Goa Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्याचा राज्यप्राणी गवा

गोमन्तक डिजिटल टीम

राजेंद्र पां. केरकर

गोवा सरकारने इथल्या पश्चिम घाटात आणि अन्यत्र वसलेल्या हिरव्यागार जंगलाची शान असणाऱ्या गव्याला राज्य प्राण्याचा दर्जा प्रदान केलेला आहे.

जंगली सस्तन प्राण्यांमध्ये आपल्या काळ्याभोर देहएष्टी आणि जबरदस्त शिंगांसाठी प्रसिध्द असलेला गवा जवळपास प्रौढत्व मिरवत असताना टनभर वजनाचा होतो. भारतभरातल्या पश्चिम घाटातल्या जंगलाचे वैभव ठरलेला हा प्राणी एकेकाळी करवीर संस्थानात येणाऱ्या दाजीपूरच्या जंगलाची शान ठरली होती.

करवीर संस्थानातल्या राजे, सरदार यांच्यासाठी शिकारक्षेत्र म्हणून नावारुपास आलेले दाजीपूरचे जंगल, महाराष्ट्र राज्यात विलीन झाल्यावर सुध्दा काही काळ शिकारक्षेत्र म्हणून राहिले.

परंतु नंतरच्या कालखंडात महाराष्ट्र सरकारने १९५८ साली दाजीपूरला संरक्षित अभयारण्य म्हणून अधिसूचित केले आणि त्यानंतर इथल्या जंगली श्वापदांच्या होणाऱ्या शिकारीवरती बंदी आली. १९८५ साली राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांच्या जलाशयांच्या अस्तित्वाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्या परिसरातल्या जंगल क्षेत्राचा या अभयारण्यात समावेश करण्यात आला. दाजीपूरचे जंगल गव्याच्या वास्तव्यामुळे महाराष्ट्रभर नावारुपास आलेले आहे.

दाजीपूरचे जंगल गव्यांसाठी प्रसिध्द असले तरी सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतराजीत आणि वृक्षवेलींची श्रीमंती मिरवणाऱ्या गोव्यातल्या जंगलात शेकडो वर्षांपासून गव्यांचा सुरक्षित नैसर्गिक अधिवास आहे. प्राणी शास्त्रानुसार भारतीय जातीच्या गव्याला बॉस गॉरस असे नाव असून, उन्हाळ्यामध्ये डोंगराळ प्रदेशातील गवत व पाने संपल्यावर ते खालच्या पट्ट्यात येतात आणि तेथील बागायती आणि शेतातल्या उपलब्ध मौसमी पिकांवरती ताव मारतात आणि बागायतदार आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करतात.

गव्याचे नवागत पिलू सोनेरी झाक असलेल्या पिवळ्या रंगाचे असते आणि नंतर ते तांबूस रंगात छटा धारण करते. तपकिरी रंगाचे डोळे आणि पायमोजे घातल्यासारखा गुडघ्यापर्यंत भाग यामुळे गवा महिष कुळातल्या अन्य प्राण्याच्या तुलनेत वेगळा दिसतो. मौसमी गवतावरती प्रामुख्याने जगणारा गवा, रानातल्या वृक्षवेलींची कोवळी आणि लुसलुशीत पाने आवडीने खातात. जंगलात सह्याद्रीत कारवीची जी झुडूपे असतात.

त्या कारवीची पाने मोठ्या आवडीने ते भक्षण करतात. सकाळी व संध्याकाळी गवे चरण्यासाठी बाहेर पडतात आणि दुपारी उन्ह असताना एकांतस्थळी रवध सावलीत करणे त्यांना आवडते. जंगली श्वापदांना नैसर्गिकरित्या उपलब्ध क्षाराची नितांत गरज असून क्षारयुक्त जमीन जेथे असेल तेथे ते जाऊन ती चाटतात आणि सोडियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फरयुक्त खनिजाबरोबर क्षाराची प्राप्ती करुन घेतात.

पूर्वीच्या काळी बांबूच्या जंगली प्रजातीच्या कोंबाचा आस्वाद घेण्यासाठी मान्सूनच्या काळात गवे येतात. आज बांबूचे जंगलात प्रमाण कमी होत असल्याने आणि गोव्यासारख्या प्रदेशातल्या जंगलाची नासधूस करुन त्याजागी काजूसारख्या बागायती पिकांकडे लोकांचा कल वाढलेला आहे. आणि त्यामुळे गव्यांसारख्या महाकाय देहाच्या जंगली प्राण्याला अन्नाची प्राप्ती होणे कठिण ठरलेले आहे. त्यामुळे गवे आज काजूच्या बोंडावरती ताव मारण्यात धन्यता मानत आहे.

काजू बोंडू रसदार आणि अलकोलच्या मात्रेने समृध्द असल्याने ते खाण्याची चटक लागल्यावरती सहसा गवेरेडे अन्यत्र जाणे टाळतात आणि बागायतीत येऊन तिथे सहज उपलब्ध असणाऱ्या बोंडूवरती आवडीने ताव मारतात. काजू बोंडूप्रमाणे जेथे लोकांनी अननसांची लागवड केलेली आहे तेथील अननसाची एकदा खाण्याची चटक लागल्यावर गव्यांना रोखणे प्रतिकुल होते आणि त्यामुळे ज्या माळरानावरती मौसमी गवत उपलब्ध होते तेथे अननसाची लागवड झाल्याने गव्यांनी आपला मोर्चा अननसाच्या बागांकडे वळवलेला आहे.

एकेकाळी जेथे गवताची कुरणे होती त्या जागी बागायतदारांनी मोले राष्ट्रीय उद्यान आणइ महावीर अभयारण्याच्या परिसरात अननसांची लागवड केल्याने मानव आणि गवे यांच्यातला संघर्ष टोकाला गेला आणि त्यातून विजेच्या धक्कातंत्राने गव्यांना रोखण्याच्या प्रयत्नात एका गव्याच्या कळपातल्या बहुतांश जणांचा मृत्यू होण्याची दुर्घटना घडली होती. आजही या परिसरातल्या गव्यांचा आणि तेथील शेतकरी आणि बागायतदार यांच्यातल्या संघर्षाने टोक गाठलेले असून त्याचे गंभीर दुष्परिणाम निर्माण झालेले आहे.

आज गोव्याच्या एका टोकाला वसलेल्या काणकोण तालुक्याला पूर्वाश्रमी आडवाटेवरुन अडवट असे नाव प्राप्त झाल्याचे मानले जायचे. कन्नड भाषेमुळे काणकोणला काडकोण हे नाव लाभल्याचा संदर्भ कॅनरा जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळतो. काडकोण म्हणजे गवे. पूर्वीच्या काळी सह्याद्रीतल्या जंगलांनी आणि मौसमी गवताने समृध्द पठारे या प्रदेशाची शान असल्याकारणाने इथे गव्यांचे प्राबल्य होते.

आणि त्यामुळे या तालुक्याला काडकोण ग्रामनाम लाभल्याचे मानले जाते. सत्तरीत गवाणे नावाचे गाव असून इथे ही गव्यांची चांगली वर्दळ जंगलात असून सत्तरी, काणकोण आणि फोंडा या तालुक्यातली गवाणे, गावणे ही ग्रामनामे गव्यांशी संबंधित असली पाहिजे, सोसोगड, मोर्लेगड, वाघेरी इथल्या माथ्यावरती जी जांभ्या दगडांनी युक्त पठारे आहेत तेथे मौसमी गवताने समृध्द माळ असून सकाळ- संध्याकाळ इथल्या परिसरात शांतपणे गव्याचे कळप चरत असल्याचे पहायला मिळतात.

गव्यांच्या कळपाचे नेतृत्व वृध्द मादी करत असते. तर बऱ्याचदा प्रौढ नर एकटाच माळरानावरती चरत असलेला पहायला मिळतो. रानातल्या वृक्षवेलींचा कोवळा पालापाचोळा आणि मौसमी रानफळांचा मनसोक्तपणे आस्वाद घेणारे गवे आज शेतकऱ्यांच्या उत्पादनावरती घाला घालू लागलेले आहेत. भाताच्या पिकांची चटक त्यांना इतकी लागते की बऱ्याचदा त्याना हाकलून लावलेले असताना गवे पुन्हा पुन्हा शेतात येतात.

आणि धान्य फस्त करतात. काजु बोंडू, अननस, केळी, बांबू यासारख्या पिकांवरती ताव मारण्यात गवे अग्रेसर असल्याने त्यांचा संघर्ष मानवी समाजाशी वाढलेला आहे. आणि त्याचे रुपांतर गव्यांना मारण्याच्या प्रकरणात झालेले आहे.

गव्यांची निघृणपणे हत्या करुन त्यांचे मास विकले जाते आणि खवय्ये त्याचे आवडीने भक्षण करण्यास सिध्द असतात.महाकाय देहाच्या या प्राण्याला जंगलात बऱ्याचदा पट्टेरी वाघांबरोबर अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो. आणि त्यात वाघ गव्याला ठार करून त्याच्या मासावरती आवडीने ताव मारल्याची प्रकरणे सह्याद्रीच्या जंगलात दृष्टीस पडतात. गोव्याचा राज्यप्राणी असलेल्या गव्याला आज त्याच्या अस्तित्वासाठी जीवघेणा संघर्ष द्यावा लागत आहे.

पूर्वीच्या काळी सह्याद्रीतल्या जंगलांनी आणि मौसमी गवताने समृध्द पठारे या प्रदेशाची शान असल्याकारणाने इथे गव्यांचे प्राबल्य होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT