Goa Congress: काँग्रेसला आत्मसंशोधनाची गरज

Goa Congress: काँग्रेसची स्थिती आज 'असुनी नाथ, मी अनाथ' सारखी झाली आहे.
Goa Congress
Goa Congress Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress: परवा झालेल्या जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अक्षरशः पानिपत झाले. तीनही मतदारसंघात काँग्रेस तिसऱ्या क्रमाकांवर फेकली गेली. आरजी व आप देखील काँग्रेसला ‘ओव्हरटेक’ करून पुढे गेले. रेईश मागुश मतदारसंघात तर काँग्रेसच्या प्रगती पेडणेकर यांना फक्त 509 मते पडली. संस्थान खालसा झालेल्या सस्थानिकासारखी आता काँग्रेसची अवस्था व्हायला लागली आहे.

दवर्लीत आपने भाजपला दिलेले लढत पाहता ही भविष्याची नांदी तर नव्हे ना असे वाटायला लागले आहे. मात्र, काँग्रेसच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांना याचे सोयरासुतक पडले आहे, असे बिलकुल वाटत नाही. त्यामुळे आत्मसंशोधन करण्याचीही आवश्‍यकता भासत नाही. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे तर अजूनही हवेतच तीर मारताना दिसत आहेत. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव आहे, असे बिलकुल वाटत नाही.

Goa Congress
Goa Diwali 2022: ''दिवाळीचा फराळ अन् फराळाची दिवाळी''

वास्तिवक राज्यातील काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीला जबाबदार आहेत ते चोणडकर व नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री दिंगबर कामत हेच. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी काँग्रेस सोडताना काँग्रेसच्या बिकट स्थितीचे खापर कामत व चोडणकरांवर फोडले होते. जोपर्यंत हे दोघे काँग्रेसमध्ये आहेत, तोपर्यंत राज्यात काँग्रेसला भविष्य नाही असे, सूचक उद्गारही रवींनी त्यावेळी काढले होते.

आज दिगबंर भाजपमध्ये जाऊन रवींच्या माडीला माडी लावून बसल्यामुळे आता दोषाचा फोकस फक्त चोडणकरांकडे लवतो आहे. चोडणकरांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी ते अधूनमधून सरकारवर शेरेबाजी करताना दिसतात. परवा त्यांनी आरक्षणाच्या मुद्याला हात घालताना आंदोलनाचा इशारा दिला.

इनामदारी गेली तरी मिशांना तूप लावण्याची सवय काही गेली नाही, अशातील हा प्रकार वाटतो. आंदोलन करायला आज काँग्रेसकडे कार्यकर्ते तरी शिल्लक आहेत का? रेइस मागुशच्या जि. पं. पोटनिवडणुकीतील पुरस्कृत उमेदवार प्रगती पेडणेकर यांनी प्रचाराकरता काँग्रेसचे कार्यकर्ते नव्हते, असे जे वक्तव्य केले आहे त्यातूनच काँग्रेसची दारुण स्थिती अधोरेखित होते.

Goa Congress
Blog: ब्रिटनमध्ये हुजुरांची हातघाई!

वास्तविक पक्षाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून चोडणकरांनी सद्यस्थितीची कारणमीमांसा करायला हवी होती. काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये गेल्यामुळे व प्रदेशाध्यक्ष एकदम नवीन असल्यामुळे काँग्रेसची स्थिती आज ‘असुनी नाथ, मी अनाथ’ सारखी झाली आहे.

पक्षासोबत कार्यकर्ते आहेत हे म्हणणेही धाडसाचे ठरू शकते. देवांना जर हे लोक फसवू शकतात तर आमचे काय?, असे कार्यकर्ते बोलताना आढळतात. काँग्रेसजवळ फक्त तीन आमदार राहिले आहेत. पुढील विधानसभा निवडणूक येण्यापूर्वी हे तिघेही भाजपमध्ये जाऊ शकतात, असाही होरा व्यक्त होत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसजवळ एक तरी आमदार होता. पुढच्या निवडणुकीवेळी काँग्रेसची पाटी कोरीही होऊ शकते. सध्या राज्यात विरोधी पक्ष असा नाहीच. विजय सरदेसाई तेवढे एकाकी झुंज देताना दिसत आहेत. आता येत्या विधानसभा अधिवेशनात फक्त सात आमदार विरोधी बाकावर दिसणार आहे.

Goa Congress
Wagro Konkani Film : गोव्याच्या 'वाग्रो'चा गौरवास्पद प्रवास

त्यातही विरोधी आमदारांत एकवाक्यता आहे, असेही दिसत नाही. दवर्ली जि.प. मतदारसंघात या पोटनिवडणुकीत काँग्रेसने ‘आप’ला पाठिंबा दिला असता तर भाजपचा पराभव निश्‍चित होता. काँग्रेसने आत्मसंशोधन करताना राजकारणाची ही बदललेली दिशा ओळखली पाहिजे.

स्वतः मागच्या बाकावरून जाऊन आप, आरजी, गोवा फॉरवर्डसारख्या पक्षाच्या खांद्यावर बंदूक देऊन भाजपला चितपट करण्याचे बघितले पाहिजे. मुख्य म्हणजे, ‘गिरा तो भी टाँग उपर’ ही वृत्ती सोडायला हवी. अन्यथा आगामी काळ काँग्रेसची मृत्युघंटा वाजविणार तसेच राज्य काँग्रेसमुक्त करणाऱ्या दृष्टीने जाऊन उचलणार ठरेल हे निश्‍चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com