Diwali 2022: विराट कोहलीच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकात भारताने मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर चमत्कार घडवून आणला. सुरुवातीला ढेपाळलेल्या भारतीय फलंदाजीत कोहली-हार्दिक पंड्या यांनी जणू संजीवनी मंत्र फुंकून पाकिस्तानवर अक्षरश: अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला आणि भारतात खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली.
53 चेंडूंत नाबाद 82 धावा कुटणाऱ्या विराट कोहलीने मेलबर्नला जे फटाके फोडले, ते आता आठवडाभराच्या दिवाळीपर्वात दुमदुमत राहणार आहेत. खेळात हारजीत होत असते, सर्वोत्तम संघ जिंकला पाहिजे, असे सुभाषित नेहमी सांगितले जाते. ते खरेही आहे. अपवाद फक्त भारत वि. पाकिस्तान या लढतीचा! या पारंपरिक लढतींमध्ये पराभव होणे हे ना भारतीय मानसिकतेला सहन होते, ना पाकिस्तानात तो पराभव पचवला जातो.
गेल्या वेळी पाकिस्तानकडून हार पत्करलेला भारत यावेळी वचपा काढणार का, ही ‘राष्ट्रीय’ चिंता होती. पण ऐन दिवाळीच्या तोंडावर टी-ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. या विजयामुळे गोवाच नव्हे तर देशभर जल्लोष केला जात आहे.
पेडणेपासून काणकोणपर्यंत तमाम क्रिकेटवेडे दिवाळीची खरेदी, दीपोत्सव, पारंपरिक रितीभाती बाजूला ठेवून टीव्हीच्या पडद्याला चिकटले होते, त्यांच्या प्रार्थनेला फळ आले. वसुबारस किंवा धनत्रयोदशीपासून दिवाळीचे आनंदपर्व साजरे केले जाते. रविवारचा दिवस तसा ‘भाकड’च मानला जात होता. पण भारतीय संघाने या भाकड दिवशीच दिवाळी साजरी केली.
गेल्या दोन-तीन दिवसात एकंदर तीन मनाजोगत्या लहानमोठ्या गोष्टी भारतीयांची दिवाळी सुफळ संपूर्ण करणाऱ्या घडल्या. सर्वप्रथम, दिवाळीच्या आनंदपर्वारंभीच पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 हजार युवकांना सरकारी नोकऱ्यांची ‘ऑफर लेटर’ समारंभपूर्वक दिली. असे गोव्यातही 266 जण भाग्यवान आहेत.
बेरोजगारीची समस्या खरोखर खूपच मोठी आहे. त्यामानाने पाऊण लाखांना नोकऱ्या म्हणजे ‘राईचा पर्वत’, अशी टीका विरोधकांकडून होते आहे. तशी ती होणे, स्वाभाविकच म्हणायचे. तरीही अभावाच्या या काळात ही सुरवात काही वाईट म्हणता यायची नाही. बेरोजगारीच्या प्रश्नाला मायबाप सरकारने अखेर हात घातला, हे काय कमी महत्त्वाचे आहे?
एवढ्या एका गोष्टीसाठी तरी तिचे स्वागत करायला काय हरकत आहे? येत्या वर्षभरात दहा लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासनही मिळाले आहे. तूर्त तरी किमान पाऊण लाख घरांमध्ये दिलाशाची ज्योत पेटेल, हेही नसे थोडके. पंतप्रधानांच्या या ‘रोजगार-दिवाळी’च्या पाठोपाठ आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अवकाश केंद्रातून आणखी एक आनंदाची खबर येऊन धडकली.
‘इस्रो’ने रविवारी मध्यरात्री ‘बाहुबली’ या महाकाय प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी 36 उपग्रह कक्षेत नेऊन सोडले. हा पराक्रम ‘इस्त्रो’ने यापूर्वीही करून दाखवला आहे. पण यावेळचे विशेष एवढे की हे तीन डझन उपग्रह एका ब्रिटन-स्थित संपर्कक्षेत्रातील कंपनीसाठी व्यापारी तत्त्वानुसार सोडण्यात आले. हा शुद्ध व्यवसाय होता.
एतद्देशीय अवकाश संशोधनातून अर्थार्जनाचे एक नवे पर्व त्यामुळे सुरू झाले. ही खरी विज्ञान-दिवाळी! रोजगारदिवाळी आणि त्यांच्या पाठोपाठ भारतीय संघाने दणकेबाज विजयानिशी क्रिकेट त्रयोदशी साजरी केली. आता सोमवारी नरकचतुर्दशीला पहिल्या आंघोळीच्या वेळी टाचेखाली कारीट फोडले काय नि नाही फोडले काय, सारखेच!
फार दिवसांनी यंदा खुल्या आभाळाखालची दीपावली अंगणात अवतरली आहे. तिला निर्बंधांचा काच नाही, प्राणांतिक संकटांची आंच नाही. अर्थात याचा अर्थ सगळे काही आलबेल झाले आहे, असे नव्हे. ज्यांच्या घरात दिवा सोडा, साधी चूलदेखील पेटली नाही, अशीही हजारो दुर्दैवी घरे आपल्या आसपासच आहेत.
कुणी साथरोगात गेले, कुणी दुष्काळात गेले, कुणी महापुरातल्या वाताहतीत नामशेष झाले. या दुर्दैवी उंबरठ्यांच्या आतमध्ये दीपावलीची पावले यंदाही उमटणार नाहीत. दिवाळीचा उत्सव साजरा करताना त्याचेही भान आपण ठेवायला हवे. एक तरी माणुसकीची पणती त्यांच्यासाठीही आपल्या हृदयात तेवती राहावी.
ज्यांना सुगीचा थोडका जरी स्पर्श झाला आहे, त्यांनी एका तरी गरीबाला मदतीचा हात द्यावा. त्याला न बोलता सांगावे, ‘तू एकटा किंवा एकटी नाहीस. आम्हीही तुझ्यासोबत आहोत...’ प्राचीनकाळी म्हणे दीपोत्सवाचे पर्व दसऱ्यापासून सुरू होऊन थेट तुळशीविवाहापर्यंत चालायचे. मुळात दीपोत्सव हा कृषिसंस्कृतीमधून आलेला सण. तसे आपले बहुतेक सारेच सणसमारंभ शिवारामधूनच उगवलेले.
मनासारखा पर्जन्यकाळ सरता सरता शिवारात सोने लगडलेले असते. हातात सुगी खुळखुळू लागलेली असते. म्हणून तर हे आनंदपर्व येते. मध्ययुगीन काळातही अल्बेरुनी नावाच्या एका मुशाफिराने भारतवर्षातील प्रदीर्घ दीपपर्वाचे वर्णन करून ठेवले आहे. कालौघात मात्र हा उत्सवकाळ आक्रसत गेला, असे दिसते.
हल्ली तीन-चार दिवसांची दिवाळीही खूप मोठी आणि महागडी वाटते. अशा अभावकाळातही एखाददुसरी आनंददायी घटना घडली की मन सकारात्मकतेने भरून जाते. नव्या उमेदीने जीवनाला भिडण्याचे बळ मिळते. भारतीय संघाने साजऱ्या केलेल्या ‘क्रिकेट त्रयोदशी’ने सुरू केलेले हे दीपावलीचे आनंदपर्व दीर्घकाळ टिको, या शुभेच्छा!
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.