशांचीही कथा फारशी वेगळी नाही. अजूनपर्यंत श्रीमंत देश व काही मोजक्या औषध कंपन्या संशोधनात गुंतल्या आहेत. या विषयावर खूपच कमी देशांमध्ये प्रत्यक्ष संशोधन आणि रुग्णांवर इलाज चालतो. अमेरिका त्याबाबतीत पुढारलेला असला तरी अजूनही त्या देशात विशिष्ट टप्पा ओलांडलेल्या कर्करोग रुग्णांवर फारसा इलाज होत नाही.

मानवी शरीरामध्ये कर्करोगाचा दंश अनेक ठिकाणी होऊ शकतो. दुर्दैवाने सर्वच प्रकारच्या कर्करोगावर संशोधन आणि इलाज झालेला नाही. शरीराच्या काही सूक्ष्म भागामध्ये कर्करोगाचा विषाणू पोहोचतो, तेव्हा डॉक्टरही हतबल होतात. बऱ्याचवेळेला डॉक्टर वेगळेच दुखणे सांगून रुग्णांवर अनावश्‍यक उपचार करीत राहतात. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातच ही व्याधी कर्करोगाची असल्याचे अनुमान काढले जाते. बहुसंख्य प्रकारच्या कर्करोगावर तर अद्याप इलाजच नाही.

Cancer
Road Safety in Goa : गोवा वाहतुकीच्या दृष्टीने किती सुरक्षित?

कर्करोगावरच्या विविध अभ्यासामध्ये उशिरा दाखल झालेल्या रुग्णांसंदर्भात अजूनही साशंकता असल्याचे अनुमान निघते. उशिरा दाखल झालेल्या रुग्णाला कोणती उपचार पद्धती द्यावी, यावर आपल्याकडे खूपच कमी अभ्यास झालेला आहे आणि त्यावरचे तज्ज्ञही आपल्याकडे कमीच आहेत. मुंबई आणि काही महानगरामध्येच श्रीमंत इस्पितळांमध्ये अशा डॉक्टरांचे वास्तव्य असते आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ही उपचारपद्धती आहे. कर्करोग कधी बरा केला जाऊ शकतो का, हा एक प्रश्‍न नेहमी विचारला जातो. नोबेल पुरस्कारप्राप्त जर्मन संशोधक डॉ. हेराल्ड जुर हौसेन यांच्या मते, उत्तर देण्यास कठीण असा हा प्रश्‍न आहे. कर्करोगाचे प्रमाण आम्ही विविध उपायांनी जरूर कमी करू शकतो, परंतु जगभर सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढतेय. काहींमध्ये बरा होऊन तो पुन्हा उद्‍भवतो, हे एक कठोर सत्य आहे. ‘सध्या कर्करोगामुळे ओढवणारे मृत्यू वाढले असले तरी कर्करोगाचे सारेच रुग्ण मृत्युमुखी पडतात असे नव्हे. आम्हाला भविष्यात कर्करोग रोखण्यासाठी खूप काम करायचे आहे...’ असे ते म्हणतात. डॉ. हौसेन यांच्या मते, काही प्रकारचे कर्करोग होऊ नयेत यासाठी उपाय योजण्यात आम्ही यश मिळविले आहे. हेपिटायटीस बी (यकृताच्या कर्करोगाचे कारण) सारखे आजार आम्ही लस देऊन बरे करू शकतो. संसर्गाने फैलावणाऱ्या मानवी कर्करोगावरही मात करण्याचा प्रयास आहे व आम्ही त्यावर मात करण्यात यश मिळवू. ‘‘केवळ आरोग्यक्षेत्र नव्हे तर सामाजिक क्षेत्रानेही हातमिळवणी करून हा आजार टाळण्यासाठी मोहीम राबविली पाहिजे व एक नवा दृष्टिकोन तयार झाला पाहिजे’’, असे त्यांचे मत आहे.

भारतासारख्या उच्च मध्यम वर्गाकडे वाटचाल करीत असलेल्या देशाला आता अधिकतम लोकसंख्येची तपासणी करण्याचे आव्हान पेलावे लागेल. उच्च-मध्यम वर्गाची जीवनशैली, देशातील वाढते प्रदूषण व वातावरण बदल अशी काही कारणे आता कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाला कारण ठरू लागली आहेत. देशात जर कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे आपल्या सरकारला माहीत असेल तर आरोग्याचा अग्रक्रम बदलून आता जादा लोकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट सरकारला हाती घ्यावे लागेल, असे त्याविषयाचे जाणकार बोलू लागले आहेत.

कर्करोग उपचार पद्धती महागडी आणि फारच किचकट असल्याने कर्करोग टाळण्याचे उपायही आता मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत नेणे आवश्‍यक बनले आहे. सुदृढ जीवनाचे महत्त्व आता लोकांच्या मनावर बिंबवले पाहिजे आणि ही व्यवस्था शालेय जीवनापासून सुरू होणे आवश्‍यक आहे.

अनेक प्रगत देशांनी कर्करोगावर मात करण्यासाठी जे उपाय सांगितले आहेत, त्यात व्यायामाला खूपच महत्त्व देण्यात आले आहे. कर्करोगाबरोबर विस्मृती, हृदयविकार व इतर शारीरिक व्याधींसाठी व्यायाम किंवा नियमित चालणे हे उपाय अधोरेखित करण्यात आले आहेत. एका संशोधन पत्रिकेत म्हटले आहे, दररोज नियमितपणे दहा हजार पावले चालल्यामुळे कर्करोगासह बरचे दुर्धर आजार कमी होऊ शकतात. भरपूर चाला, आवश्‍यक व्यायाम नियमित करा, पोषक अन्नाचे सेवन करा व घातक जीवनशैली टाळा, असा हा मंत्र आहे. नियमित चालल्याने तर लवकर मृत्यू येण्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकते, असे हृदयरोग व कर्करोग तज्ज्ञ सांगतात. 10 हजार पावले चालणे हा शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा एक उत्तम मार्ग मानला जातो. यामुळे जगभर लोकांनी दुर्धर आजारांपासून स्वतःची सोडवणूक करून घेतली असल्याचे विविध संशोधन सांगते.

देशात स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत असले तरी अजून महिला त्या आजाराकडे गांभीर्याने पाहात नाहीत. 20 ते 30 या वयापासून खबरदारी घेतल्यास या कर्करोगावर मात करता येते असे तज्ज्ञ सांगतात. हा आजार 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना होण्याचा धोका असतो. कर्करोगाच्या एका कारणांपैकी आनुवंशिकता हे एक असले तरी तरुण वयात जीवनशैली आटोक्यात ठेवली तर स्तनाच्या कर्करोगावर मात करता येते. वजनावर नियंत्रण व पोषक आहार, स्तनपान, योग्यवेळी मुलांचा जन्म, व्यायाम या उपायांमुळे या प्रकारचा कर्करोग 20 ते 40 टक्क्यांनी नियंत्रणात आणला जाऊ शकतो. एखाद्या निकटच्या नातेवाइकास झाला असल्यास तो आनुवंशिकतेने मुलांमध्येही येईल, यातही वास्तव नाही, परंतु अशा अपत्यांनी जागरूक राहिले पाहिजे. कुटुंबात कर्करोग असल्याने अभिनेत्री आंजेलिना जॉलीने आपले स्तन कापून टाकले होते. हा प्रयोग आपल्याकडेही अनेकांनी केला, परंतु अशा अघोरी उपायांपेक्षा खबरदारी घेऊन या आजारावर मात करता येते.

गोव्यात कर्करोगाचे वाढते संकट व सरकारी पातळीवर सुरू होणारे कर्करोग केंद्र यांचे संतुलन राखणे आवश्‍यक आहे. गोव्यासारखे संपूर्ण दर्जाचे कर्करोग केंद्र देशात केवळ पाच राज्यांमध्ये आहे. या केंद्रात रक्तपेढीसह सर्व पायाभूत सोयी निर्माण होतील व तेथे सर्व प्रकारच्या कर्करोगांवर इलाज करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांच्या मते गोव्यातील इस्पितळ मुंबईच्या टाटा इस्पितळाशी संलग्न असेल व त्यासंबंधी लवकरच सामंजस्य करारावर सह्या केल्या जाणार आहेत. परंतु, कर्करोग केंद्र व पायाभूत सुविधा यामुळे राज्यातील कर्करोगाचे प्रमाण कमी होईल का, हा विचार करण्यासारखा प्रश्‍न आहे. देशात अनेक ठिकाणी कर्करोग संशोधन केंद्रे आहेत. परंतु आवश्‍यक व कुशल तज्ज्ञांचा तेथे अभाव आहे. देशातील तज्ज्ञांमध्ये प्रगत देशांमध्ये ज्या सुखसुविधा दिल्या जातात, तशा आपल्या देशात मिळत नाहीत. शिवाय संशोधनात तेथे मिळणारे स्वातंत्र्य आपल्याकडे नाही आणि निधीचीही तरतूद अत्यल्प आहे. राज्यातील खजिन्याची ओढाताण पाहता आपल्याला किती प्रमाणात साधनसुविधा उभारणे शक्य आहे असा प्रश्‍न निर्माण होतो, शिवाय या सोयी सुरू ठेवण्यासाठी सतत निधी देत राहावे लागेल. त्यासाठीही मुक्तद्वार मिळणे कठीणच आहे.

गोव्यामध्ये गोमेकॉमध्ये 450 ते 500 रुग्ण कर्करोगावरील उपचारासाठी दाखल होत असतील, तर ही खरी चिंतेचीच बाब म्हणावी लागेल. त्यात स्तन कर्करोगाचे प्रमाण वर्षाकाठी 300 ते 350 असेल तर तीही गंभीर बाब मानली गेली पाहिजे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जाहीर झालेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षातील कर्करोग्यांची संख्या दीड ते तीन पटींनी अधिक आहे. अधिकतर रुग्ण कर्करोगाचे निदान झाल्यानंतरही आणखी तपासण्या करून निदान पक्के करून घेतात. त्यामुळे अधिक अवधी खर्च होतो. त्यासाठी सुसज्ज इस्तिपतळ आणि तज्ज्ञ हवे आहेतच, परंतु स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या डॉक्टरांनाही वाढत्या आजाराची दखल घ्यायला लावणे महत्त्वाचे आहे. हे डॉक्टर जोपर्यंत या आजारासंदर्भात ‘सुशिक्षित'' होणार नाहीत, तोपर्यंत ही लढाई अपुरीच राहील आणि शेवटच्या टप्प्यांमध्ये आलेल्या रुग्णांवर इलाज करणे कठीण असते, त्याचा जीव वाचवणे तर अगदीच अशक्य... अशी ही लढाई कठीणच आहे, परंतु आपण योग्य पद्धतीने सुरुवात करणे कधीही उचित.

-राजू नायक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com