

माझा जन्मच म्हार्दोळ-प्रियोळचा, तिथंच माझं पालन पोषण झालं. झरे, झाडी, रानं, कुळागरं, सांस्कृतिक वातावरण, मंदिरांचं सात्विक, आध्यात्मिक दिव्यत्व, जाणीव कुशाग्र करणारी संगीत स्पंदनं, नाटकं, वेगवेगळे खाद्य पदार्थ, म्हणींनी, शब्दसंपदेने, विपुलतेने रसरसणारी कोंकणी भाषा व लोकजीवन, अवाढव्य निसर्ग यांनी माझ्या हाडांचं व प्रतिभेचं बळकट पोषण केलं. माझ्यातील लेखक, नाटककार या मातीतच घडला.
भूमितीय पिरॅमिडसारख्या व इतर आकारांच्या डोंगररांगा अजूनही मला खुणावतात. आजोळच्या गुरांसंगे आम्ही डोंगरमाथ्यावर गेलो, हुंदडलो, बागडलो. तिथे आजीने मळे पिकवले.
म्हार्दोळ माझं टॉनिक म्हणजे शक्तीवर्धक ठरलं. या मातीतच काही और आहे. हे नुसतं स्मरणरंजन नव्हे. हे फक्त स्मृतींच्या झोक्यांवर डोलत आनंद घेणे नव्हे. व्यक्तिमत्वाचा पाया, जो इथं रचला गेला. ही संस्कारिता माझ्या अंगांगांत मुरून राहिली.
कैरीचं लोणचं जसं सिझनींग होत जातं (करमेता) तसं आतील हे सुगंधित जग मला ‘पूश’ देत राहतं. म्हार्दोळ गांव माझ्याशी आतून संवादत असतो. गावालाही चेहरामोहरा असतो. माझ्याशी हा गाव बोलत असतो.
कधी कारण नसताना किंवा कधी जत्रेचं, कालोत्सवाचं निमित्त करून मी म्हार्दोळला जातो. डोंगरावर गेल्यावर पक्ष्यांचे नाद ऐकून उड्या मारत दाद द्यावीशी वाटते. कधी सहा मात्रांच्या दादरा तालावर एक पक्षी गात असतो. भुर्र करून उडून जातो.
स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते. तळीजवळ मी बसतो. बालपणी विशिष्ट कोनातून मारत होतो, तसा दगड पाण्याच्या पृष्ठभागावर फेकतो. पीट्ट पीट्ट, टणाटण पाण्याला स्पर्शकासारखा अलगद स्पर्श करून दगड लयदार नाचत जातो. मी पाण्याच्या लाठीकडे जातो. मुडीस चहाचा चौकोनी डबा लाठीला बांधलेला असायचा. आम्ही ती लाकडी रचनेची लाठ पाण्यात खाली सोडून पाणी भरून वर ओढून आंघोळ करायचो. मस्त मस्त शॉवर.
म्हार्दोळला महामार्गामुळे, केक कापावेत तसे डोंगर कापले गेले. जायांच्या उत्पादनावर त्याचा किंचित परिणाम झाला. विकास, उन्नती, प्रगती यांच्या नावाखाली परिवर्तन होणं स्वाभाविक.
पण ज्या गांवठी भाजी-पाव नावाच्या चवीवर आम्ही जगलो त्याची तुलना जगातील कुठल्याही रेस्टॉरंटमधील पदार्थांशी होऊ शकत नाही.
पातळ भाजी व मिक्स भाजी मला खुणावते. पणजीहून येताना मी म्हार्दोळ बाजारात थांबतो. अगदी तरल तेलाचे थर तरंगत असलेली पातळ भाजी सेवन करतो. निघताना एक पोटली घेऊन फोंड्याला घरी जातो. पातळ भाजीत तरंगत डोलणारी वाटाण्याची टरफले व सभोवताली अलवार खेळणारे तेलकट थर यात मला म्हार्दोळची त्या त्या काळातील अनंत रूपे, रंग, पोषण मूल्ये व सांस्कृतिक ढंग यांची सुंदर प्रतिमा दृश्ये दिसू लागतात. त्यांनीच माझ्या आयुष्यात उदंड सकारात्मता पेरलेली आहे. कृतार्थता, धन्यता वेगळी असते का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.