फादर ब्राझ फालेरो एक ‘ग्लोरिफाइड मुकादम’

आज गोव्यातील हिरवळ आणि ग्रामीण भाग जपण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Father Braz Falero
Father Braz FaleroDainik Gomantak
Published on
Updated on

सुशीला सावंत मेंडीस

आम्ही त्यांचे योगदान विसरलो, त्यांना विसरलो. सध्याच्या काळात बहुतेकांना त्यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान माहीत नाही. काळाच्या पुढे विचार करणारे ते द्रष्टे होते. गोव्याच्या आजच्या स्थितीची भीती त्यांनी ५० वर्षांपूर्वी व्यक्त केली होती.

त्या काळामध्ये त्यांनी वंचितांसाठी अंत्ययात्रेची सोय करण्यापासून पर्यावरणाचे रक्षण करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी संघर्ष केला. आज गोव्यातील हिरवळ आणि ग्रामीण भाग जपण्याच्या हालचाली सुरू आहेत.

त्याची ज्योत त्यांनी पाच दशकांपूर्वी तेवत ठेवली! इतर चळवळी लोप पावत चालल्या आहेत, पण ज्या काळात चळवळींनी देश आणि समाज घडवला त्या काळात ते जगले.

समाजासाठी योगदान देणारे अनेक जेझुइट्स असतील, पण फादर ब्राझ कोन्सेसांव फालेरो हे प्रवाहाविरुद्ध पोहणारे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. रापणकरांसारख्या वंचितांना त्यांनी दिलेला पाठिंबा आणि सामाजिक न्यायासाठी सर्व अडचणींविरुद्ध त्यांनी दिलेला लढा यामुळे त्यांना केवळ पंथोपदेशक म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल.

ते माथानी साल्ढाणा आणि ख्रिस्तोफर फोन्सेका यांचे गुरु होते. ते शाळेत शिक्षक होते आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी सोसायटी ऑफ जेझुइट्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि १४ मे २०२३ रोजी वयाच्या ८६व्या वर्षी निधन होईपर्यंत ते आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहिले.

ब्राझ यांच्याकडे तशी वास्तुशास्त्रातील कोणतीही औपचारिक पदवी नव्हती, परंतु ते स्वत:स ‘ग्लोरिफाईड मुकादम’ म्हणत. त्यांनी ओडिशातील भुवनेश्वर येथील व्यवस्थापन संस्था, पणजीतील जेझुइट हाऊस आणि राय येथील ‘पेद्रो अरुपे’ संस्थेच्या बांधकामावर देखरेख केली. ते बांधकाम व्यावसायिक (फक्त कॉंक्रीटचे) नव्हे तर संस्थांचे, तसेच गोव्यातील हिरवळीचे आणि वंचितांचे रक्षण करणारे मुकादम होते.

१९८०च्या दशकात गोव्यात अनेक सामाजिक चळवळी झाल्या. विद्यार्थी आंदोलन, झुआरी-ऍग्रो केमिकल आणि नायलॉन ६.६ प्रदूषण विरोधी चळवळ, रापणकर संघर्ष आणि खाण समस्या. रापणकर चळवळ ही मुळात पारंपरिक मच्छीमारांची होती. तत्कालीन सरकारचे समर्थन असलेल्या यांत्रिकी ट्रॉलर मालकांच्या विरोधात हे आंदोलन होते.

ब्राझ हे या काळातील सामाजिक कृती गटांमध्ये सुपरिचित होते. मोर्चांमध्ये ते सामान्यांचा चेहरा होते व सभांमध्ये त्यांचा आवाज! १९८३साली त्यांनी सामान्यांसाठी तुरुंगवासही भोगला. दिवंगत डॉ. शेरॉन डी’क्रूझ यांनी ‘एक समुद्र ..तीन दावेदार: गोव्यातील रापणकर, ट्रॉलर मालक आणि सरकार यांच्यातील संघर्ष’ या शीर्षकाच्या लेखात तत्कालीन स्थानिक दैनिकांमध्ये जे वृत्त आले होते ते लिहितात.

‘२० जुलै २००० चे सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) विधेयक म्हणून सर्व आमदारांच्या आवाजी मतदानाने हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले, ज्याने मासेमारीवर १ जून ते २५ जुलैपर्यंत पावसाळी बंदी वाढवली होती. त्याच दिवशी व दुसऱ्याही दिवशी कोळंबीचा एक ट्रक मासेमारी करण्यात आला होता. प्रत्येक आमदाराला ३ किलोची कोळंबीची पिशवी देण्यात आली!’

जेझुइट्सने असंघटित आणि उपेक्षितांना, विशेषतः मध्य भारतीय जमातींना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक चळवळी केल्या. हजारीबाग प्रांतातील जेझुइट्स सावरी मुथू, रांची प्रांतातील धर्मशील कुजूर आणि सायप्रियन एक्का यांच्या नेतृत्वाखालील अहिंसक चळवळ होती ज्याने नेतरहाटच्या टेकड्यांवरील आदिवासींना २,५२,८५३ लोकांचे विस्थापन आणि नेतरहाट टेकडीवरील २४५ गावांचे रक्षण करण्यासाठी मार्गदर्शन केले.

हे आंदोलन भारतीय सैन्याच्या फील्ड फायरिंग रेंज प्रकल्पाच्या उभारणीसाठी १४७१ चौरस किमी वनजमीन संपादन करण्याच्या विरोधात होते. २३ मार्च १९९४ रोजी सुमारे १००० स्त्री-पुरुष बख्तरबंद वाहनांसमोर बसले आणि सैन्याला माघार घ्यायला लावली.

रांची प्रांतातील गुमला जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात दुसरे यशस्वी लोक आंदोलन होते, जे झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस-देशातील प्रमुख बी स्कूलच्या मार्गदर्शनाखाली होते. जेझुइट्सपैकी मायकेल व्हॅन डेन बोगार्ट, ख्रिस्तोफर लाक्रा आणि ऍलेक्सियस एक्का यांनी त्याचे नेतृत्व केले होते.

प्रकल्प प्रगतिपथावर असतानाही पुनर्वसन आणि पुनर्वसन धोरण (आर आणि आर) नव्हते. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेचा परिणाम आर आणि आर धोरण लागू होईपर्यंत प्रकल्प स्थगित करण्यात आला. २०१०मध्ये मंत्रिमंडळाने हा प्रकल्प रद्द केला.

Father Braz Falero
मिथ्या

दुमका रायगंग प्रांतात कोळसा खाणकामासाठी आदिवासींच्या ११२, ७३५ एकर जमिनीचा वापर केल्याच्या विरोधात जेझुइट प्रेरित लोक चळवळीची अशी अनेक उदाहरणे आहेत. जेसुइट्स टॉम कावलकट आणि पीए चाको यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या चळवळीत २०११साली सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या सिनियर वॉल्सा जॉन यांची हत्या करण्यात आली.

हा लढा अजूनही सुरूच आहे. बंगळूरच्या जेझुइट संचालित इंडियन सोशल इन्स्टिट्यूटचे माजी संचालक फादर स्टॅन स्वामी यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. १९७५ ते १९८६ आणि त्यानंतर ज्यांनी मध्य भारतातील आदिवासींच्या भूमी हक्कांच्या रक्षणासाठी काम केले.

ब्राझ यांना डिचोलीतल्या ‘अवर लेडी ऑफ ग्रेस स्कूल’मध्ये शिकवण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. येथेच त्यांना गरिबी प्रथम दिसली कारण त्यांच्या काही हुशार विद्यार्थ्यांजवळ शिक्षणासाठी पैसे नव्हते.

त्यांचे पालक दिवसभर खाणीत काम करत, पण पुरेसे पैसे त्यांच्याजवळ नसत. शाळेत इंग्रजी शिकवण्याच्या कामाबरोबरच डिचोलीच्या खाण कामगारांना संघटित करण्याचे त्यांनी ठरवले. या त्यांच्यामुळेच गरीब कुटुंबातील अनेक मुले शिक्षित झाली आणि आज त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि समाजात चांगल्या पदावर आहेत. पूर्व तिमोरमधील निर्वासितांसोबतही फादर ब्राझ यांनी काम केले.

Father Braz Falero
रिलिजन म्हणजे धर्म नव्हे

झेवियर सेंटर ऑफ हिस्टोरिकल रिसर्च किंवा थॉमस स्टीफन कोकणी केंद्रातील कार्यक्रमांसाठी फादर ब्राझ यांना भेटण्याचा योग आला. माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तींशीही ते जन्मजन्मांतरीची ओळख असल्यासारखे सहजतेने बोलत. कुणालाही सहज आपलेसे करण्याची क्षमता त्याच्यात होती. राजकारण आणि सामाजिक न्याय यासाठी ते कायमच आग्रही राहिले.

आपला शिष्य कसा असावा, याबद्दलही ते आग्रही असायचे. माथानी साल्ढाणा हा आपला शिष्य, त्याला गुरूंनी त्याच्यात रुजवलेल्या श्रद्धा, विचार यांच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस दाखवत नसल्याबद्दल ते निराश झाले होते.

इतरांनी आपसूक बोलावे, त्यांच्यात समरसून जावे, अशी त्यांची बोलण्याची, वागण्याची शैली होती. त्यांच्याशी संवाद साधायला, बोलायला अनेकांना आवडायचे. त्यांना ऐकताना कधीच कंटाळा येत नसे.

Father Braz Falero
दाक्षिणात्य होयसळ मंदिरे

माथानी साल्ढाणा २० वर्षांचे असताना त्यांना ‘पॉलिटिकल ऍनिमल’ म्हटल्याची आठवण फ्रेडरिक नोरोन्हा यांनी घेतलेल्या मुलाखतीत फादर ब्राझ यांनी सांगितली व माथानी यांनी सत्तेसाठी बाजू बदलून लोकांचा विश्वासघात केला, असेही ते पुढे म्हणाले. फ्रेडरिक यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण ब्राझ संशयाचा फायदा द्यायलाही तयार नव्हते.

जॉर्ज फर्नांडिस यांनीही अशीच बाजू बदलली, मंत्री बनले आणि आपल्या समाजवादी मित्रांचा विश्वासघात केला, त्याची आठवण मला इथे नमूद करावीशी वाटते. सोशलिस्ट इंटरनॅशनलने जॉर्ज फर्नांडिस यांना कधीही माफ केले नाही.

समान विचारधारेच्या आपल्या सहकाऱ्यांना केवळ क्षुद्र लाभासाठी झिडकारून दुसरा पक्ष स्वीकारतात, तेव्हा त्यांचे पतन अटळ असते. झेवियर सेंटरचे संचालक फादर अँथनी दा सिल्वा यांच्या मते फादर ब्राझ यांचे संवाद साधण्याचे कौशल्य विलक्षण होते. ज्या सहजतेने ते एखाद्या मच्छीमाराशी बोलत, तितक्याच सहजतेने ते मुख्यमंत्र्यांशीही संवाद साधत असत.

त्यांची भाची जेसिका फालेरो हिने अंत्यसंस्काराच्या शेवटी एक चांगले लिखित भाषण दिले. ती म्हणाली, ‘ब्राझ यांच्यात तत्त्वज्ञानी, वकील, इतिहासकार असे अनेक गुण होते. त्याचबरोबर त्यांनी ज्या सामान्य माणसासाठी आयुष्यभर लढा दिला त्या सामान्य माणसाचे व्यावहारिक चातुर्यही त्यांच्याठायी होते. आपले म्हणणे पटवून द्यायची हातोटी त्यांच्याजवळ होती’.

सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात आपण त्यांचा वारसा धैर्याने आणि दृढनिश्चयाने चालवू. समृद्ध गोव्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते साकारण्याचा वसा घेत आपण त्यांचा वारसा चालवू!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com