२०१४ ला कोची बिएन्नालेत सहभागी व्हायचे निमंत्रण आले आणि मिर्चीची वेगळी खासियत घेऊनच ते गोव्याहून (Goa) कोचीला (Kochi) निघाले. आता गोवा आणि कोची यांचे ‘वसाहती ’नाते जसे वेगळे सांगायची गरज नाही तसंच दोन्हीकडला कोकणीचा दरवळही वेगळा कथन करायची आवश्यकता नाही.
तर, कोचीत केरकरांनी जें मांडणशिल्प (इन्स्टॉलेशन) उभारले त्याचे नाव होतें,‘जनेल’. खिडकीसाठीचा हा शब्द मूळचा पोर्तुगीज भाषेंतला. पण जसे कोंकणीत खिडकीला जनेल म्हणतात तसे मलयालम भाषेंतही म्हणतात.
केरकरांमधल्या डॉक्टरच्या रक्तांत रंगकामाची अनुवांशिक जनुके होतीच, मध्येच कधीतरी त्याना इतिहासाचा विंचू चावला. त्याचे विष एरवी उतरणारे, पण डॉक्टरांच्या बाबतीत वेगळाच अनुभव. अधुनमधून, न सांगता, हे विष पुन्हा अंगांगात भिनते आणि त्यातून ऐतिहासिक संदर्भ असलेली अफलातून कलाकृती निर्माण होते. ‘जनेल’ची संकल्पना साकार करतानाही त्यानी इतिहासाचा खोल धांडोळा घेतला आणि त्यातून पृथक संस्कृतींच्या संगमाचा अविष्कार समोर आला. ‘भारताच्या पश्चिम किनाऱ्याला धडकणाऱ्या समुद्री लाटांनी केवळ तिथल्या दगडांनाच आकार दिलेला नाही तर स्वप्ने, कल्पना आणि कथनानाही वेगळा बाज दिलाय. आंतरखंडीय सांस्कृतिक अभिसरणाचे माध्यम म्हणून महासागरांनी काम केले आहे...‘ सुबोध सांगतात. केरळ आणि गोव्याचा इतिहास काही काळापर्यंत समांतर जातो, त्याचाही मागोवा केरकरांनी या बिएन्नालेच्या निमित्ताने घेतला.
अरबी समुद्राच्या सान्निध्यांत असलेल्या कोचीच्या मटनचेरी मील सभागृहात टायर्सचा वापर करून केरकरांनी हे मांडणशिल्प उभारले. जणू उन्हात वाळवण्यासाठी मिर्च्या मांडल्यात असे दर्शवणारे हे शिल्प. मिर्ची ही पोर्तुगीजांनी आणल्याचेही ते दर्शवायचे. यातूनच मग व्यापारातून वसाहतीपर्यंतचा आक्रमक प्रवास आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीपासून सांस्कृतिक अभिसरणाचा इतिहास नजरेसमोर तरळायचा.
२०१४ सालानंतर केरकरांनी मिर्चीचा जणू ध्यासच घेतला, वेगवेगळ्या साहित्यापासून वेगवेगळ्या आकाराच्या केवळ मिर्च्याच तयार करायच्या. एकदा तर आकाश आणि सागराच्या अथांग पसाऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यानी मिर्चीचे एक मांडणशिल्प एका वर्तुळात अशा प्रकारे रचले की त्यातून कलेच्या असिम व्याप्तीतले अनेकाविध अर्थ निघावेत. केरकरांची मिर्ची साकारते ती बाज आणि रंगांच्या चटकदार अभिव्यक्तीसह. निसर्गाच्या अफाट यदृच्छतेवरली ती चित्रशृंखलाच असते. मग निसर्गही त्यांच्या निर्मितीत सहभागी होतो आणि पंचमहाभूतांसह आसमंतातले सजिवही त्या डोलणाऱ्या मिर्च्यांच्या मूककथनात आपल्या परीने समाविष्ट होतात. कलेच्या विश्वात मिर्ची म्हणजे केवळ उत्कट लाल रंग नव्हे तर तिचे संदर्भ, तिच्याशी संबंधित क्लिष्टताही तितकीच महत्वाची. सीमा नसलेल्या खाद्यविश्वातला तिचा प्रवासही मनोज्ञ. केरकर सांगतात, ‘ मिर्ची या आयात व्यंजनाने भारतीयांच्या जीवनावर जितका प्रभाव टाकलाय तितका आणखीन कोणत्याच वस्तूने टाकलेला नसेल. मिर्चीची चव चाखली नाही असा भारतीय असणेच शक्य नाही. मिर्ची भारतात येण्याआधी आमच्या स्वयंपाकघरांत मिरी आणि अन्य तिखट व्यंजने वापरली जायची. पण सोळाव्या शतकाच्या आरंभी ब्राझिलमधून आलेल्या मिर्चीने आमचे खाद्यविश्वच पालटून टाकले.
‘शोध आणि वैचारिक उन्न्यनांच्या कर्मकांडातून माझे मांडणशिल्प उभे राहाते. प्रेक्षकानी यायचे, पाहायचे आणि त्यातून त्याना भावलेले घेऊन पुढे जायचे. मला कला म्हणजे कर्मकांड वाटतें आणि कर्मकांड म्हणजेच कला. मी दोन्हींची सरमिसळ करून माझ्या दैनंदिन जिवनातले बरेच काही तयार केले. म्हणूनच मी जे काही निर्मितो- चित्रें, शिल्पें, मांडणशिल्पें- हे सगळे निसर्गाला अर्पण करण्यासाठीच असते. पण हे अर्पणही वेगळ्या आणि व्यापक पद्धतीने अशाप्रकारे करायचे की त्यातून संवादाची निर्मिती व्हावी...’ सुबोध आपल्या कलासक्तीचे रहस्य सांगतात.
-Dr Subodh Kerkar
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.