Restaurants In Panjim Dainik Gomantak
ब्लॉग

Restaurants In Panjim: डाऊन द रोड- रिव्हरफ्रंट

पणजीतल्या प्रत्येक कॅफे,बार - रेस्टोरंटचे वेगळे वैशिष्ट्य आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे-नायक

पणजीतल्या रोजच्या यायच्या रस्त्यांवर दर पाच सहा महिन्यांनी नवनवीन कॅफे, बार -रेस्टोरंट सुरू झालेले नजरेस पडतात. इथल्या प्रत्येक कॅफे,बार - रेस्टोरंटचे वेगळे वैशिष्ट्य आहे. हेच कॅफे - बार इथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात.

पणजीतला एकेक भाग घेऊन जर यादी केली तर लक्षात येईल की, प्रत्येक भागात कितीतरी वेगवेगळे कॅफे आहेत. नुसते फोंतेनिहास भागाचा विचार केला तर इथेच कितीतरी पर्याय दिसतील. लॅटिन वसाहतीचे अस्तित्व टिकवून ठेवलेल्या फोंतेनिहास भागाला खास महत्त्व असून इथल्या प्रत्येक गल्लीत पर्यटकांना आकर्षित करतील असे कॅफे -बार आहेत.

पण मुद्दाम या भागात जाणे होत नाही. इथल्या अनेक रेस्टोरंट्सची नावे तोंडावर असली तरी कोणी मित्रमंडळी -पाहुणे आले तर त्यांना इकडे जेवायला घेऊन जावे हे त्यावेळी पटकन आठवत नाही. म्हणूनच कदाचित फोंतेनिहासमधील कॅफे -बार रेस्टोरंट्सची नावे फक्त तोंडावरच राहतात.

अगदी कुठलेही नियोजन न करता अचानक फोंतेनिहासमधील ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’ या रेस्टोरंटमध्ये जाणे झाले. तिथे गेल्यावर ‘अरे आपण इथे आधी का आलो नाही’ याची जाणीव झाली. छोट्याशा जुन्या पुलावरून पणजीत शिरताना ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’ आपले लक्ष वेधून घेते.

मांडवी नदीचा एक छोटासा तयार झालेला प्रवाह जो पणजीचे पाटो आणि फोंतेनिहास असे दोन भाग करतो. याच प्रवाहावर जुना छोटासा पूल आहे. हा पूल जिथे संपतो त्याच रस्त्यावर ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’ रेस्टोरंट आहे. इथली बाल्कनीमधली जागा तुम्हांला कधीच मोकळी दिसणार नाही.

संध्याकाळच्या वेळी ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’च्या बाल्कनीत बसून लज्जतदार पदार्थ खात समोर मांडवी नदीचा प्रवाह न्याहाळताना तुम्हांला ‘आपण व्हेनिसमध्ये तर नाही ना!’ असे वाटू शकते. याच कारणासाठी इथे बाल्कनीत बसण्यासाठी चढाओढ सुरू असते.

बाल्कनीत जागा मिळाली नाही तरी मध्ये कुठेतरी टेबल पकडून बाल्कनीतल्या जागेवर डोळा लावून बसलेले अनेकजण आजूबाजूला दिसतात. बाल्कनीतली जागा मोकळी झाली रे झाली की लगेच त्यावर ताबा मिळवतात. तर ही जागा ‘मोस्ट वॉन्टेड’ कॅटेगरीत मोडणारी आहे.

लॅटिन वसाहतीत, एका जुन्या सुंदर दुमजली इमारतीत ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’ आहे. कौलारू घराचा वरचा भाग ज्याला सुंदर अशी बाल्कनी आहे अशा भागात हे रेस्टोरन्ट वसलेय. फोंतेनिहासमध्ये कॅफे -रेस्टोरंट असणे म्हणजेच एखाद्या सुंदरशा घराचा भाग होऊन जाणे. ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’मध्ये गेल्यावर आपल्याला हेच जाणवते.

आजच्या तरुण पिढीच्या भाषेत डाउन द रोड -रिव्हरफ्रंट म्हणजे ‘डीटीआर-रिव्हरफ्रंटला’ला तरुणाईचा जल्लोष असतो. हे रेस्टोरंट थोडेसे ‘पब’सारखे असल्यामुळे तरुणाईला संगीत -नृत्य याचा मनसोक्त आनंद घेता येतो. नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कधी कधी कंटाळा येतो. काहीतरी वेगळे खावेसे वाटते.

इथे तुम्हांला काहीतरी वेगळ्या कॅटॅगरीतले मिळेल. ‘डीटीआर-रिव्हरफ्रंट’मध्ये गेल्यावर आपल्या पारंपरिक पदार्थांना थोडेसे बाजूला ठेवून काही वेगळे पदार्थ खाऊन बघा. इथे गोवन पदार्थ मिळत नाहीत असे नाही.

गोवनच काय अगदी उत्तर भारतीय पदार्थदेखील मिळतात. पण, इथले कॉंटिनेंटल, इटालियन, चायनीज पदार्थ प्रसिद्ध आहेत.

इथला पॅन फ्रेश पिझ्झा फारच प्रसिद्ध आहे. आता तुम्हांला वाटेल की पिझ्झात असे काय वैशिष्ट्य? पिझ्झाचा बेस म्हणजे पिझ्झाचा ब्रेड जाड असेल तर पिझ्झाचा एक तुकडा खाल्ला तरी लगेच पोट भरते. भरपूर चीझ आणि जाड ब्रेड यामुळे पिझ्झा खाऊन अनेकांचे पोट जड होते. परिणामी पिझ्झा खाणेच टाळतात.

पण अतिशय पातळ बेस असलेला पिझ्झा खाऊन बघा. अजिबात पोट जड होत नाही. शिवाय असा पिझ्झा अतिशय कुरकुरीत होतो. ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’मध्ये ‘थीन क्रस्ट’ पिझ्झा मिळतो. आम्ही इथे थीन क्रस्ट मशरूम पिझ्झा खाल्ला. छान कुरकुरीत होता. पिझ्झाची भट्टी तिथेच असल्यामुळे आपल्या डोळ्यांदेखत पिझ्झा बनवला जातो.

भट्टीमधून गरम गरम भाजलेला पिझ्झा थेट तुमच्या टेबलवर आणला जातो. बर्गरप्रेमींनादेखील इथे खूप वेगवेगळे पर्याय आहेत आणि इथल्या बर्गरला खास ‘गोवन’ चव आहे. फिश, चिकन, बीफ, चोरिस यामध्ये गोवन मसाले वापरून तयार केलेली पॅटी, बर्गरला वेगळी चव देते. इथला फिश बर्गर आणि स्पायसी बीन बर्गर मुद्दाम खाऊन बघा.

स्पायसी बीन बर्गर हा शाकाहारी बर्गर असला तरी चवीला फारच छान आहे. चविष्ट ‘स्टेक’पणजीत फार कमी रेस्टोरन्टमध्ये चांगल्या ‘स्टेक’ मिळतात. छान खरपूस भाजलेल्या, मसाला व्यवस्थितपणे लागलेल्या स्टेक्स खाणारे चोखंदळ खवय्ये असतात. याबाबत मी जरा मागे राहते. मांसाहारी स्टेक्स सर्वत्र मिळतात. तिथे माझी पंचाईत होते.

पण ज्यापद्धतीने आजूबाजूचे लोक ताव मारून स्टेक्स खात असतात ते बघून समजू शकते की इथल्या स्टेक्स चविष्ट आहेत. ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’मध्ये सहा सात प्रकारच्या स्टेक मिळतात.

प्रवासातल्या अनेक गोष्टी गुगलने आता सोप्या केल्या आहेत. तुम्ही फिरायला कुठेही जा, त्या भागातील स्थानिक गोष्टींची माहिती गुगलवर सहजपणे उपलब्ध असते. बरेचदा असे होते की स्थानिक लोकांना कुठे काय मिळते ते माहीत नसते, पण बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सगळे माहीत असते.

आम्ही गेलो होतो तेव्हा आमच्या शेजारच्या टेबलवर एक तरुण जोडपे बसलेले होते. ते पर्यटक आहेत हे त्यांच्याकडे बघून लगेच समजले, पण ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’मधल्या अनेक वेटर्सना ते नावानिशी ओळखत होते. त्यांच्याशी आमची छान ओळख झाली.

बेंगलोरवरून आलेले हे जोडपे गोव्यात आल्यावर ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’मध्ये आल्याशिवाय राहत नाहीत. बेंगलोर-मुंबई -दिल्लीसारख्या मेट्रोसिटीतले अनेकजण ‘वीकेण्ड’ला गोव्याला येतात. शुक्रवार -शनिवार -रविवार इथे घालवतात.

वेगवेगळ्या बार -रेस्टोरंट - कॅफेंना भेट देतात. अलीकडे हा ट्रेंड प्रचंड वाढतोय. या मेट्रोसिटीतून नियमित येणाऱ्या पर्यटकांना ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’सारखी रेस्टोरंट चांगले पूरक असे वातावरण तयार करून देतात.

इथे गोवन ते इटालियन अशा विविध पद्धतीच्या खाद्यशैलीतील पदार्थ मिळत असल्यामुळे एकाच छताखाली अनेकांना सामावून घेतले जाते.’डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’मध्ये ‘लाईव्ह बँड’शिवाय सध्या तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रसिद्ध असलेला ‘कराओके’ संगीत प्रकार आहे.

या कराओकेमध्ये लहान -मोठे सगळे रमून जातात. संगीत -नृत्य सोबत पेयपान आणि चविष्ट पदार्थ यांच्या संगतीत ‘डाउन द रोड- रिव्हरफ्रंट’मधली संध्याकाळ आणि रात्र रंगत जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT